कृत्रिम भाषा : जगात लहानमोठ्या अशा दोन-तीन हजार भाषा आहेत. मनुष्य ज्या भाषेच्या परिसरात वाढलेला असतो ती आणि विशिष्ट परिस्थितीत तिच्या आसपासची किंवा बरोबरची आणखी एखाद दुसरी भाषा त्याला विनासायास येते. विद्यार्थिदशेत व मोठेपणी आवश्यक आहे किंवा आवड आहे म्हणून माणसे आणखी काही भाषा शिकतात. पण ही संख्या फार मोठी असत नाही आणि त्यांना न येणाऱ्‍या असंख्य भाषा असतात. या भाषांमुळे मानवजातीचा एकाच माध्यमातून एकत्र व्यवहार होणे अशक्य होते. याउलट भाषा शिकणे हे कष्टाचे काम आहे एवढेच नव्हे तर पुष्कळदा ते अव्यवहार्य असते आणि एका विशिष्ट मर्यादेपलीकडे शक्यही नसते.

पुष्कळदा तर स्वतःची भाषासुद्धा माणसाला पूर्णपणे अवगत नसते किंवा अपुरी पडते. भाषा हा एक परंपरागत वारसा असल्यामुळे व्यक्त करायचा आशय व अभिव्यक्तीचा प्रकार हे ठरलेले असतात. त्याबाहेर जाऊन नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पना किंवा नवे ज्ञान व्यक्त करायचे झाले, तर त्यासाठी प्रयत्‍न करावा लागतो आणि या प्रयत्‍नातूनच भाषेला बुद्धिपुरस्सर वळण देणे, नवे शब्द बनवणे, प्रतिमा शोधून काढणे इ. गोष्टी होऊन भाषा अधिक समृद्ध बनते. शैली, परिभाषा, साहित्याची भाषा यांचा उगम असा होतो.

पण एवढ्याने भागत नाही. शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ यांना इतरत्र काय चालले आहे तेही जाणणे आवश्यक असते, कारण शास्त्र व तत्त्वज्ञान यांचे पुरोगामित्व व समृद्धी आपापल्या विषयांत बाहेरच्या जगात काय प्रगती झाली आहे ते जाणून घेण्यात असते. ही प्रगती पुष्कळदा समजून येत नाही, कारण तिचा आविष्कार एका विशिष्ट भाषेत झालेला असतो. ज्या विद्वानांना ती भाषा येत असते त्यांना, किंवा भाषांतर करून ही प्रगती ज्या भाषांत आणली जाते, त्यांच्या वाचकांना तिचा लाभ होतो. पण एवढे करूनही ती जगातल्या सर्व अभ्यासकांपर्यत पोहोचेलच असे नाही.

ही अडचण दूर करण्याचे दोन मार्ग आहेत : पहिला, सर्व शास्त्रज्ञांनी जगातील कोणतीतरी एक महत्त्वाची भाषा शिकणे, आपले सर्व शास्त्रीय लेखन त्या भाषेत करणे किंवा भाषांतरित करून घेणे आणि दुसरा, अशी एक नवी भाषा निर्माण करणे, की जी विनासायास सर्वांना शिकता येईल आणि जिच्यात कोणत्याही दर्जाचे व शाखेचे शास्त्रीय वाङ्‌मय लिहिणे किंवा भाषांतरित करणे शक्य होईल. ही नवी भाषा विश्वकुटुंबाचे एकमेव माध्यमही होईल.

यातला पहिला मार्ग व्यावहारिक व दुसरा तात्त्विक आहे. व्यावहारिक मार्ग स्वीकारण्यात काही अडचणी आहेत. शास्त्रीय लेखनाला सर्वांत योग्य भाषा कोणती ते ठरवायचे कसे ? इंग्‍लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन इ. भाषा या दृष्टीने जवळजवळ सारख्याच तोलाच्या आहेत पण त्याबरोबरच त्या शक्तिशाली संपन्न राष्ट्रांच्या भाषा असल्यामुळे त्यांचा विचार करताना त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण येणे अपरिहार्य आहे. लोकसंख्येचा निकष लावायचा म्हटला तर ६०–९० कोटींहून अधिक भाषिक असलेल्या चिनी भाषेला अग्रहक्क द्यावा लागेल. पण अशा पारंपरिक भाषा स्वीकारल्या, तर वर सांगितलेल्या व  इतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.

दुसरा मार्ग एक नवी कृत्रिम भाषा निर्माण करण्याचा. या भाषेचे ध्वनी उच्चारसुलभ, व्याकरण पूर्णपणे नियमबद्ध, शब्दसंग्रह स्पष्ट आणि निश्चित अर्थ व्यक्त करणारा, वाक्यरचना तर्कशुद्ध असावी. प्रत्ययांची काटकसर, शब्दांचा मोजकेपणा आणि या सर्व गोष्टींमुळे नव्याने शिकणाऱ्‍याला झपाट्याने शिकता येण्यासारखी ती असावी.

नवभाषानिर्मितीचे प्रयोग: सर्व मानवजातीचे एकमेव माध्यम या दृष्टिकोनातून भाषेकडे पाहू लागल्यावर गेल्या तीनशे वर्षांत नवभाषानिर्मितीचे अनेक प्रयोग झाले. त्यांतले काहीच येथे नमूद करणे शक्य आहे.

पहिला महत्त्वाचा प्रयत्‍न ॲबर्डीन येथील जॉर्ज डॅलगार्नो याचा होता. त्याच्या पुस्तकाचे नाव आर्स सिग्‍नोरुम (१६६१).  शब्दांची वाटणी अर्थानुसार करून प्रत्येक वर्गाला त्याने एक विशिष्ट ध्वनिसंकेत दिला होता. नाम व क्रियापद हा भेद नव्हता. अनेक वचनाचा प्रत्यय सर्वत्र इ हा होता, विभक्ती नव्हत्या इत्यादी.

बिशप विल्किन्झने १६६८ मध्ये तर्कशुद्ध भाषेवरचा आपला निबंध प्रसिद्ध केला. पण त्याची तर्कशुद्धता बीजगणितासारखी होती.

अशा प्रकारच्या प्रयत्‍नांची निरर्थकता जाणवून पॅरिसच्या भाषाशास्त्रमंडळाने त्यांचा धिक्कार केला. पण हे प्रयत्‍न फुकट गेले नाहीत, कारण त्यामुळे नैसगिक भाषांचा अनियमितपणा, क्लिष्टता, अनावश्यक प्रत्ययांचा भरणा इ. गोष्टींची तीव्र जाणीव अभ्यासकांना झाली आणि हे प्रयत्‍न चालूच राहिले.

या प्रयत्‍नांतून निर्माण झालेली आणि प्रत्यक्ष उपयोगात आणली गेलेली पहिली भाषा व्होलाप्यूक (विश्वभाषा) ही होय. योहान मार्टीन श्‍लायर या जर्मन कॅथलिक धर्मगुरूने ती तयार केली. श्‍लायर हा बहुभाषाकोविद होता. त्यामुळेच कदाचित सामान्य माणसाच्या भाषाविषयक अडचणी त्याच्या लक्षात आल्या नसाव्यात. १८८० मध्ये तयार झालेल्या या भाषेला १८८९ पर्यंत दोन लाख अनुयायी मिळाले. अनेक विद्वत्सबांनी तिला पाठिंबा दिला. पण तिच्या भाषिकांच्या पहिल्याच संमेलनात सर्व व्यवहार व्होलाप्यूकमधून चालावा, ही घालण्यात आलेली अट तिला मारक ठरली.


याच सुमाराला बोपाल (१८८७), श्पेलिन (१८८८), दिल (१८९३), बाल्ता (१८९३), व्हेल्तपार्ल (१८९६), लांगब्‍ल (१८९९) इ. भाषा अस्तित्वात आल्या.

व्होलाप्यूक मागे पडल्यावर त्याच सुमाराला (१८८७) डॉ. लूड्‌व्हिख लॅझारस झामेनहॉफ (१८५९–१९१७) या रशियन पोलिश ज्यूने तयार केलेली आणि जिचे यश अजूनही काही अंशी टिकून आहे अशी, एस्पेरांतो ही नवभाषा पुढे आली.

यूरोपियन भाषांत सामान्यपणे आढळणारे शब्द व त्यांची रचनात्मक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन झामेनहॉफने ही भाषा तयार केली होती. त्यामुळे ती कोणालाही पूर्णपणे अपरिचित राहिली नाही. भाषा कृत्रिम असली तरी ती सर्वस्वी नवे शब्द किंवा नवी रूपे यांनी बनवून तालणार नाही, तिच्यात काहीतरी आपलेपणा प्रत्येक भाषिकाला वाटला पाहिजे, ही मूलभूत गोष्ट न विसरल्यामुळे एस्पेरांतोला यश मिळाले. तिची ध्वनिरचना जराशी किचकट असली, तरी शब्दरचना व वाक्यरचना बरीच सोपी आहे. दोन विभक्ती, रशियन व जर्मनला दिलेले महत्त्व इ. दोष असूनही ती लोकप्रिय झाली. इतकी की तिच्यानंतर आलेली लुई द बोफ्रों याची इदो ही नवभाषा तिच्यापेक्षा अधिक निर्दोष असूनही तिला बाजूला सारू शकली नाही.

इदोनंतर रने दे सोस्यूर यांची एस्पेरांतिदो आली. त्यानंतरचा प्रयत्‍न इटालियन गणितज्ञ जूझेप्पे पेआनो यांचा. लॅटिनला अत्यंत नियमबद्ध बनविण्याच्या या प्रयत्‍नाचे नाव इंतेरलिंग्वा  आहे. लॅटिन शब्दसंपत्तीवर आधारलेले, शब्द शेजारीशेजारी ठेवून वाक्य बनवणारे, संदर्भाने किंवा वाक्यातील एका शब्दाला प्रत्यय लावून काम होत असल्यास इतर प्रत्यय टाळणारे इ. वैशिष्ट्ये असणारे तिचे स्वरूप आहे. १९२८ मध्ये डॅनिश शास्त्रज्ञ ऑटो येस्पर्सन यांनी आपली नोव्हिआल ही भाषा पुढे मांडली.

या विषयातील एक अभिनव कल्पना सी. के. ऑग्डेन यांची आहे. ती बेसिक इंग्‍लिश म्हणून ओळखली जाते. अर्थाच्या दृष्टीने पाहिल्यास कमीत कमी किती शब्दांच्या मदतीने भाषेतील इतर शब्दांचे अर्थ सांगता येतील ? हे शब्द म्हणजे मूलभूत अर्थसंपत्ती. ऑग्डेन यांच्या मते असे सु. ८५० शब्द, इंग्‍लिश भाषेपुरते बोलायचे झाल्यास, आहेत. स्पष्टपणाचा बळी न देता साधता येणारी शब्दांची काटकसर हा या नवभाषेचा पाया आहे. त्यामुळे विश्वभाषेच्या निर्मितीत ती निश्चित मार्गदर्शक ठरणार आहे.

मर्यादा व उपयुक्तता: नवभाषानिर्मितीचे हे प्रयत्‍न मानवाच्या वाढत्या सहजीवनाच्या आकांक्षेचे द्योतक आहेत. पण तिच्या मर्यादा लक्षात न ठेवल्यास हे प्रयत्‍न सदोषच राहतील. तिचा उपयोग भौतिक जीवनाच्या गरजांपुरता आहे. ती नियमित व स्पष्ट असली पाहिजे. तिच्यात वाक्प्रचारांना वाव नाही. त्यामुळेच ती साहित्यनिर्मितीसाठी किंवा इतर भाषांतील साहित्याच्या भाषांतरासाठी निरुपयोगी आहे. प्रत्येक नैसर्गिक भाषेजवळ तिची अशी एक स्वतंत्र अभिव्यक्तिक्षमता असते. कृत्रिम भाषेजवळ ती नसते, कारण ती सर्वांची सामान्य गरज भागवणारी भाषा आहे. तिच्यात शास्त्रीय पुस्तके लिहिता येतील, पण काव्यनिर्मिती करता येणार नाही तहाचा मसुदा तयार करता येईल, पण प्रेमपत्र लिहिता येणार नाही. पण अशी एखादी भाषा बनवता आली आणि जगातील राष्ट्रांच्या सहकार्याने ती सर्व नागरिकांना आग्रहपूर्वक शिकवली गेली, तर आंतरराष्ट्रीय परिषदा, परदेशातील प्रवास, शास्त्रीय साहित्याची देवघेव इ. गोष्टी अधिक यशस्वीपणे होऊ शकतील.

संदर्भ : 1. Cresswell, J. Hartley, J. Teach Yourself Esperanto, London, 1957.

            2. Guerard, A. L. A Shrot History of the International Language Movement, New York, 1922.

कालेलकर, ना. गो.