गांधी उठणे : (पित्त उठणे). त्वचेवर लाल, पांढरट, द्रवयुक्त असे फोड, खाज सुटून थोडा वेळ उठून नाहीसे होणाऱ्या विकाराला गांधी किंवा पित्त उठणे असे म्हणतात.

त्वचेतील केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या) हिस्टामीन या द्रव्यामुळे आणि रोहिणिका (रोहिणीपेक्षा लहान पण केशिकेपेक्षा मोठ्या रक्तवाहिन्या) ॲसिटिलकोलीन या द्रव्यामुळे एकदम प्रसारित होऊन त्यांच्यातून रक्तरस (रक्त गोठल्यावर उरणारा पिवळसर व न गोठणारा पेशीरहित द्रवपदार्थ) बाहेर पडून त्वचेच्या वरच्या वा आतल्या भागात साठतो, ही या रोगाची संप्राप्ती (कारणमीमांसा) आहे. गांधी उठण्याला अनेक कारणे असली, तरी त्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) विशिष्ट पदार्थांविरुद्ध अधिहर्षता (ॲलर्जी) उत्पन्न होणे हे आहे.

गांधी उठणे तीव्र वा चिरकारी (दीर्घकालीन) स्वरूपाचे असू शकते. मधमाशी, गांधील माशी वगैरे कीटकांच्या दंशामुळे त्वचेत जो विषारी पदार्थ टोचला जातो, त्याविरुद्धच्या अधिहर्षतेमुळे त्वचेवर पित्तासारखे फोड उठतात. कित्येक लोकांना उष्णता, पेनिसिलिनासारखी औषधे, रक्तरसाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन), ॲस्पिरीन व इतर औषधे, काही विशिष्ट अन्नपदार्थ यांची अधिहर्षता असल्यामुळेही पित्त उठते. भावनातिरेक, जंत वगैरे कारणांनीही पित्त उठते. कित्येक वेळा मूळ कारणच सापडत नाही. लोकरीसारख्या पदार्थांशी नेहमी संबंध येत राहिल्यास त्वचेवर स्थानिक पित्त उठते व पुढे त्याचे रूपांतर इसबात होते.

तीव्र प्रकारात त्वचेला एकाएकी खाज सुटून लाल फोड येतात. या फोडांचा मध्यभाग उंचावलेला आणि पांढरट असून त्याचा आकार एक सेंमी. पासून त्वचेच्या फार मोठ्या भागापर्यंत पसरलेला असतो. क्वचित तोंडातील श्लेष्मकलेवरही (अस्तर त्वचेवरही) असे फोड येतात. फार तीव्र प्रकारात स्वरयंत्राला अशीच सूज आल्यामुळे श्वासोच्छ्वासाला अडचण उत्पन्न होते. त्वचेवर पित्त उठल्यानंतर अगदी थोड्याच वेळात नाहीसे होते आणि त्वचा पूर्ववत होते.

चिरकारी प्रकारात पित्त वारंवार उठण्याची प्रवृत्ती असते. या प्रकारात भावनाक्षोभ आणि थकवा ही कारणे असू शकतात.

चिकित्सा : मूळ कारण सापडले तर ते नाहीसे करणे अथवा त्या कारणाशी संपर्क येणार नाही, अशी काळजी घेणे जरूर असते. जेथे मूळ कारण सापडत नाही तेथे ॲड्रेनॅलिनाच्या अंतःक्षेपणाचा त्वरित उपयोग होतो. प्रोमेथाझीन हायड्रोक्लोराइड, मेपायरॅमीन-मॅलिएट वगैरे हिस्टामीनविरोधी औषधांचा चांगला उपयोग होतो. कॉर्टिसोनाचाही उपयोग अतितीव्र प्रकारात करावा लागतो.

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा : ह्या विकारात वाताचे आधिक्य असेल तर शीतपित्त म्हणतात. कफाचे आधिक्य असेल तर उदर्द म्हणतात. जेव्हा एक चकंदल कमी होऊन दुसरे उत्पन्न होते तेव्हा त्याला उत्कोठ म्हणतात.

उपचार : शीतपित्तावर कडू पडवळ, निंब आणि अडुळसा ह्यांचे वमन द्यावे आणि त्रिफळा गुग्गुलू पिंपळी ह्यांचे विरेचन द्यावे. मोहरीचे तेल अंगास लावावे. गरम पाणी अंगावर शिंपडावे. चंदन, चारोळ्या व मध खावा. त्रिफळा मधाबरोबर त्याचप्रमाणे नवकार्षिक गुग्गुलू त्याला द्यावा, जुना गूळ घालून आल्याचा रस पिण्यास द्यावा. मोहरी, हळद, तरवड, तीळ ह्यांची चटणी मोहरीच्या तेलात घालून अंगाला घासावी. कोठ, उत्कोठ असताना महातिक्तकघृत पाजून शिरातून रक्तस्राव करवावा. वमन व रेचक देऊन कोठ्याची शुद्धी करावी नंतर कुष्ठघ्न चिकित्सा करावी. उत्कोठामध्ये कफपित्तनाशक चिकित्सा विशेषत्वाने करावी. आवळकठी आणि निंबादी पाने तुपाबरोबर खाण्याला द्यावी. आर्द्रक खंड द्यावा. उदर्दप्रशमन टेंभुरणे, चारोळ्या, बोरे इ. द्रव्यांचा उपयोग करावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील गांधी उठणे : मनुष्याप्रमाणेच प्राण्यांनाही शरीरावर गांधी उठण्याचा विकार होऊन त्यामध्ये अकस्मात गोल सपाट गांधी उठतात वकाही काळानंतर त्या झपाट्याने नाहीशा होतात. प्राण्यांमध्ये माणसांप्रमाणे कंड मात्र सुटत नाही. हा विकार प्रामुख्याने घोड्यांना होतो. क्रमवार गुरे, डुकरे, शेळ्यामेंढ्या आणि कुत्री ह्यांनाही विकार संभवतो.

गांधी उठण्याची कारणे खूपच आहेत. त्वचेचा आग्या वनस्पतीशी संपर्क झाल्याने किंवा कीटक चावल्यामुळे गांधी उठतात. अतिशय दाहक किंवा खाजरी द्रव्ये शरीरावर चोळवटल्यासही गांधी उठतात. क्वचित फार थंडी पडल्यामुळे किंवा शरीरात अपायकारक पदार्थ गेल्यामुळेही रोगाचा प्रकोप होतो. उदा., विषारी वनस्पती, कवकमिश्रित (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतिमिश्रित) वा बुरशी असलेले खाद्य, नासलेला भाजीपाला, प्राणिज खाद्यपदार्थ पोटात जाण्यानेही रोगप्रकोप होतो. काही प्राण्यांना विशिष्ट खाद्यपदार्थांविरुद्ध अधिहर्षता असते. असे पदार्थ खाण्यामुळे त्यांच्या शरीरावर ताबडतोब गांधी उठतात. प्राण्यांना उदरशोथ (उदराची दाहयुक्त सूज), अपचन वगैरे साधारण रोगांमध्ये किंवा अश्वासिकायजन्य रोग (ट्रिपॅनोसोमा इक्विपर्डम  नावाच्या परजीवीमुळे होणारा रोग, डूरीन), इन्फ्ल्यूएंझा, स्वरयंत्रशोथ, फुप्फुसशोथ वगैरे विशेष रोगांमध्येही त्वचेवर गांधी उठतात.

वरील सर्व प्रकारांत विषारी द्रव्ये शरीरात शोषली जाऊन त्वचेखालील रक्तवाहिन्यांच्या भित्तीतून रक्तरस अधिक प्रमाणात बाहेर झिरपतो. तो आंतरत्वचेत साचून त्वचेवर त्या ठिकाणी सूज येते.

गांधी बहुतेक चेहरा, मान, पाठ, पोट आणि मांड्या या भागांवर उठतात. रोग्याचे पोट बिघडलेले असते पण ज्वर नसतो त्वचेवर १ ते २ सेंमी. पासून ४ ते ५ सेंमी. व्यासाच्या व १ ते २ मिमी. जाडीच्या गांधी उठतात. पहिली गाठ उठल्यानंतर तासाभरातच सगळ्या गाठी दिसू लागतात व पुन्हा काही वेळातच रोग शमतो. फारच क्वचित गाठी पिकून फुटतात व जखम चिघळते. हा रोग निश्चित बरा होणारा असल्यामुळे त्यापासून नुकसान होत नाही.

गांधी उठल्यानंतर सहसा काही औषधोपचार करण्याची गरज भासत नाही, पण थंड पाणी अंगावर शिंपडल्यामुळे गांधी लवकर शमतात. लिंबाचा रस किंवा स्पिरिट त्वचेवर चोळल्याने सुद्धा फायदा होतो. विकार वरचेवर होऊ लागल्यास जनावराला सारक (सौम्य रेचक) आणि मूत्रल (लघवी साफ होणारी) औषधे देतात, तसेच हिस्टामीनविरोधी औषधे पोटात देतात किंवा टोचतात.

पंडित, र. वि.