गागाभट्ट : (सतरावे शतक). वाराणसीचा एक शिवकालीन विद्वान ब्राह्मण. त्याचे घराणे मूळचे पैठणचे. त्याचे पूर्वज वाराणसीस जाऊन राहिले. तेथे मूळ पुरुष नारायणभट्ट याने स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर, कर्तबगारीने व लोकसाहाय्याने मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारल्यामुळे त्याच्या घराण्यास आजवर चालू असलेल्या अग्रपूजेचा मान मिळाला. ह्या घराण्यात एकापेक्षा एक विद्वान पुरुष निपजले. हिंदुस्थानातील राजेरजवाडे आणि मुसलमान बादशाहाचे दरबारी या घराण्यातील विद्वान पुरुषांस मोठा मान देत. गागाभट्टाचे वडील दिनकरभट्टही विद्वान पंडित होते.
गागाभट्टाचे नाव विश्वेश्वरभट्ट. त्याने उत्कृष्ट विद्या संपादन केली. त्याची ग्रंथसंपदा विपुल आहे. मीमांसा, धर्मशास्त्र, न्याय, अलंकार, वेदान्त इ. विषयांचा तो प्रकांड पंडित होता.
गागाभट्ट आणि शिवाजी ह्यांचा संबंध १६६३ पासून आला. शिवाजीच्या राज्याभिषेकात त्याने पुढाकार घेतला होता. ह्या राज्याभिषेकासंबंधी अनेक अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. त्याकरिता त्याने अनेक विद्वान पंडितांशी चर्चा करून धर्मासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय तयार केले.
शिवाजी सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहे, हे त्याने सिद्ध केले. फक्त क्षत्रिय संस्कारांचा लोप झाला होता, म्हणून त्याने वैदिक विधींनी शिवाजीचे उपनयन करून पूर्वीच्याच विवाहित स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह लाविले. त्यासाठी त्याने राजाभिषेक प्रयोग नावाचा एक नवा ग्रंथही रचला. याचा समकालीन वाराणसीचा दुसरा प्रकांड पंडित कवींद्राचार्य सरस्वती हा नेमस्त, तर गागाभट्ट जहाल होता. मात्र शिवछत्रपतींनी त्यास विशेष पसंत केले.
गोखले, कमल