ओल्डॅम : इंग्लंडच्या लँकाशर परगण्यातील कापड-उद्योगाचे शहर. लोकसंख्या १,०५,७०५ (१९७१). हे मेडलॉक नदीवर मँचेस्टरच्या ९ किमी. ईशान्येस व लिव्हरपूलच्या ५९ किमी. पूर्वेस आहे. कापडधंद्यास योग्य अशी दमट हवा, मुबलक पाणीपुरवठा, आसमंतात कोळशाच्या खाणी व कुशल विणकरांची परंपरा यांमुळे येथे सतराव्या शतकापासून तागाचे, रेशमी, सुती व लोकरी उच्च दर्जाचे कापड होऊ लागले. कापड-उद्योगाशिवाय येथे यंत्रसामग्री, प्लॅस्टिक, कातडी कमावणे, धातुकाम इत्यादींचे उद्योगही महत्त्वाचे आहेत. येथील कलासंग्रहालय महत्त्वाचे समजले जाते.
यार्दी, ह. व्यं.