चिपेवा प्रमुख-ओकीमाकीक्वीड

चिपेवा : एक अमेरिकन इंडियन जमात. यांना ओजिब्वा असेही संबोधतात. अमेरिका व कॅनडाच्या काही राखीव भागांत यांची वस्ती आढळते. १९६० मध्ये चिपेवांची लोकसंख्या अमेरिकेत ३०,००० व कॅनडात २०,००० होती. हे लोक उंच, बळकट शरीरयष्टीचे व तरतरीत आहेत. ते अल्गाँक्वियन भाषा बोलतात. उत्तम वक्ते व गोष्टी वेल्हाळ म्हणून त्यांची ख्याती आहे.

पंधराव्या शतकापर्यंत ते कपडा म्हणून झाडांच्या साली व जनावरांची कातडी वापरीत असत. चिपेवांचे मुख्य व्यवसाय मासेमारी, शिकार, शेती व अन्नसंकलन आहेत. हरिण, बीव्हर व ससे या प्राण्यांची ते शिकार करतात. यांचे मुख्य अन्न तांदूळ आहे. कंदमुळेही हे भक्षण करतात.

या लोकांत बहिर्विवाही व गणचिन्हवादी कुळी असतात. पितृसत्ताक पद्धती रूढ आहे. संपत्तीचा काही भाग सामुदायिक मालकीचा असतो. चिपेवांच्या अनेक उपजमाती आहेत परंतु त्या सर्वांवर नियंत्रण करू शकणारी केंद्रसत्ता नाही.

वसंत व शरद ऋतूंत ते मिदेकिविन नावाचा सण पाळतात. त्या वेळी ते धार्मिक गीते गातात व नृत्य करतात.

संदर्भ : 1. Hickerson, H, The South Western Chippewa, Washington, 1962.

भागवत, दुर्गा