कृष्णराव, अरकलगूडु न.: (९ मे १९०८–८ जुलै १९७१). अष्टपैलू कन्नड लेखक. जन्म कर्नाटकातील कोलार येथे. ‘अ. न. कृ.’ या नावानेच ते कन्नड साहित्यात विशेष प्रसिद्ध आहेत. बहुमुखी व्यक्तिमत्त्व आणि उज्ज्वल प्रतिभेचे वरदान लाभलेले कादंबरीकार, नाटककार, पत्रकार आणि टीकाकार म्हणून ते गाजले असले, तरी त्यांची विशेष ख्याती झाली ती कादंबरीकार म्हणूनच. शिक्षण घेण्यासाठी सर्व प्रकारची अनुकूलता असूनही, त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच थांबले. पारंपरिक शिक्षणाने त्यांची बौद्धिक भूक भागू शकली नाही. आपल्या बालपणीच ते पंडित तारानाथ या प्रतिभासंपन्न व्यक्तीच्या संपर्कात आले. राष्ट्रनिष्ठा व कन्नड भाषेवरील उत्कट प्रेम यांनी भरल्या गेलेल्या अ. न. कृ. यांनी १९० वर ग्रंथरचना केली.
मदुषेयो मनेहाळो (१९२८), आहुति (१९३०), रजपूत लक्ष्मी (१९४५), जगज्योती बसवेश्वर (१९४९) ही नाटके किडि (१९३१), अग्निकन्ये (१९४७) हे कथासंग्रह होसहुट्टू (१९३२) हा प्रबंध वीरशैव साहित्य मत्तु संस्कृति (१९४३) हा समीक्षात्मक दर्जेदार ग्रंथ ही त्यांची उल्लेखनीय ग्रंथसंपदा होय. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांची संख्या शंभराहून अधिक भरते. त्यांत जीवनाच्या विविध अंगोपांगाचे दर्शन घडते. चित्रकाराच्या जीवनावरील उदयराग (१९३४), गायकाच्या जीवनावरील संध्याराग (१९३८), नटाच्या जीवनावरील नटसार्वभौम (१९४४), साहित्यिकाच्या जीवनावरील साहित्यरत्न (१९५३) ह्या कलावंतांच्या जीवनावरील त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या. हृदस्पर्शी कौटुंबिक जीवनाचे दर्शन त्यांच्या मंगलसूत्र (१९४०), ताईयकरुळु (१९५०) इ. कादंबऱ्यांतून घडते. गृहलक्ष्मी (१९५३), रुक्मिणी (१९५४) व ताईमक्कळु (१९५५) ह्या तीन कांदबऱ्यांत भारतीय संस्कृतीचे उदात्त व आदर्श चित्र त्यांनी रेखाटले आहे. नग्नसत्य, शनिसंतान, संजेगत्तलु ह्या वेश्याजीवनावरील त्यांच्या १९५०–५६ च्या दरम्यान लिहिलेल्या कादंबऱ्या. विजयानगर साम्राज्याचा समग्र इतिहासही त्यांनी कादंबरीरूपाने नऊ भागांत ग्रथित केला आहे. त्यांनी संपादित केलेला भारतीय संस्कृति दर्शन (१९६२) हा ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण आहे.
अ. न. कृ. यांनी कन्नडमध्ये प्रगतिशील लेखकांची चळवळ सुरू करून, कन्नड कादंबरीला नवे वळण लावले. त्यांची शैली आकर्षक असून प्रसंग व वातावरणनिर्मितीत त्यांचा हातखंडा आहे. प्रासादिक व ओघवते संवाद त्यांच्या कादंबरीचे खास वैशिष्ट्य होय.
कथांजली (१९२८), कन्नडनुडि (१९३९) व कर्नाटक साहित्य परिषत् पत्रिका (१९४४-४५) ह्या नियतकालिकांचे ते संपादक होते. कन्नड व इंग्रजी भाषांतील त्यांचे वक्तृत्वही उत्तम होते. १९६८ मध्ये मणिपाल येथे भरलेल्या बेचाळिसाव्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. म्हैसूर विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या जीवनावर आणि साहित्यावर अनुक्रमे अ. न. कृ. (१९४७) आणि रसचेतन (१९७०) हे गौरवग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
वर्टी, आनंद