कोसंबी, दामोदर धर्मानंद: (३१ जुलै १९०७–२९ जून १९६६). एक प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ. जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रा. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे वडील. लहानपणीच ते वडिलांबरोबर अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केली (१९२९). विद्यार्थिदशेत प्राक्षेपिकीचा (बॅलिस्टिक्स) एक छंद म्हणून त्यांनी अभ्यास केला. त्यांनी गणितातील ‘रामानुजम् मेमोरियल पारितोषिक’ (१९३४) व ‘भाभा पारितोषिक’ (१९४७) मिळविले. ते काही काळ अमेरिका (१९४८-४९) व इंग्लंड (१९४९) यांमध्ये अधिछात्र म्हणून काम करीत होते. पुढे प्रिन्स्टन व शिकागो येथे प्रगत अभ्यासासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून गेले. या वेळी त्यांनी आइन्स्टाइन व वेब्लेन या प्रसिद्ध व्यक्तींबरोबर अनेक शास्त्रीय विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांना परदेशांतून अभ्यागत प्राध्यापक म्हणून अनेक निमंत्रणे आली. त्यांपैकी फक्त रशिया व चीन येथीलच निमंत्रणे त्यांनी स्वीकारली.
त्यांनी विविध विषयांचा अभ्यास केला. ‘अणुऊर्जेचा शांततेसाठी कसा उपयोग होईल’ या विषयावर ‘सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (रशिया) मध्ये त्यांनी व्याख्यान दिले. आनुवंशिकीतील गुणसूत्रांमधील अंतराचे महत्त्व त्यांनी विशद केले. नाणकशास्त्र हे एक शास्त्र आहे, हे त्यांनी असंख्य नाण्यांच्या अभ्यासावरून सिद्ध करण्याचा यत्न केला. त्यांच्याकडे सूक्ष्म पाषाण आयुधांचा मोठा संग्रह होता. कार्ले येथील ब्राह्मी लिपीचा शोध व पूर्वाश्म संस्कृतीचे अनेक अवशेष व तत्संबंधीची तार्किक अनुमाने, यांवरून पुरातत्वविद्या विषयांतील त्यांच्या सखोल अभ्यासाची कल्पना येते. संस्कृत भाषा व इतिहास यांचाही त्यांनी अभ्यास केला. भर्तृहरीची शतके आणि विद्याकराचा सुभाषितरत्नकोष हे ग्रंथ त्यांनी सटीप संपादिले. अखेरच्या दिवसांत ते कौटिल्यलिखित अर्थशास्त्राचा समग्र अनुवाद करीत होते. त्यांचे इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी (१९५६), एन्शंट इंडिया (१९६५) व मिथ अँड रिॲलिटी हे मान्यवर ग्रंथ आहेत. विविध क्षेत्रांतील त्यांचे अनुभव व विचार त्यांनी स्फुट लेखांद्वारे प्रसिद्ध केले. त्यांच्या लेखनकार्याचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्यांचे समग्र लेखन संकलित करण्याकरिता उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आहे. ते पुण्यात निधन पावले.
देशपांडे, सु. र.
“