ओर्स्टेड, हॅन्स क्रिश्चन : (१४ ऑगस्ट १७७७—९ मार्च १८५१).डॅनिश भौतिकी विज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. विद्युत् चुंबकत्वाचे आद्य शोधक. त्यांचा जन्म रूकबिंग येथे झाला. त्यांनी कोपनहेगन विद्यापीठाची औषधिविज्ञानाची पदवी १७९७ मध्ये व तत्त्वज्ञानाची डॉक्टरेट १७९९ मध्ये मिळविली. काही काळ परदेशात प्रवास केल्यानंतर १८०६ साली कोपनहेगन विद्यापीठात त्यांची भौतिकी व रसायनशास्त्राच्या प्राध्यापक पदावर नेमणूक झाली. १८२९ मध्ये त्यांनी डॅनिश अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली व त्या संस्थेचे ते पहिले संचालक झाले.
प्रारंभी त्यांनी प्रणिजन्य विद्युत् व ध्वनिशास्त्र यांविषयी आणि नंतर सु. ३० वर्षे द्रव आणि वायू यांच्या संपीड्यतेसंबंधी (संकोच पावण्याच्या क्षमतेसंबंधी) संशोधन केले. धातुरूप ॲल्युमिनियम तयार करण्याची पद्धती (१८२५) व पायपरडिनाचा शोध (१८२०) हे त्यांचे रसायनशास्त्रातील महत्त्वाचे कार्य आहे. रासायनिक व चुंबकीय प्रेरणा आणि प्रकाश यांचा विद्युतीय पाया एकच आहे असे त्यांनी प्रतिपादन केले होते. विद्युत् प्रवाहामुळे चुंबकीय सूची विचलित होते असे त्यांना एका व्याख्यानाप्रसंगी १८२० साली आढळून आले. या शोधाचे महत्त्व तत्कालीन शास्त्रज्ञांना लवकरच कळून आले व ओर्स्टेड यांची नामवंत शास्त्रज्ञांत गणना होऊ लागली.
लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना कॉप्ली पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. शास्त्रीय विषयांवर त्यांनी अनेक लोकप्रिय लेख लिहिले व सर्वसामान्य जनतेत शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने त्यांनी १८२४ मध्ये एक संस्था स्थापन केली. रसायनशास्त्र, अध्यात्मवाद व सौंदर्यशास्त्र या विषयांवरही त्यांनी लेखन केले. १९३४ साली चुंबकीय क्षेत्र बलाच्या एककास त्यांच्या सन्मानार्थ ‘ओर्स्टेड’ हे नाव देण्यात आले. ते कोपनहेगन येथे मृत्यू पावले.