गँडा : युगांडामधील विषुववृत्तीय टापूतील एक जमात. यांची लोकसंख्या १० लाख (१९६१) होती. ही बांटू भाषीय जमातींपैकी एक आहे. त्यांचे केस काळे व लोकरी असून त्यांपैकी काही उजळवर्णीय मूळचे हॅमिटिक जेते आहेत. सर्व बांटू जमातींत शरीराला कुठे ना कुठे भाजून, कापून काही खुणा करण्याची प्रथा आहे. फक्त गँडा त्याला अपवाद आहेत. हॅमिटिक जेत्यांची भाषा वेगळी असून ते स्वतःला उच्चवर्गीय समजतात आणि शेती करतात. गँडा छातीपासून घोट्यापर्यंत सारे शरीर वल्कलांनी झाकून टाकतात. झाडाच्या सालींपासून वस्त्रे बनवणे हा त्यांचा एक मोठा उद्योग होता.

त्यांच्या झोपड्या वाटोळ्या असून खूप मोठ्या असतात. त्यांत अनेक दालने असतात भिंती सुबक असून त्यांच्यावर लव्हाळ्यांचे व बोरूंचे कुसरकाम केलेले असते. घराभोवती सुरेख बागही ते करतात.

गँडा हे उत्कृष्ट नाविक आहेत. त्यांच्या नौका इंडोनेशियन पद्धतीच्या असतात. ते कुदळी शेती करतात. मुख्यत्वे केळीचे पीक काढतात. अलीकडे ते कॉफी व कापूस पिकवून त्यांची निर्यातही करतात. यांशिवाय ते गुरे, मेंढ्या पाळतात व कुक्‍कुटपालनाचा धंदाही करतात. ते उत्तम कुंभारकाम करतात व सुंदर चटया विणतात तसेच शिंग, तुतारी, वीणा, बासरी, मृदंग, ढोल अशी अनेक वाद्ये ते बनवितात.

यांची कुटुंबपद्धती पितृवंशीय आहे. बहिर्विवाही कुळींत विवाह होतात. बहुपत्‍नीत्व रूढ आहे. काही कुळींनाच राजेपणाचा हक्क असतो, इतरांना नसतो. सरंजामी पद्धतीवर त्यांची समाजसंघटना उभारलेली असून राजाला ते काबाका म्हणतात. त्याच्या हातात सर्व सत्ता असते. त्याचे तीन मंत्री असतात, त्यांना कातिकिरो म्हणतात. मुलमुझी हा मुख्य न्यायाधीश असतो व मुवानिका खजिनदार असतो. यांशिवाय नौदलातील व सैन्यदलातील अनेक अधिकारी असतात. या सर्वांची नेमणूक काबाका करतो.

गँडांच्या पुरातन धर्मात पूर्वजपूजा आणि मृत राजे, निसर्गशक्ती, भुतेखेते यांच्या पूजेचा समावेश होतो बहुतेक आधुनिक गँडा हे रोमन कॅथलिक किंवा सुन्नी पंथाचे आहेत.

भागवत, दुर्गा