गॅलिलीओ, गॅलिली: (१५ फेब्रु. १५६४ – ८ जाने. १६४२). इटालियन गणिती, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि भौतिकीविद. ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक होत. शास्त्रीय अध्ययनाची निरीक्षण, प्रयोग, गणित व सिद्धांत अशी तर्कशुद्ध पद्धती त्यांनी रूढ केल्याने त्यांना आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचेही जनक मानले जाते. त्यांचा जन्म इटलीतील पीसा गावी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण फ्लॉरेन्सजवळच्या व्हाललाँब्रॉझा येथे झाले. तेथे त्यांनी ग्रीक, लॅटिन, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, प्राचीन वाङ्‍मय, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना चित्रकला, संगीत आणि काव्य यांचीही आवड होती. वैद्यकाच्या अध्ययनासाठी १५८१ साली ते पीसा विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांनी ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मात्र त्यांचा कल गणिताकडेच होता. १५८१ सालीच त्यांनी एकदा चर्चेमध्ये टांगलेला दिवा हलत असताना त्याच्या आंदोलनांचे निरीक्षण केले व एका आंदोलनाला किती काळ लागतो हे नाडीचे ठोके मोजून पाहिले. त्यांना असे आढळून आले की, दिव्याचा झोका लहान असो वा मोठा, त्याच्या एका आंदोलनास लागणारा वेळ सारखाच असतो. अशा तऱ्हेने त्यांनी लंबकाची समकालैकता (प्रत्येक आंदोलनास समान काळ लागण्याचा गुणधर्म) शोधून काढून संबंधित नियमही तयार केले. शिवाय कालमापनासाठी लंबक वापरता येईल असेही त्यांनी सुचविले. मात्र १६३९ साली त्यांनी गतीसंबंधी एक महत्त्वाचा शोध लावल्यावरच लंबकाचा घड्याळात उपयोग होऊ लागला. १५८५ साली पैशाभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले.

त्यांनी १५८६ साली द्रवस्थैतिक म्हणजे वस्तूचे द्रवातील वजन करण्याचा तराजू शोधून काढला व त्यावर एक लेख लिहिला. तसेच त्या तराजूने घन पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व काढण्यास कसा उपयोग होतो, हेही त्यांनी दाखविले. त्यामुळे त्यांना इटलीभर प्रसिद्धी मिळाली. घन पदार्थाला गुरुत्वमध्य असतो, हे सिद्ध करून त्यासंबंधीचा लेख त्यांनी १५८८ मध्ये लिहिला, मात्र तो १६३८ मध्ये प्रसिद्ध झाला. गणितातील त्यांची गती पाहून १५८९ साली त्यांची पीसा विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांनी पदार्थांच्या गतीसंबंधीचे नियम प्रस्थापित केले. फेकलेल्या वस्तूच्या प्रक्षेपणाचा (फेकल्यावर पडण्याचा) मार्ग ॲरिस्टॉटल यांच्या मताप्रमाणे भूपृष्ठाला समांतर नसून तो अन्वस्ताकार (पॅराबोलिक) [→ अन्वस्त] असतो असे त्यांनी सांगितले व प्रक्षेपण गतींचे गणिताने स्पष्टीकरण देऊन खात्रीही करून दिली. जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल असे ॲरिस्टॉटल यांचे मत होते परंतु गॅलिलीओ यांनी असे प्रतिपादन केले की, भिन्न वजनाच्या वस्तूंचा पडण्याचा वेग सारखाच असतो. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दोन भिन्नभिन्न वजनाच्या वस्तू पीसाच्या झुकत्या मनोऱ्यावरून एकाच वेळी टाकल्या असता, त्या जमिनीवर बरोबरच पोहोचल्याचे सप्रयोग दाखवून दिले असे मानले जाते. पुढे पॅड्युआ येथे असताना त्यांनी वेगवेगळ्या वजनाचे गोळे उतरणीवरून घरंगळत जाऊ दिल्यास त्यांचा वेग सारखाच असतो असेही दाखविले. अशा प्रकारे प्रस्थापित मतांना विरोध केल्यामुळे त्यांना १५९१ साली पीसा विद्यापीठ सोडावे लागले. मात्र त्यांचे कार्य पाहून १५९२ साली त्याची पॅड्युआ येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांना ॲरिस्टॉटल व टॉलेमी यांची भूकेंद्रीय विश्वाची (पृथ्वी विश्वाच्या मध्याशी असल्याचे गृहीत धरणारी) कल्पनाच शिकवावी लागे. मात्र आपल्या कल्पना ते भाषणांद्वारे समजावून सांगत असत.

त्यांनी १५९३ साली साधा हवेचा तापमापक तयार केला. त्यात सुधारणा करीत जाऊन त्यांनी १६०७ साली प्राथमिक स्वरूपाचा व १६१२ साली अल्कोहॉलचा तापमापक बनविला. १५९७ साली त्यांनी सेक्टर (एक प्रकारचा कंपास) नावाचे उपकरण तयार केले. तशा प्रकारचे उपकरण अजूनही आरेखक वापरतात. त्यांनी चुंबकावर प्रयोग करून चुंबकत्वासंबंधी काही शोधही लावले. त्यांनी पदार्थाच्या बलासंबंधीचे प्रयोग केले होते. काही प्रमाणात त्यांनी निरूढीचे (पदार्थाची मूळची स्थिर किंवा गतिमान अवस्था न बदलण्याच्या प्रवृत्तीचे) नियम शोधून काढले होते, तर समतोलाचे नियम त्यांच्या संशोधनावर आधारलेले आहेत.

त्यांनी १६०४ साली ज्योतिषशास्त्राचे खरे अध्ययन सुरू केले. त्यांनी १६०९ साली दूरदर्शक (दुर्बिण) बनविण्यास सुरुवात करून पुष्कळ दूरदर्शक बनविले व काही विकलेही. त्यांच्या प्रथम दूरदर्शकाची वर्धनक्षमता (वस्तूची प्रतिमा मोठी करण्याची क्षमता) तीन होती. ती बत्तीसापर्यंत वाढविण्यात ते यशस्वी झाले. अंतर्गोल नेत्रिकेच्या (डोळ्याजवळील भिंगाच्या) प्रणमन प्रकारच्या (प्रकाशाच्या वक्रीभवनाच्या तत्त्वावर आधारलेल्या) दूरदर्शकाला गॅलिलीअन दूरदर्शक म्हणतात. ज्योतिषशास्त्रीय वेधांसाठी त्यांनी दूरदर्शकाचा प्रथम उपयोग केला. त्यांनी अनेक नवीन आश्चर्यकारक ज्योतिषशास्त्रीय गोष्टी शोधून काढल्या. १६१० साली ते पीसाला गणिताचे प्राध्यापक म्हणून परतले. शिवाय ते टस्कनीचे ग्रँड ड्यूक कॉझ्मो डेइ मेडिची यांचे गणिती व तत्त्वज्ञ होते. त्याच वर्षी ते फ्लॉरेन्स विद्यापीठाचे आजीव प्राध्यापक झाले. त्यांनी गुरूचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढले. दोन वर्षे वेध घेऊन या उपग्रहांचे आवर्तकालही (एका प्रदक्षिणेस लागणारे काळही) त्यांनी निश्चित केले. टस्कनीचे ड्यूक यांच्या कुटुंबनामावरून या उपग्रहांना त्यांनी डिसीयन तारका हे नाव दिले. परंतु गॅलिलीओ यांनी त्यांचे प्रथम निरीक्षण केल्यामुळे त्यांना गॅलिलीअन ज्योती किंवा उपग्रह असेही म्हणतात. दूरदर्शकातून त्यांना कृत्तिका व पुष्य तारकासमूहांत डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा जास्त तारे असल्याचे आढळले व आकाशगंगेत तर असंख्य तारे दिसले. चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशी असल्याचे ॲरिस्टॉटल यांचे मत होते. परंतु गॅलिलीओ यांनी चंद्रावर डोंगर व दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो असे दाखवून दिले. दूरदर्शकातून त्यांनी शुक्र, बुध व मंगळ यांच्या कला पाहिल्या व शनी लंबगोल दिसल्याचे सांगितले. मात्र त्यांना शनीची कडी त्याच्या बिंबापासून वेगळी अशी ओळखता आली नाहीत. त्यांच्या प्रारंभीच्या वेधांची माहिती असलेले Siderius Nuncius हे पुस्तक १६१० साली व्हेनिस येथे प्रसिद्ध झाले.

सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे तेच पहिले शास्त्रज्ञ होत. मात्र वराहमिहीर यांनी त्यांच्या हजारो वर्षे आधी सूर्यावरील डाग पाहिल्याचा त्यांच्या बृहत्संहितेत उल्लेख आहे. गॅलिलीओ यांनी या डागांचे निरीक्षण करून सूर्याला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास सु. सत्तावीस दिवस लागतात असेही सांगितले. Historia e Dimostrazioni intorno alle Macchie Solari हे सूर्यडागांसंबंधीचे त्यांचे पुस्तक १६१३ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी उघडउघड कोपर्निकस यांच्या मताला दुजोरा दिला असून त्याकरिता बायबलचाही हवाला देण्याचा प्रयत्‍न केला आहे, परंतु या पाखंडी मतांबद्दल त्यांच्यावर टीका होऊन त्यांचे समर्थन करू नये अशी ताकीदही त्यांना देण्यात आली (१६१६). १६११ साली ते रोमला गेले होते. तेथे त्यांनी पोप यांना व इतर धर्माधिकाऱ्यांना दूरदर्शकातून आकाशाचे स्वरूप दाखविले होते. त्यांना लिन्सी ॲकॅडेमीचे सभासदत्व देण्यात आले होते. त्यांचे Discorso intorno alle cosec he stanno in su l’aqua हे पुस्तक १६१२ साली प्रसिद्ध झाले. त्यामध्ये तरंगणाऱ्या पदार्थांसंबंधीचे विवेचन आहे. ताऱ्यांना दृक्‌च्युती (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्यास पार्श्वभूमीच्या सापेक्ष स्थानात होणारा भासमान बदल) असावी आणि शनीच्या कक्षेबाहेरही ग्रह असावेत या कल्पनाही त्यांना सुचल्या होत्या. Ii Saggiatore हे त्यांचे पुस्तक १६२३ साली प्रसिद्ध झाले. १६२४ साली त्यांनी धूमकेतूंच्या भ्रमणाविषयीचा शोध लावला. त्यांचे महत्त्वाचे पुस्तक Dialogo sopra i due massimi sistemi del Mondo, Tolemaico e Copernico हे १६३२ साली प्रसिद्ध झाले. त्यामध्ये टॉलेमी व कोपर्निकस यांच्या पद्धतींची संवादरूपाने माहिती दिलेली आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर १६६१ व १९५३ साली प्रसिद्ध झाले. प्रथम या पुस्तकाचे चांगले स्वागत झाले. मात्र पुस्तकात कोपर्निकस यांची सूर्यकेंद्रीय विश्वाची (सूर्य विश्वाच्या केंद्राशी असल्याचे गृहीत धरणारी) कल्पनाच योग्य असल्याचे सुचविले असल्याने धर्मसत्ता व परंपरावादी विद्वान यांचा राग त्यांनी ओढवून घेतला. म्हणून रोम येथे धार्मिक न्यायालयात त्यांच्यावर खटला चालून सूर्याभोवती पृथ्वी व ग्रह फिरत असतात ही कल्पना गुडघे टेकून शपथेवर मागे घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. त्यांना शिक्षाही झाली होती, मात्र नंतर ती कमी करून त्यांना आपल्या आर्सेट्री येथील घरी स्थानबद्ध करण्यात आले. यामुळे १६३३ नंतर शेवटपर्यंत त्यांना एकांतवासात राहावे लागले. सृष्टीतील चमत्कारांचा निरीक्षणांद्वारे तर्कशुद्ध अर्थ लावण्याचे त्यांचे कार्य मात्र चालूच राहिले. सध्या त्यांच्या घराच्या ठिकाणी खगोल भौतिकीची एक महत्त्वाची वेधशाळा आहे. त्यांनी १६३६ साली यामिकीच्या (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) नियमांसंबंधीचे एक पुस्तक लिहिले. १६३७ साली त्यांनी चांद्रदोलना (चंद्राची भासमान आंदोलने) शोधून काढली. त्याच वर्षी ते अंध झाले. त्यांना शेवटी बहिरेपणाही आला होता. तरीही टोरिचेल्ली व व्हिव्हियानी या शिष्यांना ते वैज्ञानिक प्रमेये व तत्त्वे शिकवीत असत. त्यांचे शेवटचे कार्य म्हणजे यामिकी व गती यांच्यावरचा व्याप्तिलेख हा होय. यावरूनच Discorsi e Dimostrazioni Matematiche intorno a due nuove Scienze हे पुस्तक तयार करून ते लायडन येथे १६३८ साली प्रसिद्ध करण्यात आले. मात्र याचे हस्तलिखित हॉलंडमध्ये चोरून नेले होते. या पुस्तकात गती, प्रवेग आणि गुरुत्व यांच्याबद्दलचे त्यांचे आयुष्यभराचे कार्य आलेले असून त्यामध्ये कोपर्निकस यांच्या सिद्धांताची सावधपणे माहिती दिलेली आहे. या पुस्तकावरून असे दिसते की, विश्वातील सर्व पदार्थांमध्ये एक प्रकारचे आकर्षण असते, हे गॅलिलीओ यांना कळले होते. हेच पुढे न्यूटन यांच्या गुरूत्वाकर्षणाच्या नियमांना आधारभूत ठरले. या पुस्तकाचा डायालॉग्ज कन्सर्निंग टू न्यू सायन्सेस हा इंग्रजी अनुवाद १९१४ साली प्रसिद्ध झाला. त्यांनी इतरही अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. त्यांचे सर्व लेख प्रथम फ्लॉरेन्स येथे सोळा विभागांत प्रसिद्ध झाले (१८४२–६६). त्यांच्या समग्र लिखाणाची वीस खंडांची आवृत्ती १८९० ते १९०९ च्या दरम्यान प्रकाशित झाली. ते पीसा येथे मृत्यू पावले.

काजरेकर, स. ग. ठाकूर, अ. ना.