गुजरात आयुर्वेद विद्यापीठ : गुजरात राज्यातील शुद्ध आयुर्वेदीय शिक्षण देणारे प्रसिद्ध विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना जामनगर या ठिकाणी १९६६ मध्ये झाली. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न व अध्यापनात्मक असून त्याच्या क्षेत्रात फक्त आयुर्वेदाचे अध्ययन करणारी गुजरात राज्यातील महाविद्यालये अंतर्भूत होतात. सध्या विद्यापीठात अध्यापनाचा व संशोधनाचा एकच विभाग आहे. मात्र दहा महाविद्यालये विद्यापीठास संलग्न केलेली आहेत. विद्यापीठाचे माध्यम गुजराती असून विद्यापीठात संलग्न महाविद्यालयांसह एकूण २,५९९ (१९७२) विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचा १९७२ चा अर्थसंकल्प २७,०१,४३२ रुपयांचा होता. अद्यापि हे विद्यापीठ प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
देशपांडे, सु. र.