गुब्बी, वीराण्णा : (६ जून १८८२ – १८ ऑक्टोबर १९७२). कन्नड रंगभूमीवरील प्रसिद्ध नट व नाट्यनिर्माते. म्हैसूर राज्यातील तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी या गावी जन्म. वडिलांचे नाव हंपण्णा. नट, निर्माता आणि व्यवस्थापक या नात्यांनी कन्नड रंगभूमी व चित्रपट यांच्या क्षेत्रात वीराण्णाने अभूतपूर्व यश मिळविले व कन्नड रंगभूमीला परमोच्च स्थान प्राप्त करून दिले.

वीराण्णा गुब्बीत्यांनी आपल्या नाटक मंडळीचे १९१७ ते २४ या काळात म्हैसूर, मद्रास, महाराष्ट्र या प्रांतातून अनेक यशस्वी दौरे करून तिला अपरंपार लोकप्रियता मिळवून दिली. ते उत्तम विनोदी नटही होते. १९२३ ते ४३ ही वीस वर्षे वीराण्णा व त्यांची नाटक मंडळी यांच्या जीवनातील अत्यंत उज्ज्वल व वैभवाचा कालखंड होय. या काळात म्हैसूरचे महाराज श्री कृष्णराज आणि जयचामराज वाडियार यांच्या हस्ते. ‘व्हर्सटाइल कॉमेडीयन’ (१९३०) व ‘नाटकरत्नम्’ (१९४२) या पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उडुपी मठाच्या स्वामींनीही त्यांना १९३० साली ‘रसिक शिखामणी’ ही पदवी बहाल केली. १९५५ साली राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते एक अभिनेता म्हणून झालेला त्यांचा सन्मान हा त्यांच्या वैयक्तिक यशाचा परमोच्च बिंदू होय. ‘पद्मश्री’ हा किताबही त्यांना देण्यात आला होता. नाट्य व चित्रपट या क्षेत्रांतील त्यांच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रशंसनीय कामगिरीमुळे ‘कर्णाटक-आंध्र-नाटक-सार्वभौम’ या गौरवपूर्ण उपाधीने अलंकृत स्वरूपात त्यांचा नामोल्लेख होत असतो.

सदारमे  हे गुब्बी वीराण्णांचे प्रख्यात नाटक. त्याशिवाय कुरुक्षेत्र, प्रभामणि विजय, कृष्णलीला, कंसवध, रुक्मिणीहरण, कबीरदास, कर्णाटक-साम्राज्य-स्वामिनिष्ठा, सुरामहिमा  इ. त्यांची नाटके त्यांतील देखाव्यांच्या आकर्षक भव्यतेसाठी गाजलेली आहेत. गडकऱ्यांच्या एकच प्याला  नाटकाचे कन्नड रूपांतरही त्यांनी रंगभूमीवर आणले होते. १९३० ते १९४४ च्या दरम्यान त्यांनी कित्येक कन्नड मूकपट व बोलपट काढले.

कलेये कायक (१९६७) हे त्यांचे कन्नड भाषेतील आत्मचरित्र उपलब्ध आहे. बंगलोर येथे त्यांचे निधन झाले.

काळे, के. ना.