गुच्छघास : (इं. एस्पार्टो ग्रास, स्पॅनिश ग्रास लॅ. स्टायपा टेनॅसिसिमा कुल-ग्रॅमिनी). सुमारे ०·६—०·९ मी. उंचीचे हे झुबकेदार आणि बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत मूळचे द. स्पेन व उ. आफ्रिका येथील असून आफ्रिकेत ते ‘आल्फा’ किंवा ‘हाल्फा’ नावाने ओळखले जाते. मुर्सियाच्या व व्हॅलेन्शियाच्या नापीक व ओबडधोबड भागात ते विपुल असून अल्जेरियात समुद्र किनाऱ्यावरच्या रेताड, कोरड्या जागी व भरपूर उन्हात आढळते. त्याची बेटे ०·६—३ मी.पर्यंत वाढतात. खोड केसाळ व दंडगोलाकृती असते पाने १५—९० सेंमी. लांब, अरुंद, गुळगुळीत व करडी हिरवी असून पिसासारख्या परिमंजऱ्यांवर फुले येतात. कोवळेपणी खोडांचा चारा जनावरांना घालतात, पण जून झाल्यावर ती फार चिवट होतात. पानांतील धागा बळकट व लवचिक असल्याने आज शेकडो वर्षे त्यांचा उपयोग दोर, टोपल्या, पादत्राणे, चटया, कागद इ. वस्तूंकरिता केला जात आहे. त्यापासून केलेली जहाजावरची केबल हलकेपणामुळे स्पॅनिश आरमारात वापरली जाते. वजनाच्या मानाने पानांमध्ये शेकडा ५६ टक्के धागा असतो. तो पेंढ्यापेक्षा १० टक्के जास्त असतो तो कागदनिर्मितीत वापरतात. प्रथम फ्रान्समध्ये व नंतर ग्रेट ब्रिटनमध्ये हे गवत आणले गेले. याच्या कागदनिर्मितीत एक प्रकारचे मेणही उपलब्ध होते. सुके गवत दाहक (कॉस्टिक) सोड्यात दाबाखाली उकळून व नंतर धुवून व विरंजन करून (रंग नाहीसा करून) कागदाकरिता वापरतात. लायजियम स्पार्टम  हे भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील रुक्ष ठिकाणी वाढणारे गवत ‘एस्पार्टो’ या नावानेच व्यापारात ओळखतात. स्टायपाच्या दोन जाती (स्टा. कॅपिलॅटा  व स्टा. सिबिरिका ) पश्चिम हिमालयात आढळतात त्या खाल्ल्यामुळे अनुक्रमे मेंढ्यांना व अश्वादी पाळीव जनावरांना विषबाधा होते.

पहा : गवते ग्रॅमिनी.

जमदाडे, ज. वि.