गुरबक्षाणी, होटचंद : (१८८४–१९४७). आधुनिक सिंधी साहित्यिक. जन्म हैदराबाद (सिंध) येथे. पदवीपर्यंतचे शिक्षण सिंधमध्येच. पुढे मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून ते फार्सी घेऊन एम्.ए., नंतर त्याच कॉलेजमध्ये फार्सीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक (१९०७). पुढे १९२८ मध्ये ते लंडनला गेले. तेथे मिस्टिसिझम इन इंग्लिश पोएट्री हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळविली. सिंधमध्ये परतल्यावर ते कराची येथील डी. जी. सिंध कॉलेजचे प्राचार्य होते.
त्यांची साहित्यनिर्मिती अल्प असली, तरी ती उच्च दर्जाची आहे. त्यांची उल्लेखनीय संशोधनपर साहित्यकृती म्हणजे शाह-जो-रिसालो (३ खंड १९२३, –२४, –३०) हा बृहत् गद्य ग्रंथ. याचा चौथा खंड त्यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही. या ग्रंथात सिंधीतील सर्वश्रेष्ठ सूफी कवी ⇨अब्दुल लतीफ शाह (१६८९–१७५६) याच्या रिसालोचे (काव्याचे) अत्यंत मूलगामी संशोधन, संपादन व विवरण त्यांनी केले आहे. शाहच्या प्रत्येक पद्याचे त्यांनी संशोधन केले. त्यात प्रत्येक पद्याचा मूळ स्वरूपात उच्चारांसहित संदर्भ दिला असून त्याचा पद्धतशीर अनुवादही दिलेला आहे. या कृतीतून शाहच्या काव्याचे त्यांचे सखोल ज्ञान व भाषेवरील प्रभुत्व यांचे दर्शन घडते. या ग्रंथास त्यांनी विवेचक अशी प्रस्तावना लिहिली असून ती मुकद्दमा-इ-लतीफी म्हणून स्वतंत्र पुस्तकरूपानेही प्रसिद्ध आहे. ही प्रस्तावना सिंधी साहित्यसमीक्षेचा अमोल ठेवा मानली जाते. सर एच्. टी. सॉर्ली यांच्या मते गुरबक्षाणींच्या रिसालोमुळे शाहचे व्यक्तिमत्त्व व मूळ काव्य यांचे यथार्थ दर्शन आपणास होते.
हिरानंदाणी, पोपटी रा. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)
“