गरीबदास-२ : (सु. १५६६–सु. १६३६). एक हिंदी संतकवी. ⇨ दादू पंथाचा संस्थापक दादूदयाल (१५४४–१६०३) याचा तो पुत्र. त्याचा जन्‍म राजस्थानमधील सांभर येथे झाला. तो कवी, संगीतज्ञ व वीणावादक होता. दादूदयालच्या मृत्यूनंतर त्याला दादू पंथाची गादी मिळाली पण त्याने तिचा त्याग केला. त्याच्या नावावर बरीच ग्रंथरचना सांगितली जाते तथापि आज मात्र त्याची अनभै प्रबोध, पद, साखी आणि चौबोले  एवढीच रचना उपलब्ध आहे. त्याची ही उपलब्ध रचना जयपूर येथून गरीबदासजी की बानी ह्या नावाने प्रसिद्ध झाली आहे. सांभरजवळील नराने येथे त्याचे निधन झाले. तेथे ‘गरीबसागर’ नावाचा एक तलाव त्याच्या नावाने बांधलेला आहे.

बांदिवडेकर, चंद्रकांत