कूरनांद, आंद्रे फ्रीदरिक : (२४ सप्टेंबर १८९५– ). फ्रेंच-अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक. १९५६ चे शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक या विषयांचे नोबेल पारितोषिक व्हेर्नर फॉर्समन व डिकिन्सन रिचर्ड्‌स या दोन शास्त्रज्ञांसमवेत त्यांना मिळाले. ह्या तिघांनी‘हृदयापर्यंत शलाका (संशोधनात्मक तार) पोहोचवून रुधिराभिसरण विकाराबद्दल’ केलेल्या संशोधनाबद्दल हे पारितोषिक त्यांना देण्यात आले.

पॅरिस येथे त्यांचा जन्म झाला. १९१३ मध्ये त्यांनी सॉरबॉन विद्यापीठाची पदवी मिळविली. पुढच्याच वर्षी भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील पदविका मिळविली. पहिल्या महायुद्धात ते फ्रेंच सैन्यात दाखल झाले. १९२५–३० पर्यंत पुन्हा अभ्यास करून त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. १९३४ मध्ये ते अमेरिकेत गेले व १९४१ मध्ये अमेरिकन नागरिकत्वाचा त्यांनी स्वीकार केला. कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेत १९३४ साली मार्गदर्शक म्हणून सुरुवात करून १९५१ मध्ये त्यांची तेथेच प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

व्हेर्नर फॉर्समन ह्या जर्मन शास्त्रज्ञांनी १९२९ साली स्वतःच्या उजव्या कोपरापुढील नीलेतून शलाका घातली आणि ती हृदयाच्या उजव्या भागापर्यंत सरकवली. १९४१ मध्ये कूरनांद व रिचर्ड्‌स यांनी ह्या तंत्रात अधिक प्रगती केली. हृदयातील व मोठ्या रक्तवाहिन्यांतील रक्तदाबाचे मापन करणे, शरीरातील एकूण रक्ताचे घनफळ काढणे, रक्तप्रवाहाचा वेग काढणे व प्रत्यक्ष हृदयातील रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेणे या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखविल्या. हृदयाच्या निरनिराळ्या कप्प्यांतून रक्ताचे नमुने घेऊन त्यामधील ऑक्सिजनाच्या प्रमाणावरून, हृदयाच्या कप्प्यांचा एकमेकांशी विकृत मिलाफ होत असल्यास तो ओळखता येतो, हे कूरनांद यांनी सिद्ध केले. त्यांनी शलाकांत सुधारणा घडवून आणल्या तसेच रोहिण्यांतही सरकवता येणाऱ्‍या सुया शोधून काढल्या. ह्या शलाका क्ष-किरण तपासणीत स्पष्ट दिसतात. शिवाय त्या पाहिजे तेवढ्या लवचिक असल्यामुळे हृदयास इजा होण्याचा धोका टळतो. ह्या विषयावरील सर्व तांत्रिक माहिती कूरनांद यांनी बाल्डविन व हिमेलस्टीन या दोघांच्या मदतीने ‘जन्मजात हृदय विकृतीमध्ये हृदयशलाकांचा उपयोग’ या विषयावरील निबंधात दिली आहे (१९४९). दुसऱ्‍या महायुद्धात ‘अवसाद’(शॉक) ह्या विषयावर कूरनांद, रिचर्ड्‌स आणि त्यांचे शिष्य यांनी संशोधन करून अवसादाचे निश्चित स्वरूप ठरविले. पुढे कूरनांद यांनी फुप्फुसातील रुधिराभिसरणासंबंधी संशोधन केले.

कूरनांद हे अनेक वैद्यकीय प्रकाशनांच्या संपादकीय मंडळावर होते. त्यांना पुढील मानसन्मान मिळाले : नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९५८), स्वीडिश सोसायटी फॉर इंटर्नल मेडिसिनचे आंड्रेआस रेट्‌झिअस रौप्य पदक (१९४६), युनायटेड स्टेट्स पब्लिक हेल्थ ॲसोसिएशनचे लास्कर पारितोषिक (१९४९), जिमेनेझ डीआस फौन्डेशन पारितोषिक (१९७०), ट्रूडो पदक (१९७१) स्ट्रॅसबर्ग, लीआँ, बर्मिंगहॅम, पीसा इ. विद्यापीठांची सन्माननीय डॉक्टरेट.

कानिटकर, बा.मो.