गाडगीळ, गंगाधर : (२५ ऑगस्ट १९२३– ). आधुनिक मराठी साहित्यिक. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन. जन्म आणि शिक्षण मुंबईत. अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन एम्.ए. झाले. १९४६ पासून सु. २५ वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. नंतर एका खाजगी उद्योगसमूहाचे सल्लागार.
महाविद्यालयात शिकत असतानाच कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. मानसचित्रे (१९४६), कडू आणि गोड (१९४८), नव्या वाटा (१९५०), तलावातील चांदणे (१९५४), पाळणा (१९६१) हे त्यांचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. वेगळे जग (१९५८), गाडगीळांच्या कथा (१९५८) व गुणाकार (१९६५) ह्या संग्रहांत त्यांच्या निवडक कथा एकत्र केलेल्या आहेत. मराठी कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे. मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व ह्यांत अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, ह्याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी वेध घेतला. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले आहे. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यांमुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले आहे. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. गाडगीळांच्या कथाविश्वातील व्यक्ती मध्यमवर्गीयच असल्या, तरी त्यांच्या अनुभवांकडे सखोलतेने पाहण्याच्या वृत्तीमुळे त्यातील जीवनदर्शन अस्सल वाटते.
लैंगिक मनोवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी लिलीचे फूल (१९५५) ही त्यांची पहिली कादंबरी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील दुर्दम्य (खंड १,१९७० आणि खंड २,१९७२ ) ही त्यांची कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरीलेखनाचा मराठीतील एक महत्त्वाचा प्रयोग होय.
प्रायोगिक रंगभूमीवर आलेले ज्योत्स्ना आणि ज्योती (१९६४) हे समस्याप्रधान नाटक वगळल्यास त्यांचे एकांकिकादी इतर नाट्यलेखन खेळकर विनोदाने नटलेले असून, महाविद्यालयीन रंगभूमीवर खूपच लोकप्रिय झालेले आहे. मुंबईच्या तरूण कारकुनांच्या जीवनातील छोट्यामोठ्या विसंगती रंगविणारी खरं सांगायचे म्हणजे (१९५४) आणि बंडू (१९६१) ही पुस्तकेही त्यांच्या उपहासप्रचुर, खुसखुशीत व हलक्याफुलक्या विनोदनिर्मितीचा प्रत्यय देतात.
गोपुरांच्या प्रदेशात (१९५२) व सातासमुद्रांपलीकडे (१९५९) ही अनुक्रमे दक्षिण भारत आणि यूरोप येथील प्रवासवृत्ते त्यांतील संस्कारचित्रांच्या लालित्यपूर्ण रेखाटनांमुळे लक्षणीय ठरलेली आहेत.
ललित साहित्याच्या सिद्धांताची आणि नवसाहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे खडक आणि पाणी (१९६०) व विविध साहित्यप्रकारांतील अभिजात मराठी ग्रंथांचे रहस्योद्घाटन करणारे साहित्याचे मानदंड (१९६२) ही त्यांची पुस्तके साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात मान्यता पावली आहेत. लखूची रोजनिशी (१९४८), मार्क ट्वेनच्या टॉम सॉयर ह्या कादंबरीवरून लिहिलेले धाडसी चंदू (१९५१), आम्ही आपले थोर पुरुष होणार (१९५७) ह्यांसारखी बालांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकेही लोकप्रिय झाली आहेत. मुंबई आणि मुंबईकर (१९७०) ह्याचा त्यांच्या पुस्तकात मुंबईतील लोकजीवनाची जडणघडण कशी झाली, ह्याचा इतिहास वेधक शैलीत मांडलेला मांडलेला आहे. आर्थिक प्रश्न व अर्थरचना (१९५३), नियोजन आणि समृद्धी (१९६१) ही त्यांची काही अर्थशास्त्रविषयक पुस्तके होत.
मालशे, स.गं.