एलियट, चार्ल्स विल्यम: (२० मार्च १८३४ ­­­— २२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व थोर विचारवंत. बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे एका सामान्य कुटुंबात जन्मला. हार्व्हर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानतंर तेथेच त्याने १८५४ ते ५८ पर्यंत पाठनिर्देशकाचे काम केले. पुढे तो १८५८ मध्ये गणित व रसायनशास्त्र या विषयांत साहाय्यक प्राध्यापक झाला. १८६३ मध्ये ह्या पदाचा राजीनामा देऊन दोन वर्षे तो यूरोपमध्ये पुढील अभ्यासाकरिता गेला. त्यानंतर त्याची मॅसॅचूसेट्सच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ ह्या संस्थेत वैश्लेषिक रसायनशास्त्र याचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुन्हा तो काही दिवस यूरोपच्या दौऱ्यावर गेला. ह्यावेळी त्याने यूरोपच्या एकूण शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला आणि तत्संबंधीचे आपले विचार अटलांटिक मंथली या नियतकालिकात द न्यू एज्युकेशन : इट्‍स ऑर्गनायझेशन ह्या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. त्यामुळे हार्व्हर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष म्हणून त्याची १८६९ मध्ये निवड झाली. तो चाळीस वर्षे म्हणजे १९०९ पर्यंत तेथे होता. या काळात त्याने हार्व्हर्ड विद्यापीठाच्या प्रशासनपद्धतीत, अभ्यासक्रमात व शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल केले त्यामुळे त्याची कीर्ती जगभर पसरली. शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत त्यास ख्रिस्टोफर सी. लँग्‍डल ह्यांचे सहकार्य लाभले. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्याने लोकसेवेत घालविले. नागरी सुधारणेचा तो पुरस्कर्ता होता, तसेच दारूबंदी व राष्ट्रसंघ ह्यांचा तो समर्थक होता. कार्नेगी प्रतिष्ठानचा विश्वस्त व सामान्य शिक्षणमंडळाचा सदस्य ह्या नात्यानेही त्याने भरीव कामगिरी केली आहे. तो वयाच्या ९३ व्या वर्षी नॉर्थ ईस्ट हार्बर (मेन) ह्या ठिकाणी मरण पावला.

त्याने विविध विषयांवर लेखन केले. त्यांत शिक्षणास अधिक प्राधान्य होते. त्याची काही प्रमुख पुस्तके : (१) ए कॉम्पेंडियस मॅन्युअल ऑफ क्वॉलिटेटिव्ह केमिकल ॲनॅलिसिस, सहलेखक एफ्. एच्. स्टोरर (१८६९). (२) द हॅपी लाइफ (१८९६). (३) अमेरिकन काँट्रिब्युशन्स टू सिव्हिलायझेशन अँड अदर एसेजअँड ॲड्रेसिस (१८९७). (४) एज्युकेशनल रिफॉर्म, एसेज अँड ॲड्रेसिस  १८६९­­­—१८९६ (१८९८). (५) मोअर मनी फॉर द पब्‍लिक स्कूल्स (१९०३). (६)युनिव्हर्सिटी ॲड्‍‍मिनिस्ट्रेशन (१९०६). (७) द ड्युरेबल सॅटिस्फॅक्शन्स ऑफ लाईफ (१९१०). (८) ए लेट हार्व्हेस्ट (१९२४) आणि (९) कॉन्‌फ्‍लिक्ट बिट्‍‍विन इंडिव्हिज्युएलिझम अँड कलेक्टिव्हिझम इन ए डेमॉक्रसी. ह्यांशिवाय त्याने हार्व्हर्ड क्‍लासिक्स (१९०९­­­–१९१०) ह्या पन्नास खंडांच्या ग्रंथांचे संपादन केले. त्याचे काही स्फुट लेख चार्ल्स विल्यम एलियटद मॅन अँड हिज बिलिफ्स (१९२६) ह्या शीर्षकाखाली पुस्तकरूपाने डब्ल्यू. ए. नील्सन ह्याने संपादित केले आहेत.

देशपांडे, सु. र.