कुंझरू, हृदयनाथ : (१ ऑक्टोबर १८८७ –). एक प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व उदारमतवादी विचारवंत. आग्रा येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्याचे शिक्षण अलाहाबाद, अलीगढ, बनारस, आग्रा व लंडन या ठिकाणी झाले. बी. एस्सी. (लंडन)., बी. एस्सी., एल्एल्. डी. वगैरे पदव्या संपादन करून १९०९ साली भारत सेवक समाजात
आजीव सभासद म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि आजन्म ब्रह्मचारी राहून प्रस्तुत सोसायटीस वाहून घेतले. पुढे १९२१ ते १९२३ च्या दरम्यान ते संयुक्त प्रांताच्या विधानपरिषदेचे सभासद झाले. १९२७ ते १९३० च्या दरम्यान ते मध्यवर्ती विधानसभेचे सभासद झाले आणि पुढे १९५२ ते १९६२ च्या काळात राज्यसभेचे सभासदत्व त्यांना मिळाले. त्यांना नॅशनल लिबरल फेडरेशन आणि भारत सेवक समाज या संस्थांचे अध्यक्षपद अनुक्रमे १९३४ व १९३६ पासून मिळाले. तत्पूर्वी ईस्ट आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे ते १९२९ मध्ये अध्यक्ष झाले. याशिवाय इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, अनेक परदेशी शिष्टमंडळे यांचेही ते सभासद होते. शिक्षण, रेल्वे, संरक्षण व परराष्ट्रीय धोरण इ. क्षेत्रांत त्यांनी विशेष कर्तबगारी दाखविली. राज्य पुनर्रचना समितीवर त्यांची १९५३ ते १९६५ या काळात सभासद म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी परदेशांतील भारतीयांची परिस्थिती अवलोकन करण्यासाठी केन्या, फिजी, हवाई बेटे, मलाया –श्रीलंका इ. देशांचे दौरे काढले. सौजन्य, अभ्यासू वृत्ती, मुद्देसूद विचारमांडणी वगैरे गुणांमुळे सर्व पक्षांत त्यांच्याबद्दल आदर आहे. राजकारणात त्यांचा दृष्टिकोन नेहमीच उदार, शांततावादी व वैधमार्गी होता. सरकार त्यांची निरनिराळ्या महत्त्वाच्या समित्यांवर नेमणूक करी. भारतीय आदिम जाती सेवक संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते १९६७ पासून काम करीत आहेत. अस्पृश्यता, जातिव्यवस्था इ. विरुद्ध ते नेहमी झगडले आहेत. तत्संबंधीचे आपले विचार त्यांनी पब्लिक सर्व्हिसिस इन इंडिया या पुस्तकात तसेच स्फुट लेखांत व्यक्त केले आहेत.
देवगिरीकर, त्र्यं. र.
“