क्रिनॉयडिया : (प्रदशभुज वर्ग). एकायनोडर्माटा संघाच्या पेल्मॅटोझोआ उपसंघातील प्राण्यांचा एक वर्ग. या वर्गात समुद्रनलिनी आणि पिच्छतारे या प्राण्यांचा समावेश होतो. या वर्गातील बहुसंख्य प्राणी लुप्त झालेले असून तुलनेने फारच थोडे जिवंत आहेत. बहुतेक जिवंत प्रदशभुज समुद्राच्या मध्यम खोलीवर आढळतात. थोडेफार खोल पाण्यात असतात, तर काही उथळ पाण्यात राहतात. हे प्राणी पुष्कळदा अनेक पेरी असलेल्या लांब देठाने समुद्राच्या तळाला चिकटलेले असतात. समुद्रनलिनी खोल पाण्यात राहणाऱ्या आणि देठाने समुद्राच्या तळाला कायमच्या चिकटलेल्या असल्यामुळे आपल्याला त्यांची माहिती पिच्छताऱ्यांपेक्षा कमी मिळते. पिच्छतारे (अँटेडॉन व ॲक्टिनोमेट्रा ) उथळ पाण्यात राहणारे असून प्रौढ दशा आल्यावर देठापासून तुटून स्वतंत्र होतात व आपले बाहू हालवून पोहतात.
प्रदशभुजाचे शरीर एक बसका मध्यभाग– कटोर– व त्याच्यापासून निघालेल्या लांब, सडपातळ बाहूंच्या पाच जोड्यांचे बनलेले असते. प्रत्येक बाहूंवर शाखांच्या दोन ओळी असतात या शाखांना पिच्छिका (लहान पंख) म्हणतात. कटोराच्या उत्तल (बर्हिर्गोल) अपमुख बाजूवर मध्यभागी केंद्र-पृष्ठ-अस्थिकेने (अपमुख पृष्ठाच्या मध्यभागी असलेल्या लहान हाडाने) बनलेला उंचवटा असून तो देठाचा खुंट असतो याच्याभोवती पुष्कळ, बारीक आणि लहानलहान पेरी असलेल्या संजनिकांचे (चालण्याकरिता किंवा तात्पुरते चिकटण्याकरिता असलेल्या बारीक पेरी असणाऱ्या तंतूंचे) वलय असते प्रत्येक संजनिकेच्या टोकावर वाकडा नखर (नखी) असतो. संजनिकांचा उपयोग चालण्याकरिता किंवा एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता होतो.
कटोराचा सपाट माथा एका चामट आच्छदाने झाकलेला असतो आणि त्याच्या मध्यभागी मुख असते याच पृष्ठावर एका अंतरारात (दोन मुख्य अरांच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या अरात) असलेल्या पिंडिकेवर (त्वचेवरील लहान उंचवट्यावर) गुदद्वार असते. मुखापासून पाच चरणार-प्रसीता (नळीसारखे पाय ज्यांच्यात असतात त्या अरीय खोबणी) निघतात आणि त्या सखल तिकोनी झोलांनी एकमेकींपासून अलग झालेल्या असतात. या झोलांना मुख-पुटे म्हणतात. प्रत्येक प्रसीता (खाच) आच्छादावरून पुढे जाऊन बाहूंच्या जोडीच्या बुडाशी आल्यावर द्विशाखित होते. प्रत्येक बाहूवरील प्रसीतेपासून त्याच्यावरील प्रत्येक पिच्छिकेला एक शाखा जाते. सबंध प्रसीतेमध्ये तिच्या दोन्ही बाजूंवर नालपादांची (नळीसारख्या पायांची) एकेक ओळ असते. प्रसीता आणि नालपद पक्ष्माभिकायुक्त (केसांसारखे बारीक तंतू असलेले) असतात. पक्ष्माभिकांमुळे उत्पन्न झालेले पाण्याचे प्रवाह चरणार-प्रसीतांमधून मुखाकडे वाहत जातात आणि त्यांतून सूक्ष्म प्राणी व अन्नकण मुखात जातात. नालपादांचा फक्त श्वसनाकरिता उपयोग होतो ते परिग्राही (पकडण्याकरिता उपयोगी पडणारे) नसतात. मुखाभोवती असणारे नालपादच संवेदी असतात असे म्हणतात.
कंकाल : (सांगाडा). ⇨ऑफियूरॉडियांप्रमाणेच बाह्यत्वचा सगळीकडे (प्रसीता वगळून) अवशेषी (विशेष वाढ न झालेली) आणि उपत्वची (अगदी बाहेरचा निर्जीव संरक्षक स्तर असलेली) असते. मुखाच्या बाजूकडील त्वचा केवळ चामट असते, पण अपमुख (मुखाच्या विरुद्ध) बाजूला तिच्यात मोठ्या अस्थिकांचा बनलेला कंकाल असतो. यांच्यापैकी पुढील अस्थिका बाहेरून दिसू शकतात. (१) केंद्र-पृष्ठ-अस्थिका. या अस्थिकेपासून संजनिका निघालेल्या असतात (२) अस्थिकांचे पाच स्तंभ. प्रत्येक स्तंभात तीन अरास्थिका असून त्या केंद्र-पृष्ठ-अस्थिकेपासून बाहूंच्या जोडीच्या उगमापर्यंत पसरलेल्या असतात. प्रत्येक स्तंभातील अगदी वरच्या अरास्थिकेला बाहू सांधण्याकरिता दोन पैलू असतात. प्रत्येक बाहूला बाव्हस्थिकांच्या (बाहूच्या अस्थिकांच्या) एका श्रेणीने आधार दिलेला असतो.
पचन तंत्र : मुखापासून एक उभी आणि आखूड ग्रसिका (मुखापासून जठरापर्यंत असलेला अन्नमार्गाचा भाग) निघून ती एका मोठ्या जठरात उघडते. जठर आडवे असून कटोराच्या अक्षाभोवती वळलेले असते. आंत्र (आतडे) आखूड असून ते गुद – पिंडिकेवरील (गुदद्वार ज्याच्यावर असते त्या लहान निमुळत्या उंचवट्यावर) गुदद्वाराने बाहेर उघडते. ग्रसिका आणि जठर ही दोन्हीही पक्ष्माभिकायुक्त असतात.
जलवाहिका तंत्र : (ज्या वाहिन्यांमधून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे अभिसरण होते त्या वाहिन्यांचे तंत्र). मुखाला लागून त्याच्याभोवती एक वलयनाल (नालाचे कडे) असून त्याच्यापासून अरीय नाल निघतात हे चरणार-प्रसीतांच्या खाली असून प्रसीतांप्रमाणेच त्यांचे द्विशाखन होते. नालपादांना तुंबिका (नालपादाच्या आतल्या टोकावरील फुगलेले भाग) नसतात, पण अरीय नाल व वलयनाल यांच्या गुहिकांमधून (लहान पोकळ्यांमधून) गेलेल्या स्नायूंच्या पिंडांच्या क्रियेमुळे नालपादात पाणी ढकलले जाते व त्यामुळे ते लांब होतात. वलयनालापासून कित्येक अश्मनाल (कॅल्शियममय भित्ती असलेले नाल) खाली लोंबत असतात आणि ते देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) उघडतात ⇨ होलोथूरॉयडियांप्रमाणे यांच्या टोकांवर चाळणीसारखे मॅड्रेपोराइट (पृष्ठावर खोबणी असणारे आणि आरपार भोके पडलेले तकट) नसतात. आच्छदावर पुष्कळ छिद्रे असून त्यांना पक्ष्माभिकायुक्त कोशिकांचे (पेशींचे) अस्तर असते या कोशिकांमुळे छिद्रांमधून पाणी आत ओढले जाते.
तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). तंत्रिका तंत्राचे दोन स्पष्ट भाग असतात. एक तलोपरिक (वरवर असणारे) आणि दुसरा अक्षीय अथवा अपमुख. मुखाभोवती एक पृष्ठीय तंत्रिकावलय असते आणि त्याच्यापासून तंत्रिका निघून त्या बाहूंना आणि पिच्छिकांना जातात. बाहूला आधार देणाऱ्या अस्थिकांच्या अक्षामध्ये अक्ष-तंत्रिका असते हिच्यापासून शाखा निघून पिच्छिकांच्या अस्थिकांच्या अक्षामधून जातात. अक्ष-तंत्रिका केंद्र-पृष्ठ-अस्थिकेच्या आत असलेल्या केंद्र-संपुटाला (मध्यभागी असलेल्या डबीसारख्या संरचनेला) जोडलेल्या असतात. केंद्र-संपुटाच्या आत एक पंचकोष्ठ-अंग (पाच भाग असलेले इंद्रिय) असते व ते जननविरोहाच्या (जनन-प्राक्षाला, म्हणजे ज्याच्यापासून जननग्रंथी उत्पन्न होतात त्या प्राथमिक जनन-कोशिकांच्या वलयाला, जोडलेल्या अक्षांगातील प्राथमिक जनन कोशिकांच्या समूहाच्या) अपमुख टोकांशी अखंड असते. केंद्र-संपुटाच्या पाच कोनांपासून निघालेले प्रवर्ध (वाढी) एकवटून एक पंचभुजीय (पाच बाजू असलेले) वलय तयार होते आणि याच्यापासून अक्ष-तंत्रिका निघून बाहूंना जातात. केंद्रसंपुटापासून अपमुख भागाकडे तंत्रिका निघून संजनिकांना जातात. अपमुख तंत्रिका तंत्र प्राण्याच्या सर्व हालचालींचे नियंत्रण करते.
रुधिर तंत्र : (रक्ताभिसरण संस्था). रुधिर तंत्र अथवा रिक्तिका (पोकळ्या असलेले) तंत्र अतिविकसित आणि गुंतागुंतीचे असते. यात एक मुखवलय (मुखाभोवती असणारे कडे), त्याच्यापासून जठरावरील जाळ्याला जाणाऱ्या आणि अक्षांगाच्या (जनन-कोशिकांसहित संयोजी आणि रिक्तिका-ऊतकांच्या म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या बनलेल्या व अक्ष-कोटराजवळ असणाऱ्या संरचनेच्या) रिक्तिका-ऊतकाला जाणाऱ्या वाहिका यांचा समावेश होतो. अरीय वाहिका असतात किंवा नाही याविषयी निश्चित माहिती नाही.
देहगुहा : देहगुहेत संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाचे अनेक पट्टे असून त्यांच्यामुळे विविध अंगे देहगुहेत लटकत असतात. बाहू व पिच्छिका यांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलेले आणि चरणार-प्रसिता व अस्थिका यांच्यामध्ये असलेले तीन नाल असतात. हे देहगुहेचे दीर्घित (वाढलेले) भाग असून अंशतः पक्ष्माभिकायुक्त असतात. यांच्यापैकी दोन अधोसंस्पर्शक-नाल, चरणार-प्रसीतेच्या खाली जोडीने असून एका मध्य पडद्याने एकमेकांपासून विभक्त झालेले असतात. तिसरा उदरगुहा-नाल, अधोसंस्पर्शक-नाल आणि अस्थिका यांच्यामध्ये असतो. प्रत्येक पिच्छिकेच्या टोकाशी हे तिन्ही नाल एकमेकांना मिळालेले असतात.
अक्षांग शरीराच्या अक्षामध्ये असते. पंचकोष्ठ-अंगाच्या मध्यापासून एका बारीक पट्ट्याच्या स्वरूपात निघून परिआंतरांग-गुहेत (आंतरांगाभोवतालच्या देहगुहेत) ते मोठे होते मुखाच्या बाजूकडे ते पुन्हा बारीक होते आणि मुखाभोवती असणाऱ्या वाटोळ्या जनन-प्राक्षाला मिळते. याच्यापासून जनन-रज्जू निघून त्या बाहूतील जनन-नालातून पिच्छिकांना जातात. या ठिकाणी त्या मोठ्या होऊन जनन ग्रंथी बनतात. या जनन ग्रंथींमुळे पिच्छिकांची बुडे फुगलेली असतात आणि अंडाणू अथवा शुक्राणू पक्व झाल्यावर ती बरीच मोठी होतात. अंडाशयांपासून व वृषाणापासून (पुं-जनन ग्रंथीपासून) आखूड वाहिन्या निघून त्यांतून पक्व युग्मक (ज्यांच्या युग्मांच्या संयोगाने प्रजोत्पत्ती होते त्या जननकोशिका) बाहेर पडतात. अंड्याचे निषेचन (फलन) पाण्यात होते.
इतर एकायनोडर्माटांप्रमाणेच क्रिनॉयडियांमध्ये रूपांतरण होते. अंड्यातून बाहेर पडणारा डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) पक्ष्माभिकायुक्त आणि मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारा) असतो. या अवस्थेतून डिंभ पुढच्या म्हणजे ‘पेंटॅक्रिनॉइड’ डिंभावस्थेत जातो [→ डिंभ]. या अवस्थेतील डिंभाला देठ असून त्यामुळे तो बद्ध असतो. या अवस्थेचे क्रमाक्रमाने पिच्छताऱ्यात रूपांतर होते.
पहा : एकायनोडर्माटा.
संदर्भ : Hyman, L. H. The Invertebrates, Vol. 4. Echinodermata, New york, 1955.
कर्वे, ज. नी.
“