कृष्णमूर्ति, जे.: (११ मे १८९५– ). प्रख्यात भारतीय विचारवंत. जन्म तमिळनाडू राज्यातील मदनपल्ली (जि. चित्तूर) येथे. वडिलांचे नाव नारायण अय्या. आडनाव जिद्दू. १९०९ मध्ये सी. डब्ल्यू. लेडबीटर व मिसेस ⇨ॲनी बेझंट यांना अंतर्ज्ञानाने, केवळ तेरा वर्षे वयाच्या कृष्णमूर्तीमध्ये त्याच्या उज्ज्वल भावी आयुष्याची (विशेषे करून मैत्रेय जगद्गुरूशी मीलनाच्या शक्यतेची) पूर्वचिन्हे दिसली. त्यामुळे त्यांनी कृष्णमूर्तीच्या शालेय आणि आध्यात्मिक शिक्षणाची जबाबदारी पतकरण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार कृष्णमूर्तीच्या वडिलांनी प्रथम कृष्णमूर्तींना त्यांच्या स्वाधीन करण्याचा करार केला. तथापि नंतर मात्र त्यांनी मुलाचा (कृष्णमूर्तीचा) ताबा मिळावा म्हणून दावा दाखल केला. प्रिव्ही कौन्सिलने मिसेस बेझंटच्या बाजून निकाल दिला (१९१२–१४). १९१४ ते २१ ह्या काळात मिसेस बेझंट यांनी खाजगी रीत्या नामांकित शिक्षकांकरवी कृष्णमूर्तीचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण करून घेतले, तसेच कृष्णमूर्तीच्या आध्यात्मिक कार्याकरिता १९११ मध्ये ‘पूर्वतारक संघ’ (द ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट) ह्या संस्थेची आणि तिच्या हेराल्ड ऑफ द स्टार ह्या मुखपत्राची स्थापना केली. संघाच्या प्रमुखपदी त्यांनी कृष्णमूर्तीची स्थापना केली. ‘पूर्वतारक संघा’चे १९२८ मध्ये सु. एक लाख सभासद होते. हॉलंडमध्ये एक किल्ला व सु. २,०२५ हे. जमीनही संघास देणगी म्हणून मिळाली होती. संघाचे वार्षिक मेळावे भरत, तसेच जगद्गुरूशी मीलन झाल्याची घोषणा होऊन कृष्णमूर्तीची स्वतंत्र विचारांनी ओतप्रोत अशी प्रवचनेही होत. त्यामुळे कृष्णमूर्तींची कीर्ती जगभर पसरली. तथापि १९२८ मध्ये कृष्णमूर्तींनी, व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती गुरूमार्फत वा संस्थेमार्फत होत नसते, तर ती व्यक्तीने स्वतःच करून घ्यावयाची असते, असे मत प्रतिपादन करून काहीही पूर्वसूचना न देता संस्थेचे व तिच्या मुखपत्राचे विसर्जन केले. यानंतर महायुद्धाचा काळ सोडल्यास आजपावेतो ते स्वतःच्या मतांचा जगभर प्रचार करत आहेत.
परलोक, परमेश्वर, पुनर्जन्म, प्रकृति पुरुष इ. तात्त्विक वादग्रस्त विषय कृष्णमूर्तींनी बाजूला सारून, आपले इहलोकीचे जीवन समृद्ध कसे होईल, हाच विषय आपल्या आध्यात्मिक चिंतनाचा केंद्रबिंदू ठरविला. सध्या आपले सामाजिक जीवन कलह, द्वेष, मत्सर, युद्धे इत्यादींनी आणि वैयक्तिक जीवन काळजी, भीती, दुःखे इत्यादींनी भरलेले आहे. याच्या मुळाशी मन-बुद्धी यांविषयीचे आपले अज्ञानच आहे. मन-बुद्धीची मुख्य वैगुण्ये पुढीलप्रमाणे होत : (१) मन पूर्वसंस्कारांनी बद्ध आहे. (२) आपण समस्यांची वर्णने, चिकित्सा, उपाय योजना इ. करताना परिस्थितीला परस्परविरोधी मर्यादा घालतो. (३) मर्यादा, व्याख्या वगैरेंचा कर्ता ‘मी’ याला आपण अवास्तव महत्त्व देतो. (४) पूर्वानुभवावर विसंबल्याने नित्यनूतन वर्तमानाचा आपणास विसर पडतो. या सर्व चुकांवर कृष्णमूर्तीच्या मते एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, आपल्या मनाच्या सर्व व्यापारांकडे आपण स्तब्धतेने, त्यांना चांगले-वाईट न म्हणता अथवा त्यांबाबत कुठलीही अभिलाषा न बाळगता, निव्वळ पाहणे किंवा त्यांची अवधानपूर्वक संपूर्ण जाणीव बाळगणे (अवेअरनेस) हा होय. यामुळे चुकांचे मिथ्यात्व उघड होऊन, सत्याचा प्रादुर्भाव होतो. मन अधिक विचलित न झाल्यास प्रादुर्भूत सत्य दृढ होते. अशा प्रकारे स्तब्धतेने चुकांचे परिमार्जन-निरसन करणे, म्हणजेच ध्यान होय. एकंदरीत कृष्णमूर्तींनी प्रतिपादन केलेला मार्ग अध्यात्माचा अथवा तत्त्वमीमांसेचा नसून, तो ज्ञानमीमांसात्मक योगमार्ग म्हणजे ‘समत्व योग’ आहे.
कृष्णमूर्तीचे ग्रंथलेखन इंग्रजीत असून त्यांतील प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम (१९५४), एड्यूकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाइफ (१९५५), कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग (तीन मालांत – १९५६, ५९, ६०), लाइफ अहेड (१९६३), धिस मॅटर ऑफ कल्चर (१९६४), फ्रीडम ऑफ द नोन (१९६९), द ओन्ली रेव्हील्यूशन (१९७०), द अर्जन्सी ऑफ चेंज (१९७१) इत्यादी. यांशिवाय त्यांच्या प्रवचनांचे व भाषणांचे सु. पंचाहत्तर संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी पेंग्विन कृष्णमूर्ती रीडर (१९७०) उल्लेखनीय आहे.
संदर्भ : 1. Fouere, Rene Trans. Krishnamurti : The Man and His Teaching, Bombay, 1964.
२. जोशी, चं. गु. जीवनाचा नवा विचार, पुणे, १९७३.
धोपेश्वरकर, आ. धों.
“