ओसायरिस : प्राचीन ईजिप्तचा एक श्रेष्ठ देव. तो प्रामुख्याने मृतांचा तसेच पाताळाचा देव मानला गेला असला, तरी त्याच्याबाबत इतर कल्पनाही आढळतात: विश्वशक्तीशी निगडीत, मृतांचा निवाडा करणारा व त्यांना नवजीवन देणारा, मानवाचा निर्माता व माता-पिता, सुफलतेचा तसेच धान्य-वनस्पतींचा देव, सूर्यदेव, नाईल नदीच्या परिसरातील लोकांना कृषिविद्या, कला व संस्कृती यांचा परिचय करून देणारा आद्य राजा इ. त्यांतील उल्लेखनीय कल्पना होत. विश्वोत्पत्तिशास्त्रात ‘ गेब ’ (पृथ्वी) व ‘ नट ’ (स्वर्ग वा आकाश ) यांच्यापासून झालेल्या चार देवांतील ओसायरिस हा एक मानला गेला. तो इसिसचा बंधू व पती, होरस व अनुबिस यांचा पिता आणि सेत (थ) याचा जुळा भाऊ होता. होरस, इसिस आणि ओसायरिस अशा देवत्रयीरूपातही त्याची उपासना होत असे. ईजिप्तमध्ये ओसायरिस हे सुष्टतेचे व सेत हे दुष्टतेचे प्रतीक मानले जाई. सेतने ओसायरिसला विश्वासघाताने मारले आणि त्याचे प्रेत पेटीत बंद करून नाईल नदीत फेकले. इसिसने ती पेटी मिळविली पण सेतने पुन्हा त्या पेटीतील प्रेताचे चौदा तुकडे करून ते इतस्ततः फेकून दिले. इसिसने ते तुकडे एकत्र जुळवून ओसायरिसला जिवंत केले, अशी पुराणकथा आहे. प्रेत जोपर्यंत टिकून राहते, तोपर्यंत मृतास पुन्हा जिवंत करता येते वा त्याला मरणोत्तर सद्गती मिळते, ह्या कल्पनेतून ईजिप्तमध्ये ‘ ममी ’ करणाची प्रथा सुरू झाली असावी. ग्रीकांच्या डायोनायसस ह्या देवाशी ओसायरिसचे काही बाबतींत साम्य आहे. आबायडॉस हे ओसायरिसच्या उपासनेचे प्रमुख केंद्र होते तथापि सर्व ईजिप्तभरही त्याची उपासना होत होती. आबायडॉस येथे त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरे व दूरदूरच्या भागांतून ममी केलेले मृतदेह तेथे आणून पुरत. त्याच्या विविध रूपांतील प्रतिमा आढळत असल्या, तरी राजमुकुटधारी आणि हातांत प्रतोद व वक्रदंड असलेल्या त्याच्या ममी-रूपातील प्रतिमाच विशेष प्रचलित होत्या.
संदर्भ : Cooke, H.P. Osiris : A Study in Myths, Mysteries and Religion, London, 1931.
सुर्वे, भा. ग.