गॅरिक, डेव्हिड: (१९ फेब्रुवारी १७१७–२० जानेवारी १७७९). इंग्लिश रंगभूमीवरील विश्वविख्यात नट, नाट्यनिर्माता, नाटककार व कवी. जन्म इंग्लंडमधील हेरफर्ड येथे. शालेय शिक्षण लिचफिल्ड येथे. काही काळ कायद्याचा अभ्यास. पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर थोरल्या भावाबरोबर मद्यविक्रीचा व्यवसाय. या व्यवसायाच्या निमित्ताने नाट्यकलादींच्या केंद्रांना जवळून पाहण्याची संधी लाभली. हेन्री जिफर्ड याच्या मालकीच्या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या नाटकांतून त्याने सुरुवातीला छोट्यामोठ्या भूमिका केल्या. त्यानंतर डेव्हिडने शेक्सपिअरच्या रिचर्ड द थर्ड या नाटकात रिचर्डची भूमिका केली (१९ ऑक्टोबर १७४१). या प्रयोगाने इंग्लिश रंगभूमी आणि त्याचे जीवन या दोहोंतही क्रांती घडवून आणली.
ड्रुरी लेन आणि कॉव्हेंट गार्डन या दोन्ही व्यावसायिक नाट्यसंस्थांशी त्याचा संबंध आला असला, तरी १७४७ पासून अखेरपर्यंत तो ड्रुरी लेन नाट्यसंस्थेचा प्रमुख होता. १७७६ मध्ये तो व्यावसायिक रंगभूमीवरून निवृत्त झाला. लेखक, नट, दिग्दर्शक अशा त्रिविध भूमिकांतून त्याने सु. तीस वर्षे इंग्लिश रंगभूमी गाजविली.
मध्यम उंची, लवचिक व चपळ शारीरिक हालचाली, तेजस्वी, भेदक व बोलके डोळे, पल्लेदार आवाज या त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांना सहजसुलभ अभिनयाची जोड लाभली होती. हॅम्लेट, मॅक्-बेथ आणि विशेषतः किंग लिअर या शेक्सपिअरच्या शोकात्म नायकांच्या त्याच्या भूमिका अनन्यसाधारण मानल्या जातात. इंग्लिश रंगभूमीवरील कृत्रिम फ्रेंच संकेतांचा पगडा दूर करण्यात गॅरिकची नाट्यदृष्टी व वास्तवदर्शी अभिनय ही कारणीभूत ठरली.सुखात्मिकेतील त्याच्या भूमिकाही यशस्वी ठरल्या. त्याच्या शोकात्म व सुखात्म भूमिकांत तरतमभाव दाखवणे कठीण आहे. शोकात्म भूमिकेपेक्षा सुखात्म भूमिकेला अधिक अभिनयकौशल्य लागते, असे खुद्द गॅरिकनेच एकदा म्हटले होते.
रंगभूमीवरील काही तंत्रेविषयक सुधारणा करण्याचे श्रेयही गॅरिकला दिले जाते. नाटक पाहताना व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीची रंगमंचावरील सुविहित प्रकाशयोजना प्रथम त्यानेच सुरू केली. तसेच पूर्वापार चालत आलेली प्रतिष्ठित प्रेक्षकांनी रंगमंचावर बसण्याची प्रथाही त्याने बंद केली. सतराव्या शतकात शेक्सपिअरच्या नाटकांच्या संहिता प्रयोगदृष्ट्या सवंगपणे संस्कारित करण्याची अनिष्ट पद्धती होती. गॅरिकनेही शेक्सपिअरच्या काही नाटकांत नाट्यप्रयोगाच्या दृष्टीने काही फेरफार केले होते. उदा., हॅम्लेटच्या संहितेतून त्याने स्मशानातील थडगी खोदणाऱ्याचा प्रसंग काढून टाकला होता. तथापि मूळ नाटकांच्या अशा रंगावृत्तीय संस्करणात त्याची एक विशिष्ट नाट्यदृष्टी होती.
गॅरिकने स्वतःही वीसहून अधिक नाटके, विशेषतः यशस्वी प्रहसने, लिहिली. त्यांपैकी मिस इन हर टीन्स (१७४७) व हाय लाइफ अबॉव्ह स्टेअर्स (१७७५) ही प्रहसने विशेष यशस्वी ठरली. जुन्या काही नाटकांची त्याने रूपांतरेही केली. १७६९ मधील शेक्सपिअर ज्युबिली या संहितेत खुद्द गॅरिकचीच अनेक पद्ये, संवाद होते व त्यांवर बरीचशी टीकाही त्या काळी झाली. त्याने नाटकांसाठी लिहिलेली पदे, त्याची एकेकाळची प्रिया पेग वॉफिंग्टन आणि पत्नी ईव्हा मारीआ यांना उद्देशून लिहिलेल्या कविता, त्याचप्रमाणे त्याने लिहिलेली पत्रे विशेष उल्लेखनीय आहेत. त्याचा हा पत्रव्यवहार म्हणजे त्याच्या संपन्न जीवनाचे व ऋजु व्यक्तिमत्त्वाचे चिरंतन स्मारक आहे.
त्याने १७४९ मध्ये ईव्हा मारीआ व्हायगेल या नावाच्या नर्तिकेशी विवाह केला. १७६३ ते ६५ या दरम्यान त्याने यूरोपात प्रवास केला. तो आदर्श मित्र होता व त्याची प्रभावळ मोठी होती. तथापि व्यावसायिक स्पर्धा आणि मत्सर यांमुळे त्याच्या हितशत्रूंची संख्याही मोठी होती. १० जून १७७६ रोजी त्याने शेवटची भूमिका केली.
आयुष्याच्या अखेरच्या पर्वांत तो लंडनमध्येच राहत असे. मूत्रपिंडाच्या विकाराने तो मरण पावला. लंडनमधील तीन आणि न्यूयॉर्कमधील एक अशा चार रंगमंदिरांना तसेच लंडनमधील एका रस्त्याला व एका क्लबला गॅरिकची नावे दिलेली आहेत. सर जॉश्युआ रेनेल्ड्झसकट तत्कालीन सर्व प्रसिद्ध चित्रकारांनी गॅरिकची विविध भूमिकांतील चित्रे रेखाटलेली आहेत. ‘आपल्या नाट्यव्यवसायाला त्याने उदारमतवादी कलेचा उच्च दर्जा प्राप्त करून दिला’, अशा अर्थपूर्ण शब्दांत बर्कने त्याचा गौरव केला आहे.
संदर्भ: 1. Burnim, K. A. David Garrick, Director, Pittsburgh, 1961.
2. Fitzgerald, P. H. The Life of David Garrick, 2 Vols., London, 1868.
3. Stein, E. P. David Garrick, Dramatist, New York, 1938.
जाधव, रा. ग.
“