गुलिंदा : हा पक्षी कॅरॅड्रीइडी पक्षिकुलाच्या स्कोलोपॅसिनी या उपकुलातला आहे. याचे शास्त्रीय नाव न्यूमेनियस आर्क्वेटा आहे. हा भारतातील रहिवासी नसून उत्तर यूरोप व सायबीरियातून भारतात हिवाळ्यात येतो व उन्हाळ्याच्या सुरुवातीस परत जातो. हिवाळ्यात भारताच्या सर्व भागांत हा दिसून येतो.
आकाराने पाळीव कोंबडीएवढा हा असतो. पाठीचा व पंखांचा रंग भुरकट तपकिरी असून त्यात काळसर छटा असते खालची बाजू फिक्कट रंगाची पाठीचा मागचा भाग आणि कंबर पांढऱ्या रंगाची सर्व शरीरावर काळ्या व पिंगट रंगाच्या जाड किंवा बारीक रेषा व लहानमोठे ठिपके असतात चोच १३–१५ सेंमी. लांब व खाली वाकलेली असते पाय लांब असतात. नर व मादी यांत फरक नसतो.
तलाव, तळी, नद्या यांच्या काठी अथवा समुद्रकिनाऱ्यावर हे एकेकटे असतात किंवा यांच्या लहान टोळ्या असतात. ओहोटीच्या वेळी उघड्या पडलेल्या समुद्रकिनाऱ्यावर किंवा तलाव व नद्या यांच्या काठच्या पाणथळ जागेत हिंडून हा भक्ष्य मिळवितो. हिंडताना हा मधूनच धावतो. मधूनच एकेक पाऊल टाकीत ऐटीत चालतो. चिखलात आपली चोच खुपसून हा भक्ष्य पकडतो. गोगलगाई, झिंगे, सुरवंट, समुद्राच्या व नदीच्या पाण्यात आढळणाऱ्या वनस्पती व इतर वनस्पतिज पदार्थांवर हा आपली उपजीविका करतो. उडत असताना ‘कूर-ली’ असा काहीसा आवाज तो काढतो. हा अतिशय जागरूक असल्यामुळे फसून माणसाच्या तावडीत सहसा सापडत नाही. याचे मांस रुचकर असल्यामुळे बरेच लोक याची शिकार करतात.
या पक्ष्याची वीण उत्तर यूरोप आणि सायबीरियात एप्रिलपासून जूनपर्यंत होते.
कर्वे, ज. नी.
“