चिनोपोडियम तेल : (कृमिबीज तेल). हे एक कृमिनाशक तेल असून ते चिनोपोडियम या लॅटिन नावाच्या वनस्पति वंशातील [चक्रवर्त किंवा चाकवत कुल → चिनोपोडिएसी] एका जातीपासून (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, प्रकार अँथेल्मिटिकम इ. अमेरिकन वर्मसीड मेक्सीकन टी) काढतात. ही वर्षभर जगणारी वनस्पती मूळची द. अमेरिका व वेस्ट इंडीज येथील आहे. द. भारत, बंगाल, सिल्हेट, काश्मीर व महाराष्ट्र येथे तत्सम भारतीय जाती (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, मेक्सिकन टी वर्मसीड) तणासारखी पाणथळ जागी आढळते. दोन्हींत बरेच साम्य असले, तरी ओळखण्यासारखे काही किरकोळ फरकही आहेत. ही सुंगधी, अनेक फांद्यांची उभी, सरळ व सु. एक मीटरपर्यंत उंच वाढणारी ⇨ओषधी ग्रंथियुक्त (प्रपिंडिय) केसाळ असते. पाने लहान, साधी, फार लहान देठाची, दातेरी व काहीशी खंडित व लांबट असतात. त्यांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस लांबट व पाने असलेला कणिश प्रकारचा शाखा युक्त [परिमंजरी → पुष्पबंध] फुलोरा असतो व त्यावर ऑगस्ट ते एप्रिलमध्ये बारीक फुले येतात. अमेरिकी कृमिबीज जातीच्या प्रकारात (अँथेल्मिंटिकममध्ये) फुलोऱ्याला पाने नसतात, हा दोन्ही वनस्पतींतील मुख्य फरक होय. शुष्क फळ [क्लोम → फळ] पापुद्र्यासारख्या सालीचे पण फुगीर असून त्यात फार बारीक (सु. ०·८ सेंमी. व्यासाची), वाटोळी, चकचकीत व पिंगट बीजे असतात. फळांना टर्पेंटाइन किंवा यूकॅलिप्टस (निलगिरी तेल) सारखा वास व तिखट आणि तुरट चव असते. झाडाला काहीसा कापरासारखा वास येतो. त्याच्या व बीजांच्या ऊर्ध्वपातनाने (बंद पात्रात पदार्थ तापवून बनणारी वाफ थंड करून मिळणारा पदार्थ जमविण्याच्या क्रियेने) काढलेले तेल कृमिनाशक असते यालाच ‘वास्तुक तेल’ [चिनोपोडियम आल्बम = वास्तुक (सं.), चाकवत (म.)] असे कोणी म्हणतात व कृमींचा नाश करणारे म्हणून ‘कृमिबीज तेल’ म्हणतात. (इं. वर्मसीड ऑइल). हे तेल फिकट पिवळे किंवा नारिंगी पिवळे असून त्याला उग्र वास व तिखट कडू चव असते त्यात ॲस्कॅरिडॉल हे प्रमुख कृमिनाशक द्रव्य सु. ४०-४५ टक्के असते शिवाय टर्पेनीन, सॅफ्रोल, सॅलिसिलेट, पी-सायमीन इ. द्रव्ये त्यात असतात वनस्पतीत (विशेषतः मुळात) सॅपोनीन असते. ते रासायनिक दृष्ट्या सिनीओलसारखे असून आतड्यातील अनेक जीवोपजीवींचा नाश करू शकते. ते जंत व अंकुशकृमी आणि अमीबीय आमांश यांवर देतात ते काळजीपूर्वकच वापरावे लागते. पाळीव पशूंच्या (कुत्री, मांजरे, डुकरे, घोडे, गाई, बैल, म्हशी, रेडे इ.) पोटातील जंत व अंकुशकृमीवरही या तेलाचा फार उपयोग होतो. अमेरिकी प्रकाराऐवजी भारतीय जाती वापरात आहे. मुंगपू (बंगाल) येथे अमेरिकी प्रकार (अँथेल्मिंटिकम) लागवडीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण व्यापारी दृष्ट्या तो अयशस्वी झाला. तथापि डेहराडून व इतरत्र अद्याप प्रयत्न सुरू आहेत. चि. बॉट्रिस ही भारतीय जाती वर वर्णिल्याप्रमाणे वापरतात. तेल थंड जागी व प्रकाशापासून सुरक्षित जागी ठेवावे लागते, कारण प्रकाशाचा त्यातील ॲस्कॅरिडॉलावर अनिष्ट परिणाम होतो. ह्या वनस्पतींची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे चाकवत कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
पहा : चिनोपोडिएसी.
संदर्भ : 1. Chopra, R. N. Badhwar, R. L. Ghosh, S. Poisonous Plants of India, Vol, 2, New Delhi, 1965.
2. Chopra, R. N. Nayar, S. L. Chopra, I. C. A Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1969.
3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol. 2, New Delhi, 1950.
पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.
“