एलायजा, बेन सॉलोमन: (२३ एप्रिल १७२० — ९ ऑक्टोबर १७९७). एक हिब्रू विद्वान व ज्यू- धर्ममीमांसक. व्हिल्ना, हेग्रा किंवा व्हिल्ना गाओन या नावांनीही तो ओळखला जातो. लिथ्यु एनियातील (रशिया) एका गावी जन्म. प्राचीन ज्यू-धर्मसाहित्याचा बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करून त्याच्या शास्त्रीय अभ्यासाची परंपरा त्याने निर्माण केली. त्यासाठी गणित, खगोलशास्त्र, इतिहास, व्याकरण यांसारख्या विषयांच्या परिशीलनाची गरज किती मोठी आहे, हेही त्याने पटवून दिले आणि या विषयांवरील ग्रंथांच्या हिब्रू भाषांतर कार्याला चालना दिली. त्याने प्रसिद्ध केलेल्या ज्यू-धर्ममीमांसेचा अभ्यास पुढील पिढ्यांनी सातत्याने केला. ज्यू-धर्मविधी, ज्यू-गूढवाद यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व प्राचीन धर्मसंहितांची पाठचिकित्सा या बाबतींत व्हिल्नाचे कार्य फार मोठे आहे.
जाधव, रा. ग.