गुलमोहर : (हिं. गुलमोहोर क. संकेसरी, कट्टिकाई इं. गोल्डमोहर ट्री, फ्लँबॉयंट फ्लेम ट्री, रॉयल पीकॉक फ्लॉवर लॅ. डेलोनिक्स रेजिया, पॉइंकियाना रेजिया कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी). हा सु. १२ मी. उंच वाढणारा सुंदर छत्रासारखा व पानझडी वृक्ष मूळचा मॅलॅगॅसीमधील (मादागास्करमधील) असून सु. १८२४ च्या सुमारास मॉरिशसमध्ये आणला गेला. १८५० च्या सुमारास तो मुंबईत असल्याची नोंद आहे. आता तो बराच पसरला असून मुख्यत: शोभा व सावली यांकरिता बागेत व रस्त्याच्या दुतर्फा लावला जातो. ‘गुलमोर’ हे नाव खरे असून इंग्रजी नाव ‘पीकॉक फ्लॉवर’ त्यावरून पडले असावे असे काहींचे मत आहे. पसरट फांद्या आणि पिसासारखी संयुक्त पाने वृक्ष लहान असताना शोभिवंत दिसतात. पाने सु. अर्धा मी. लांब असून त्यांवर १०–२० फिकट हिरव्या दलांच्या जोड्या आणि प्रत्येक दलावर २०–३० दलिकांच्या जोड्या असतात [→ पान]. उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाने गळतात व फुले येण्यास सुरुवात होते नवी पालवी मेमध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस येते. फांद्यांच्या टोकास फुलांच्या मंजऱ्या येतात. फुले मोठी व गडद नारिंगी असून प्रत्येकात चार मोठ्या पाकळ्या व एक अधिक मोठी पाकळी असते या पाकळीवर पिवळ्या व लाल रंगाचे मिश्रण दिसते. संदले बाहेर हिरवी व आत लाल आणि केसरदले लाल तंतूंची व दहा असतात [→ फूल]. शेंग (शिंबा) मोठी, चपटी (५० X ८ सेंमी.) व पूर्णपणे पिकल्यावर पिंगट व कठीण होते. बिया लांबट आणि मिश्ररंगी असतात. नवीन लागवड बियांपासून करतात. लाकूड हलके व पांढरे असून त्यास उत्तम झिलई होते.

पहा : लेग्युमिनोजी.  

जमदाडे, ज. वि.

तांबडा गुलमोहर