गुप्त, नगेंद्रनाथ : (सु. १८६१ – २८ डिसेंबर १९४०). बंगाली कादंबरीकार, लघुकथालेखक व प्रभावी इंग्रजी पत्रकार. बिहार प्रांतातील मोतिहारी येथे जन्म. प्राथमिक व दुय्यम शिक्षण बिहारमध्ये व उच्च शिक्षण कलकत्त्यास. नरेंद्रनाथ दत्त (स्वामी विवेकानंद) हे त्यांचे सहाध्यायी व जिव्हाळ्याचे मित्र होते. काही कौटुंबिक अडचणीमुळे नगेंद्रनाथ गुप्तांना आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. रवींद्रनाथ टागोर व प्रियनाथ सेन ह्यांच्याशी त्यांचा निकटचा स्नेह होता. प्रारंभीच्या काळात ह्या दोघांमुळेच त्यांना लेखन-वाचनाचा नाद जडला.
वयाच्या तेविसाव्या वर्षी नगेंद्रनाथ अकस्मात कलकत्ता सोडून कराचीस गेले. तेथे फिनिक्स ह्या इंग्रजी साप्ताहिकाचे त्यांनी सात वर्षे संपादन केले. त्यानंतर ते १८९१ साली लाहोरला आले. तेथे ट्रिब्यून ह्या पत्राची संपादकीय सूत्रे त्यांच्या हाती आली. त्यांनी ह्या पत्राला फार थोड्या काळात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट ह्यासारख्या अँग्लो-इंडियन पत्राला हेवा वाटावा, एवढा प्रभाव ट्रिब्यूनने, जनमतावर पाडला. १९०५ नंतर त्यांनी अलाहाबाद येथे इंडियन पीपल व लीडर ह्या पत्रांचे संपादन केले. १९१३ साली ते पत्रव्यवसायांतून कायमचे निवृत्त झाले.
नगेंद्रनाथांचा व्यवसाय जरी वृत्तपत्रकाराचा होता, तरी त्यांचा पिंड मात्र साहित्यिकाचा होता. वयाच्या एकविसाव्या वर्षापासून पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत ते बंगाली भाषेत साहित्यनिर्मिती करीत होते. कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध ह्या प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या नावावर बारा कादंबऱ्या व तीन लघुकथासंग्रह आहेत. पर्वतवासिनी (१८८३) व लीला (१८८५) ह्या त्यांच्या उल्लेखीय कादंबऱ्या होत. ह्यांखेरीज जीवन ओ मृत्यु (निबंध, १९०१), विद्यापति ठाकुरेर पदावलि (संकलन), सत्यपीरेर कथा (संकलन) अशी त्यांची इतर ग्रंथनिर्मिती असून विद्वांनाकडून ती वाखाणली गेली आहे.
त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांत कौटुंबिक जीवनाचे चित्रण आढळते. त्या वास्तववादी असून त्यांवर बंकिमचंद्रांचा बराच प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या लघुकथांत रवींद्रनाथांच्या तंत्राचे अनुकरण दिसते.
रामानंद चतर्जी ह्यांच्या मॉडर्न रिव्ह्यू ह्या मासिकात नगेंद्रनाथ अधूनमधून लेख लिहीत असत. त्यांच्या आग्रहावरून रवींद्रनाथांच्या काही कवितांचे त्यांनी इंग्रजीत अनुवादही केले. शिव्ह्ज : पोएम्स अँड साँग्ज ह्या नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहिलेले गांधी अँड गांधीझम (१९४५) हे पुस्तक त्या वेळी बरेच गाजले होते.
शेवटी शेवटी त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. १९१७ साली मुंबईच्या ‘टाटा ऑइल मिल’ मध्ये त्यांनी सचिवपद स्वीकारले व १९२२ साली ते सेवानिवृत्त झाले. मुंबईतच त्यांचे निधन झाले.
खानोलकर, गं. दे.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..