चित्रचौकटी : चित्राचे संरक्षण होऊन सौंदर्यही वाढावे, म्हणून पूर्वीपासून चित्रांना चौकटी लावण्याची प्रथा आहे. चित्रांप्रमाणेच द्विमितीय शिल्पाकृती, नक्षीकाम, पडदे यांनाही चौकटी लावण्यात येतात. चित्रचौकटींमुळे कलाकृती योग्य जागी ठेवण्यास मदत होते.

चित्रचौकटींचा विकास वास्तुकलेच्या अनुषंगाने झाला. यूरोपात चर्चमधील साधुसंतांच्या चित्रांना योग्य जागी बांधून ठेवण्यास त्यांचा सुरुवातीला उपयोग होऊ लागला. प्रबोधनकाळात चित्रचौकटींना विशेष चालना मिळाली. सतराव्या शतकातील ‘बरोक’ कलासंप्रदायात चित्रचौकटी अधिक भव्य, ठसठशीत व रेखीव बनल्या. अठराव्या शतकात निरनिराळ्या चित्रशैलींप्रमाणे चित्रचौकटीही कधी नाजूक, तर कधी कोरीव बनल्या. पुढे त्यांना अधिक कलात्मक व प्रशस्त रूप प्राप्त झाले. अठराव्या शतकात चित्रचौकटींकरिता लाकूड, हस्तिदंत, चांदी, कचकडे इत्यादींचा उपयोग होत असला, तरी लाकूड हेच मुख्य माध्यम होते. त्यावर कोरीवकाम करून व त्यास चकाकी देऊन ते अधिक प्रभावी करण्यात येई. परंतु पुढे मागणी वाढल्याने साच्यातून निर्माण केलेल्या चित्रचौकटींचा वापर होऊ लागला. चित्रचौकटींचे घाऊक स्वरूपात उत्पादन होऊ लागले व त्यामुळे त्यांची कलात्मकता कमी होऊ लागली. एकोणिसाव्या शतकात सरासारख्या चित्रकारांनी आपल्या चित्रांस योग्य अशा चौकटी स्वतःच बनवून घेण्यास सुरुवात केली. बहुतेक आधुनिक चित्रकारही आपल्या चित्रांसाठी स्वतःच चित्रचौकटीची योजना करतात. चित्रचौकटींचे महत्त्व लक्षात घेऊन लंडन येथील ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’सारख्या संस्थांनी त्यांच्या शास्त्रोक्त अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

करंजकर, वा. व्यं.