क्रेब्ज, सर हान्स आडोल्फ : (२५ ऑगस्ट १९००– ). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. १९५३ चे वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक फ्रिट्स लिपमान यांच्याबरोबर विभागून मिळाले. ते हिल्डेशीप (जर्मनी) येथे जन्मले. १९१८–२३ च्या दरम्यान त्यांनी गॉटिंगेन, फ्रायबर्ग आणि बर्लिन या विद्यापीठांतून वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. १९२५ मध्ये त्यांना हँबर्ग विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळाली. १९२६–३० पर्यंत ते बर्लिन-डालेम येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये ओटो व्हारबुर्ख यांचे मदतनीस म्हणून काम करीत होते. १९३०–३३ पर्यंत ते निरनिराळ्या रुग्णालयांतून काम करीत होते. १९३३ मध्ये त्या वेळच्या जर्मन सरकारने त्यांना नोकरीतून काढून टाकले. त्याच सुमारास त्यांना केंब्रिज येथील जीवरसायन प्रयोगशाळेत काम करण्याकरिता सर हॉफकिन्स यांनी बोलावून घेतले. तेथे त्यांना रॉकफेलर फेलोशिप मिळाली व १९३४ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने जीवरसायनशास्त्राचे प्रयोग निर्देशक म्हणून त्यांची नेमणूक केली. १९३५ नंतर ते शेफील्ड विद्यापीठात गेले व १९४५ पासून त्या विद्यापीठाच्या जीवनरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक झाले. १९५४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांची जीवरसायनशास्त्रचे ‘व्हिटली प्राध्यापक’ म्हणून नेमणूक केली. मेडिकल रिसर्च कौन्सिलचा ‘कोशिका चयापचय’ (कोशिकेमध्ये सतत घडणारे भौतिक व रासायनिक बदल) अभ्यास विभाग ऑक्साफर्ड येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांची त्या विभागाच्या प्रमुखपदावर नेमणूक झाली.
क्रेब्ज यांच्या विशेष संशोधनाचा विषय अंतस्थ चयापचयाच्या निरनिराळ्या बाजू हा होता. १९३२ मध्ये फ्रायबर्ग येथे असताना त्यांनी यूरिया चक्राचा [अमोनिया व कार्बन डाय-ऑक्साइड यांपासून यूरिया तयार होण्याची चक्री क्रिया, → चयापचय] शोध लावला. १९३७ मध्ये शेफील्ड येथे कार्बोहायड्रेट, वसा (चरबी) आणि प्रथिने यांच्या ⇨ ऑक्सिडीभवनाशी संबंधित असलेल्या ट्रायकार्बॉक्सिलिक अम्लचक्राचा [→ चयापचय] शोध लावला आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या चक्राला पुढे ‘क्रेब्ज चक्र’ असे नाव मिळाले.
त्यांना १९५८ मध्ये सर हा किताब मिळाला. शिकागो, फ्रायबर्ग, पॅरिस, लंडन, बर्लिन (हंबोल्ट), जेरुसलेम, लीड्स इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. १९४७ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर व १९६४ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या परदेशी सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. त्यांना रॉयल सोसायटीचे रॉयल पदक, सुर्वण पदक (१९५४) व कॉप्ली पदक (१९६१) इ. सन्मान मिळाले आहेत. जीवनरसायनशास्त्रवर निरनिराळ्या शास्त्रीय नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्यांनी व एच्. कोर्नबर्ग यांनी लिहिलेला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स इन लिव्हिंग मॅटर हा ग्रंथ १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला.
कानिटकर, बा. मो.