कूरा नदी : रशियाच्या ट्रान्स कॉकेशिया भागातील सर्वांत मोठी नदी. लांबी १,५१५ किमी. जलवाहनक्षेत्र १,८७,९९० चौ. किमी. तुर्कस्तानात किसिरिंडागी डोंगराच्या पश्चिम उतारावर, १,९८१ मी. उंचीवर ही उगम पावते रशियातील जॉर्जिया व आझरबैजान राज्यांमधून वाहत जाऊन बाकूच्या नैर्ऋत्येस १२८ किमी. अंतरावर ती कॅस्पियन समुदास मिळते. ह्या नदीत मासळी भरपूर मिळते. टिफ्लिस शहराच्या उत्तरेस १३ किमी. अंतरावरील झ्‍येम-अफचला व मीनगिचउर येथे दोन मोठे जलविद्युत् प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्या नदीतून मुखापासून ४८० किमी. अंतरावरील यिव्हलाखपर्यंत जलवाहतूक होते. आरास, अलाझनी, आयोरी, खामी, आराग्वा व टिर्टेर या तिच्या प्रमुख उपनद्या होत. ओलीतासाठी या नदीचा चांगला उपयोग होतो.

लिमये, दि. ह.