कॉन्स्यान्से, हेंड्रिक : (३ डिसेंबर १८१२–१० सप्टेंबर १८८३). फ्लेमिश कादंबरीकार. जन्म अँटवर्प येथे. त्याचे वडील फ्रेंच आणि आई फ्लेमिश होती. शिक्षक, सैनिक, कारकून आदी अनेक व्यवसाय त्याने केले. १८३१ च्या सुमारास तो फ्रेंच स्वच्छंदतावादाने प्रभावित झाला आणि त्याने फ्रेंचमध्ये काही काव्यरचनाही केली; पण लवकरच तो कादंबरीलेखनाकडे वळला. लेखनासाठी फ्लेमिश भाषाच त्याने पसंत केली. वस्तुतः फ्लेमिश भाषा ही वाङ्मयीन अभिव्यक्तीसाठी अपात्र आहे, असे तत्कालीन सुशिक्षितांचे मत होते. तथापि आपल्या लेखनाने त्याने फ्लेमिश भाषेला वाङ्मयीन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. In’t Wonderjaar 1566 (१८३७, इं. शी. इन द यिअर ऑफ मार्व्हल्स, १५६६), De leeuw van Vlaanderen  (१८३८, इं. शी. द लायन ऑफ फ्लॅंडर्स), Jacob van Artevelde  (१८४९), De Loteling (१८५०, इं. शी. द कॉन्स्क्रिप्ट), De arme edelman (१८५१, इं. शी. द पूअर नोबलमन), Het geluk van ryk te zyn (१८५५, इं.  शी. द हॅपिनेस ऑफ बीइंग रिच), Benjamin van Vlaanderen (१८८०, इं. शी. बेंजामिन ऑफ फ्लॅंडर्स) या त्याच्या काही कादंबऱ्या आणि Phantazy (१८३७, इं. शी. फॅंटसी) हा लघुकथासंग्रह. आरंभी त्याचा कल ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याकडे होता. या संदर्भात त्याची अनेकदा सर वॉल्टर स्कॉटशी तुलना करण्यात येते. पुढे तो सामाजिक कादंबऱ्या लिहू लागला. त्याचे निसर्गप्रेम त्याच्या लेखनातून प्रकटले आहे. त्याच्या अनेक ग्रंथांचे अन्य यूरोपीय भाषांतून अनुवाद झाले आहेत. ब्रुसेल्स येथे तो निधन पावला.

जगताप, बापूराव