चावी (चक्राची) : दंडावर बसविलेली कप्पी (किंवा दंतचक्र, प्रचक्र इ. प्रकारचे चक्र) सैल पडून सुटी फिरू नये म्हणून दंड व कप्पीचा तुंबा यांच्या सांध्यामध्ये घुसवावयाचा पट्टीसारखा लांबट पोलादी तुकडा. यापुढील मजकूर कप्पीच्या अनुषंगात दिला असला, तरी तो यंत्रात वापरण्यात येणाऱ्या इतर विविध चक्रांनाही लागू आहे. दंडातून कप्पीला मिळणारी पीडनशक्ती या चावीच्या मध्यस्थीतून जाते म्हणून त्या शक्तीप्रमाणे चावीची लांबी व रुंदी ठरवावी लागते. चावीवर येणारा भार कर्तन स्वरूपाचा असतो. साधारणतः चावीच्या जाडीचा अर्धा भाग दंडाला पाडलेल्या गाळ्यात असतो व बाकीचा अर्धा भाग कप्पीच्या तुंब्याला मधल्या आतल्या बाजूने पाडलेल्या गाळ्यात असतो. चावी आणि चावी बसण्याचे गाळे फार काळजीपूर्वक व तंतोतंत मापाप्रमाणे तयार करावे लागतात. कप्पी बसविताना प्रथम दंडावरच्या गाळ्यात चावी नीट दाबून बसवितात व नंतर त्यावर कप्पी सरकवून ठेवून बसवितात.

आ. १. चाव्यांचे मुख्य प्रकार : (अ) सपाट चावी (आ) डोक्याची चावी (इ) अर्धवर्तुळाकार चावी : (१) दंड, (२) कप्पी.

चाव्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी तीन मुख्य प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. (अ) मध्ये दाखविलेली चावी सपाट जातीची आहे आणि तिची उंची (जाडी) सर्व ठिकाणी सारखीच आहे. (आ) मध्ये दाखविलेल्या चावीला एकीकडे माथा घडविलेला आहे आणि तिच्या जाडीवर किंचित उतार दिलेला आहे. माथ्यामुळे ही चावी बसविणे व बाहेर काढणे सोपे जाते व उतारामुळे चावी बसविताना मदत होते. (इ) मध्ये अर्धवर्तुळाकार चावी दाखविली आहे. ती तयार करणे सोपे असते व तिचा गाळाही चक्रीकर्तन (मिलिंग) यंत्रावर सहज तयार करता येतो. फार मोठ्या आकाराच्या रुंद चाव्यांच्या टोकाजवळ लहान भोके पाडून त्यामध्ये सेट-स्क्रू (चावी व गाळा यांचा स्पर्श घट्ट होण्यासाठी वापरण्यात येणार स्क्रू) बसविण्यासाठी आटे पाडलेले असतात. चावी गाळ्यातून वर काढण्यासाठी या भोकामध्ये सेट-स्कू बसवून पान्याने फिरवितात. सेट-स्कूचे खालचे टोक गाळ्याच्या तळावर टेकले म्हणजे चावी गाळ्यातून वर सरकू लागते.  

आ. २. चावी गाळ्यांचा दंड : (१) दंड, (२) कप्पी.

चावीच्या दुसऱ्या एका प्रकारात दंडाच्या टोकावर सबंध परिघभर एकाच मापाचे अनेक अक्षीय गाळे पाडतात. त्या गाळ्यांच्या मधले भाग चावीसारखे उपयोगी पडतात. कप्पीच्या भोकातही याच मापाचे गाळे काढतात व कप्पी दंडावर सरकवून नीट बसविली म्हणजे त्यांचा जोड आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे होतो. या जोडातील कप्पीचे गाळे ब्रोचण (ब्रोचिंग) यंत्राने पाडतात आणि दंडावरचे गाळे चक्रीकर्तन यंत्रावर पाडतात. त्यामुळे सर्व मापांतील अचूकता साधता येते.

वैद्य, ज. शि.