चेक भाषा: चेक भाषा ही इंडो – यूरोपियन कुटुंबातील स्लाव्हिक गटाच्या पश्चिमेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषांतील एक महत्त्वाची भाषा आहे. तिच्याशी संबंधित अशा आणखी दोन महत्त्वाच्या भाषा पोलिश व स्लोव्हाक या आहेत.
चेक साहित्याची सुरुवात तेराव्या शतकात झाली. हॅप्सबर्ग राजसत्तेच्या आक्रमणानंतर त्याला उतरती कळा लागली पण एकोणिसाव्या शतकात त्याने पुन्हा डोके वर काढले. आज चेक ही एक अतिशय अभिव्यक्तिक्षम भाषा आहे.
अठराव्या शतकाच्या अखेरीस ही भाषा अतिशय मागासलेली होती. तिचा उपयोग फक्त सामान्य जनता व ग्रामीण भागातील लोक यांच्याकडूनच होत असे. हॅप्सबर्ग राजवटीची मेहेरनजर व्हावी म्हणून श्रेष्ठवर्गीय चेक लोक ऑस्ट्रियन दरबारातील उच्चपदस्थांच्या मागेमागे असत त्यामुळे ते जर्मन संस्कृतीने भारवलेले असत पण देशाच्या आर्थिक प्रगतीबरोबर एक प्रभावशाली मध्यमवर्ग उदयाला आला. त्याने चेक भाषेला राष्ट्रीय जीवनात योग्य स्थान मिळवून दिले प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण चेकमधून देण्याची व्यवस्था केली प्रागला जर्मन विद्यापीठाप्रमाणेच एक चेक विद्यापीठ स्थापन केले आणि प्राग हे चेक संस्कृतीचे केंद्रस्थान बनले.
या नवोदित वर्गाचा स्वाभिमान इतका प्रखर होता, की त्यांनी स्वभाषेतून जर्मन शब्दांची हकालपट्टी केली आणि त्यांच्या जागी नवनिर्मित चेक शब्द आणले. या भावनातिरेकाच्या भरात त्यांनी यूरोपियन भाषांत सर्वसामान्यपणे आढळणारे शब्दही काढून टाकले पण त्यामुळे चेक भाषा केवळ दूरच्या यूरोपियन भाषांपासूनच नव्हे, तर इतर स्लाव्हिक भाषांपासून अलग पडली. उदा., पोलिश वा रशियन भाषेत आढळणारा teatr (तेआत्र = रंगभूमी) सारखा शब्द टाकून त्यांनी दिवाद्लो (divadlo) हा एक नवाच शब्द बनविला. अशा प्रकारे सर्वसामान्य यूरोपियन संस्कृतीचे वैशिष्ट्य व्यक्त करणाऱ्या शब्द संग्रहापासून दुरावल्यामुळे चेक भाषा फार दुर्बोध बनली आहे. चेक भाषिकांची संख्या एक कोटीच्या घरात आहे.
ध्वनिविचार : यान हुस (१३६९ ? – १४१५) याने निश्चित केलेली लेखनपद्धती थोड्याअधिक प्रमाणात आजही चालू आहे. त्यापूर्वी म्हणजे तेराव्या शतकापासून चेक भाषा लॅटिन लिपीत लिहिली जाऊ लागली होती.
स्वर : आ, इ, ए, उ, ओ.
व्यंजने : स्फोटक : क, त, प, ब, द, ग, त’ , द’ .
अर्धस्फोटक : च, ज, च’, ज’.
घर्षक : फ, व, स, झ, श, झ’, ख, ह.
अनुनासिक : ङ, न, म, ञ.
पार्श्विक : ल
कंपक : र
अर्धस्वर : य, व.
अवतरणचिन्ह असलेली व्यंजने तालव्य आहेत.
रूपविचार : नाम : लिंगे मराठीप्रमाणे तीन आहेत. प्रत्येक नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असते. मात्र काही नामांत (डोळा, कान) द्विवचन टिकून राहिलेले आहे. विभक्ती सात आहेत : प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्ठी, सप्तमी व संबोधन.
सर्वनाम : प्रथम व द्वितीय पुरुषात वचनभेद आहे लिंगभेद नाही. तृतीय पुरुषात लिंगभेद व वचनभेद आहे.
प्र. पु. द्वि. पु. तृ. पु.
ए. व. या त्य् ओन ओना ओनो
अ. व. म्य् व्य् ओनी ओन्य् ओना ओन्य
विशेषण : विशेषणे नामाच्या लिंगवचनाशी संबंधित असतात. विशेषणाला प्रत्यय लागून क्रियाविशेषण बनते. काही क्रियाविशेषणे स्वयंभू आहेत.
क्रियापद : क्रियापद हे नामाप्रमाणे अत्यंत विकारक्षम आहे. पुढील उदाहरणे पहा : ओत्विराम् ओवनो (मी खिडकी उघडतो) चो द्येलाते (तू काय करतो आहेस?) नालेवाम् म्लेको (मी दूध ओततो आहे) आ चो द्येलाल् मिरोस्लाव (मिरोस्लाव काय करत होता?) चेत्ल् क्निहु (तो पुस्तक वाचत होता) चो तो चितेश् (तू काय वाचतो आहेस?)
संदर्भ : 1. Lee, W. R. Lee, Z. Teach Yourself Czech, London, 1964.
2. Meillet, Antoine, Les Langues dans I’ Europe nouvelle, Paris, 1928.
कालेलकर, ना. गो.
“