गुर्जर शिवव्यास : (चौदावे-पंधरावे शतक). एक महानुभाव ग्रंथकार. ‘गुर्जर शिवबास’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. श्रीचक्रधरस्वामींच्या गुजराती वंशातील तो सहावा पुरुष. त्याचे मूळचे नाव शिवपाळ. त्याच्या पित्याचे नाव धर्मपाळ. शिवपाळाची मातृभाषा गुजराती होती. आपला पुतण्या संगपाळ ह्याच्यासह तो महाराष्ट्रात पैठण येथे आला. कवीश्वरानाम्यातील अचळ मुरारी ह्याचे शिष्यत्व त्याने स्वीकारले. गुजराती असल्यामुळे शिवपाळास ‘गुर्जर शिवव्यास’ असे नाव प्राप्त झाले. संगपाळाने त्याचे शिष्यत्व पतकरले. ‘सोंगोबास’, ‘सोंगेराजबास’ अशा नावांनी संगपाळ पंथात ओळखला जाऊ लागला. ह्या चुलत्या-पुतण्यांच्या गाद्या आणि शिष्यपरंपरा अद्याप विद्यमान आहेत.
गुर्जर शिवव्यासाने उपाध्य आम्नायातील धाराशिवकर ओंकारव्यासाचा शिष्य सिद्धांते हरिव्यास ह्याच्या साहाय्याने केशवराज ऊर्फ केसोबास संकलित ⇨सिद्धांतसूत्रपाठा तील लक्षण, आचार व विचार ह्या प्रकरणांवर तिन्ही स्थळांची बांधणी केली (सु. १४०३). ह्या स्थळग्रंथांत निरनिराळ्या आम्नायांतील आचार्यांचे श्रीचक्रधरस्वामींच्या सूत्रांवरील स्पष्टीकरणात्मक पक्ष प्रामुख्याने एकत्रित केले आहेत. पंथात ही तिन्ही स्थळे सर्वमान्य झालेली आहेत. लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ ह्या नावांनी ती ओळखली जातात. कवीश्वरी अंकलिपी ही महानुभावीय सांकेतिक लिपी त्याने तयार करून वापरात आणली. वा. ना. देशपांडे ह्यांच्या मते स्मृतिस्थळाच्या संस्करणात मालोबासाबरोबर गुर्जर शिवव्यासाचाही हातभार असावा.
सुर्वे, भा. ग.