कुलाबा जिल्हा: महाराष्ट्राचा पश्चिम सरहद्दीवरील अरबी समुद्राला भिडलेला कोकण भागातील जिल्हा. १७ ५२’ उ. ते १९ ३’ उ. व  ७३ २’ पू. ते  ७३ ७’ पू.  क्षेत्रफळ ७,०२४ चौ. किमी. लोकसंख्या १२,६१,१५६ (१९७१). याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस खाडीपलीकडे बृहन्मुंबई, उत्तरेस ठाणे, पूर्वेस पुणे, आग्नेयीस सातारा व दक्षिणेस रत्‍नागिरी जिल्हा आहे. दक्षिणोत्तर १६० किमी. आणि पूर्वपश्चिम २५–५० किमी. अंतर असलेल्या ह्या जिल्ह्याला सु. २४० किमी. किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीजवळ उंदेरी, खांदेरी, एलेफंटा अथवा घारापुरी, करंजा, न्हावे, शेवा अशी अनेक छोटी बेटे आहेत. किनारपट्टीच्या उरण महाल, अलिबाग तालुका, मुरूड महाल, श्रीवर्धन-महाल यांनी १८%, पनवेल, पेण, रोहा व म्हसाळे महाल यांनी ३३%  आणि कर्जत, खालापूर, सुधागड महाल, पोलादपूर महाल, महाड व माणगाव या डोंगरी तालुक्यांनी जिल्ह्याचा इतर भाग व्यापला आहे. महाराष्ट्राच्या २.२% क्षेत्रफळ व २.५% लोकसंख्या असलेला हा जिल्हा महाराष्ट्राचे तांदूळाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असून अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

भूवर्णन : जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवर ३००–९०० मी. उंच भिंतीसारखा सह्याद्री उभा असून त्याच्या माथेरान, मलंगगड, चंदेरी, धूप, कनकेश्वर, सुकेळी, मिऱ्या, कुंभी इ. शाखोपशाखा जवळजवळ किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. अवचितगड, घोसाळगड, सुरगड (रोहा तालुका) कर्नाळा, माणिकगड (पनवेल) कुलाबा, सागरगड (अलिबाग) कोरलई, जंजिरा (मुरूड) तळगड, विश्रामगड (माणगाव) तुंगी (कर्जत) प्रबळगड (खालापूर) रतनगड, सांक्षी, सोनगिरी (पेण) रायगड, लिंगाणा (महाड) सुधागड, सारसगड (सुधारगड) इ. ऐतिहासिक महत्त्वाचे किल्ले त्यावर आजही उभे आहेत. कोकणातून देशावर जाण्यासाठी भीभाशंकर, कोळंब, जावळा, कसूर, राजमाची, बोर, पिंपरी, लिंग, देव, कुंभ, कावळ्या, शेवत्या, मढ्या, भोप, वरंधा, कामठा, ढवळा, फिट्झजेराल्ड अथवा आंबेनळी आणि पार असे अनेक घाट जिल्ह्यात आहेत. सह्याद्रीवरून वाहत आलेल्या लाल मातीने जिल्ह्या व्यापला असून किनारपट्टीवर शेल व वालुकामिश्रित जामीन आढळते. बॉक्साइट, थोड्या प्रमाणात लोहधातुक, मीठ, बांधकामाचे दगड यांशिवाय जिल्ह्यात खनिजसंपत्ती नाही. मात्र पालीजवळील उन्हेरे आणि महाडजवळील सव व वडवली येथील औषधी पाण्याचे झरे सुप्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यामध्ये सोळा प्रमुख व अनेक छोट्या नद्या असल्या तरी त्या वर्षातील सहा महिने जवळजवळ कोरड्या असतात. मात्र सह्याद्रीच्या तीव्र उताराचा फायदा घेऊन पेज नदीवर भिवपुरी येथे, कुंडलिकेवर भिरा येथे व खोपोली नदीवर खोपोली येथे जलविद्युत् प्रकल्प उभारले गेले आहेत. काळ नदीवरील १९७३ मध्ये झालेल्या प्रकल्पाने ५०,००० हे. जमीन भिजणार आहे. जिल्ह्याचा उत्तर भाग उल्हास, पोशीर, शिलर, पेज, पाताळगंगा, बाळगंगा, भोगावती, कामगंगा, कासडी, कामरंगा, अंबा मध्यभाग कुंडलिका व मांदाड आणि दक्षिण भाग सावित्री, गांधार, घोड, काळ, नागेश्री इ. नदीखोऱ्यांनी व्यापला आहे. किनारपट्टीवर उरण, करंजा, धरमतर, रेवदंडा, जंजिरा, बाणकोट अशा खाड्या आतपर्यंत गेल्या असून त्यांवरील अनेक बंदरांतून जलवाहतूक चालते. 

उष्ण व दमट हवामान आणि मुबलक पाऊस यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. तथापि उंचीनुरूप हवामानात फेरबदल आढळतात. सर्वसाधरण तपमान २६·४ से. ते ३१·७से. असते. ९·४से. पेक्षा कमी अथवा ४०से. पेक्षा जास्त तपमानाची जिल्ह्यात नोंद नाही. वर्षभर हवेत ६५–८० टक्के सापेक्षा आर्द्रता आढळते. मोसमी वाऱ्यांपासून वर्षभरात २००–३५० सेंमी. पाऊस पडतो. डोंगरभागात अर्थातच पर्जन्यमान अधिक असते.

जिल्ह्याचा २३% भाग जंगलयुक्त असून त्यात अनेक जातींचे वृक्षप्रकार आढळतात. किनारी भागात ताड, माड, नारळ, सुपारी, काजू, फणस, पेरू, लिंबू जातींची फळझाडे व कच्छवनश्री आढळते तर डोंगरभागात सागवान, ऐन, शिसवी, खैर, हिरडा, बेहडा, आंबा, मोह, रक्तचंदन, रिठा, शिकेकाई, चिंच, पळस, गोरखचिंच, बाभूळ, कळक इ. अनेक वृक्ष आढळतात. जळण, औद्योगिक गरजा, औषधे आणि खाण्यासाठी फळे असा या वनसंपत्तीचा उपयोग होतो.

वनसंपत्तीप्रमाणेच येथील प्राणिजीवनही संपन्न आहे. जंगतोडीमुळे व शिकारीमुळे हल्ली काही प्राणी दुर्मिळ होत आहेत. वाघ, चित्ता, तरस, भेकर, बिबळ्या, सांबर, ससा, कोल्हा, खोकड, हरिण इत्यादींची संख्या हल्ली कमी झाली आहे. माकड, रानडुक्कर, मुंगुस, वाटवाघूळ, ऊद, सरडा व सापाच्या अनेक जाती सर्वत्र आढळतात. लावा, तित्तर, कवडा, बदक, कबुतर, रानकोंबडा, घार गिधाड, ससाणा, सुतार, भांडक, कोकिळ इ. अनेक पक्षी तसेच कीटकांच्या विविध जाती येथे आढळतात. समुद्रामध्ये शार्क, मॅकरल, सार्डीन, पाँफ्रिट व इतर शेकडो जातीचे मासे मिळतात.

आर्थिक परिस्थिती : डोंगर, दऱ्या, खाड्या, खार जमीन इत्यादींमुळे जिल्ह्यातील फक्त ३२·१९% जमीन १९७० साली लागवडीखाली होती. त्यातच कित्येक ठिकाणी दुबार पिके घेतली जातात. सोपानशेती व सघन शेती ही जिल्ह्यातील शेतीची वैशिष्ट्ये होत. अद्याप शेती जुन्याच पद्धतीने होते. एकूण जमिनीपैकी २३·९% जंगलयुक्त, १८% पडित, ८% लागवडीयोग्य परंतु पडित कुरणाची व ११% लागवड नसलेली होती. लागवडीखालील जमिनीपैकी ६२% जमिनीत भाताची लागवड होती. भाताशिवाय जिल्ह्यात नाचणी, रागी, तूर, मूग, तीळ, मिरची, घेवडा इ. महत्त्वाची पिके असून नारळ, सुपारी, ताडफळ, आंबा, काजू, फणस, लिंबू फळे, अननस, कलिंगड इत्यादींच्या बागा आहेत. खार जमीन हा किनारभागावर मोठा प्रश्न असून पनवेल येथे त्यासाठी एक संस्था उभारली आहे. खार जमिनीच्या उद्धरणाच्या योजना आहेत. शेतीखालोखाल मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा असून जंगलउद्योगाचा त्यानंतर क्रम लागतो. १९७१ मध्ये जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३६·४१% लोक कामगार होते व त्यांपैकी ७४·३०% लोक कृषिउद्योगात होते. निर्मितिउद्योगात १९६९ साली ८७ कारखान्यांत ५,१४० कामगार काम करीत होते. खोपोली, पनवेलवळील रसायनी आणि रोहा हीच फक्त औद्योगिक केंद्रे आहेत. नोव्हेंबर १९७२ मध्ये पनवेलजवळील तळोजा येथे ॲल्युमिनियमचा कारखाना उघडला गेला आहे. कागद, रसायने, औषधे, धातुकाम, कापड, दोरखंड, छपाई, मीठ, कोळसा, मूर्तिकाम, वेतकाम, खाणकाम या उद्योगांशिवाय जिल्ह्यात सर्वत्र भातगिरण्या आढळतात. कर्जत येथे भातसंशोधनकेंद्रे आहे. पेण, पनवेल, अलिबाग, खालापूर, महाड, रोहा, अष्टमी, नागोठाणे या बाजारपेठा असून मोरा, करंजा, मांडवा, श्रीवर्धन, मुरूड, रेवदंडा, राजापुरी ही महत्त्वाची बंदरे आहेत. तांदूळ, पोहे, वाल, मीठ, नारळ, सुपारी, आंबा, फणस, भाजीपाला, मासळी, लाकूड, कोळसा इत्यादींची येथून निर्यात होते. साखर, धान्य, पेट्रोल पदार्थ, यंत्रसामान, कापड इत्यादींची जिल्ह्यात आयात करावी लागते. कोकणातील दळणवळणातील मागासलेपणा नाहीसा करण्यासाठी कोकण रेल्वेप्रकल्पाची योजना आखली गेली आहे. तसेच मुंबई–उरण पूल प्रकल्पामुळे व जुळ्या मुंबईमुळेही जिल्ह्याचा विकास अपेक्षित आहे. १९७० अखेर जिल्ह्यात १२१·८१ किमी. लोहमार्ग, ३,६३२ किमी. लांबीचे रस्ते, २१४ टपाल कचेऱ्या, ३० तार कार्यालये, ९२५ दूरध्वनियंत्रे व १६·८६८ रेडिओ परवाने होते.


लोक व समाजजीवन : १९६१–७१ दरम्यान जिल्ह्याची लोकसंख्या १९·११ टक्क्यांनी वाढली. तथापि यातही शहरातील वाढीचे प्रमाण जास्त आहे. तरीही जिल्ह्यातील ८७·९% लोक ग्रामीण भागात राहतात. नारळ, पोफळी, आंबा यांनी भरलेला परस, कुडाची अथवा क्वचित उतरत्या छपराची घरे, भात आणि मासळी हे अन्न, कंबरेला लहान धोतर घातलेला शेतकारी व मरतुकडी जनावर हे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे वर्णन म्हणता येईल. डोंगर भागात कातकरी, ठाकूर, महादेव कोळी इ. आदिवासी जमाती आढळतात, तर किनारपट्टीवर कोळी, भंडारी यांचे प्राबल्य आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने हिंदू लोक असून मुसलमान, नवबौद्ध, जैन, शीख, बेने इझ्राएली, पारशी इ. लोकही थोड्याफार प्रमाणात आढळतात. पनवेल, खोपोली, महाड, उरण, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, मुरूड, राेहा, अष्टमी, नेरळ, रेवदंडा, कर्जत, माथेरान व रसायनी हीच फक्त जिल्ह्यातील शहरे. लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण दर चौ. ला १७५ आहे. जिल्ह्यातील पुरुषमंडळी मुंबईला कामाला असल्यामुळे स्त्रियांचे पुरुषांशी प्रमाण दरहजारी १,०५८ आहे. साक्षरतेचे प्रमाण ३५·२०% असून १९६९-७० साली १,७७९ प्राथमिक शाळांत १,८३,१०९ विद्यार्थी व  ५,२६० शिक्षक आणि ९७ माध्यमिक शाळांत २३,४६४ विद्यार्थी व ९३७ शिक्षक होते. अलिबाग व महाड येथे महाविद्यालये आहेत. १९७० साली जिल्ह्यात ५ साप्ताहिके, ८ मासिके, २ त्रैमासिके व ६ वार्षिके प्रसिद्ध होत होती. १९६९ साली जिल्ह्यात ७ मोठी रुग्णालये, २४ दवाखाने, ७ प्रसूतिगृहे, ६५ आरोग्यकेंद्रे, ६६ डॉक्टर, १२७ परिचारिका आणि ७४० खाटा होत्या.

घारापुरी येथील त्रिमूर्ती व इतर जगप्रसिद्ध बौद्ध लेणी तसेच माणगावजवळची कुडा लेणी जिल्ह्याच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाची  साक्ष देतात. चौल हे टॉलेमीच्या काळी भरभराटलेले बंदर होते. पाचव्या-सहाव्या शतकांत येथे मौर्यांची सत्ता होती व त्यानंतर शिलाहार आले. आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज व हबशी यांनीही जिल्ह्यात सत्ता गाजविली. मराठ्यांच्या काळात रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी बनल्यामुळे कुलाबा जिल्ह्याला फार महत्त्व आले. आंग्र्यांचा हा बालेकिल्ला, तर जंजिऱ्याचा सिद्दी तेवढाच मातबर. पेशव्यांचे घराणे श्रीवर्धनचे, तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके शिरढोणचे. इंग्रजी अमलात पुणे–मुंबईतील उद्योगसमूहाला वीज पुरविणारा हाच जिल्हा. अलिबाग येथील १८४१ साली स्थापण्यात आलेली वेधशाळा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. पाली आणि मढ ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी दोन तीर्थक्षेत्रे जिल्ह्यात असून माथेरान हे हवा खाण्याचे सुप्रसिद्ध ठिकाण आहे. श्रीवर्धनची रोठा सुपारी व पेणच्या मूर्ती, पोहे आणि वाल प्रसिद्ध आहेत. इतिहासप्रसिद्ध किल्ल्यांचे लोकांना आजही आकर्षण असून रायगडवर नजिकच्या कालात शिवस्मृतिनिदर्शक वस्तुसंग्रहालय स्थापन करणाचे प्रयत्‍न चालू आहेत.  शासनाने कर्नाळा येथे पक्ष्यांसाठी अभयारण्य निर्माण केले असून पर्यटकांसाठी सुखसोई केल्या आहेत. कोकण रेल्वे, जुळी मुंबई व मुंबई–उरण पुलानंतर कुलाबा जिल्ह्याचे महत्त्व खूपच वाढणार आहे.      

                                                 शाह, र. रू.

कुलाबा जिल्हा


 अलिबागचा जलदुर्ग रायगडावरील टकमक टोक  औद्योगिक वसाहत, पनवेल 
 'पॅनोरॅमा पाँइंट', माथेरान  भिरा बीज केंद्र  टाटा विद्युतगृह, खोपोली
 बैलगाडच्यांची चाके तयार करण्याचा ग्रामोद्योग, पनवेल.  चुंबकीय वेधशाला,अलिबाग  गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे