कोरियन भाषा-साहित्य : मँचुरियाच्या दक्षिणेला, जपानचा समुद्र व पीत समुद्र यांनी वेढलेल्या कोरियाच्या द्वीपकल्पात बोलली जाणारी कोरियन ही एक महत्त्वाची भाषा. तिचे कौटुंबिक नाते सबळपणे प्रस्थापितझालेलेनसले, तरी ती व जपानी या एकवर्गीय आहेत, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. तिचा समावेश उरलअल्ताइक भाषांत करता येईल, असेही काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
मुळात ही भाषा कोरियात बोलली जात असली, तरी पुढे ती मँचुरिया व सायबीरिया या प्रदेशांत पसरली. हवाईपर्यंतही तिचे भाषिक आढळून येतात. एकंदर भाषिकांची संख्या४कोटींपेक्षा जास्त असावी.
कोरियन भाषेचे सुरुवातीचे साहित्य काव्यमय असून ते चित्रलेखन पद्धतीने लिहिलेले आहे. त्याचा प्रारंभ सातव्या-आठव्या शतकाच्या सुमारास झाला. सु.१४४६मध्ये सेजोंग राजाच्या कारकिर्दीत त्याच्याच प्रयत्नाने कोरियाची ‘हानगुल’ ही उच्चारानुसारी लिपी अस्तित्वात आली, असाही एक उल्लेख आढळतो. पुढे चीनमधून आलेल्या बौद्ध संस्कृतीच्या प्रभावामुळे नवे साहित्य निर्माण झाले. याशिवाय चिनी भाषेत लिहिलेले सरकारी कागदपत्र आणि कोरियन लेखकांनी आधी चिनी भाषेत लिहिलेल्या कथांचे, मागून कोरियन भाषेत झालेले अनुवाद आहेत.
यूरोपियन संस्कृतीच्या व ख्रिस्ती धर्माच्या प्रभावामुळे कन्फ्यूशस व बुद्ध यांच्या परंपरेपेक्षा वेगळी अशी एक सांस्कृतिक चळवळ विसाव्या शतकात सुरू झाली. साहित्याचे स्वरूप अधिक आधुनिक बनले आणि आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याची जाणीव निर्माण झाली.
कोरियनच्या उत्तरेकडच्या बोली दक्षिणेकडच्या बोलींपेक्षा उच्चाराच्या दृष्टीनेच भिन्न आहेत. सेऊलची बोली ही प्रमाण भाषा म्हणून मानली गेली आहे. लिखित भाषा चिनी भाषेने प्रभावित झालेली असून, शब्दसंग्रहात मंगोल, संस्कृत, जपानी त्याचप्रमाणे इंग्लिश आणि इतर यूरोपियन भाषांतून घेतलेले शब्द आढळतात.
ध्वनिव्यवस्था : कोरियनचे ध्वनी पुढीलप्रमाणे आहेत :
स्वर : मुख्य स्वर पाच असून ते आ, इ, ए, उ, ओहे आहेत. यांशिवाय कमीअधिक उद्धाटनामुळे, त्याचप्रमाणे ओठ गोल किंवा पसरट ठेवून मिळणारे काही विकारयुक्त स्वर आहेत.
व्यंजने : एकंदर व्यंजने पंचवीस असून त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे :
ओष्ठ्य | दंत्य | दंतमूलीय | तालव्य | मृदुतालव्य | |
शिथिल स्फोटक | प (ब) | त (द) | – | – | क (ग) |
अनुनासिक | म | न | – | – | ङ् |
अर्धस्फोटक | – | – | – | च (ज) | – |
घर्षक | – | स | र, ल | श | – |
दृढ स्फोटक | प्प | त्त, स्स | – | त्त | क्क |
महाप्राण | फ | थ | – | छ | ख, ह |
सघोष स्फोटक तसेच र सामान्यपणे शब्दारंभी येत नाहीत.
रूपविचार : नाम : मूळ नाम व्यंजनान्त असल्यास त्याला इ आणि स्वरान्त असल्यास गा हा प्रत्यय लागून, त्याचे प्रथमेचे रूप होते. अंत्य व्यंजन ल किंवा त असल्यास त्यांचे अनुक्रमेरआणिसहोतात.बाराम्-बारामि ‘वारा’ बि-बिगा ‘पाऊस’ हानुल-हानुरि ‘आकाश’ मोत्- मोसि ‘तळे’.
षष्ठीचा प्रत्यय ए, चतुर्थीचा एगे व द्वितीयेचा उल् (स्वरानंतर ऊल् ) आहे.
अनेकवचन एकवचनाला दुल् हा प्रत्यय लावून होते : आहि ‘मूल’- आहिदुल बुइन ‘स्त्री’- बुइन्दुल. या अनेकवचनानंतर वर दिलेले विभक्तिप्रत्यय लागतात.
सर्वनाम : सर्वनामे ना ‘मी’ उरि ‘आम्ही’ दाङ्सिन ‘तू’ दाङ्सिन – दुल् ‘तुम्ही’ गुइ ‘तो’, ‘ती’ गुइ-दुल ‘ते’, ‘त्या’.
क्रियापद : क्रियापदांची रूपे कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे बदलत नाहीत. एकच रूप सर्वत्र चालते. मूळ धातूला प्रथम कालवाचक प्रत्यय, नंतर (आवश्यक असल्यास) सुम्ने हा गौरवार्थी प्रत्यय व शेवटी सामान्य विरामदर्शक दा हा प्रत्यय लागतो.
धातू : मुग्, हेत्वर्थक – मुगु
वर्तमानकाळ – मुग् -सुम्ने-दा (प्रत्यय शून्य)
भूतकाळ – मुग् -उत्- सुम्ने-दा (प्रत्यय उत्)
भविष्यकाळ – मुग-गेत्- सुम्ने-दा (प्रत्यय गेत्).
विधान प्रश्नवाचक करायचे असले, तर दा ऐवजी ग्गा हा प्रत्यय लागतो.
विशेषण : विशेषणांच्या रूपात ‘असणे’ ही कल्पना अभिप्रेत असून, त्यामुळे त्यांचा क्रियापदांसाखा उपयोगही होऊ शकतो. कू-उ ‘मोठा असणे’ जुग-उ ‘लहान असणे’. दोन किंवा अधिक विशषणे गो या संयोजकाने जोडली जातात. तरतमभाव दाखविणारा प्रत्यय विशेषणापूर्वी लागतो. विशेषणाला गे हा प्रत्यय लागून क्रियाविशेषण बनते.
याघा-न ‘दुर्बळ’ |
याघा-गे ‘दुर्बळपणे’ |
दु-याघा-न ‘अधिक दुर्बळ’ |
दु-याघा-गे |
जेइल-याघा-न ‘सर्वांत दुर्बळ’ |
जेइल-याघा-गे. |
संख्याविशेषणे पुढीलप्रमाणे आहेत :१हाना, २दुल्, ३सेत्, ४नेत्, ५दासुत्, ६युसुत्, ७निल्गोब्, ८युदुल्ब, ९आहोब, १०युल्,११युर्हाना इत्यादी. क्रमवाचक विशेषणे या विशेषणांनाचाहा प्रत्यय लागून होतात. फक्त ‘पहिला’ या अर्थी चुत्- चा प्रयोग आहे.
नमुन्यासाठी वाक्ये :
ना-बा दाङ्सिन-ग्वा गु-न्युजा ‘मी, तू आणि ती स्त्री’
सो-गा पुर्-उल् मुग्-सुम्नेदा ‘गाय गवत खाते (आहे)’
सो-गा-पुर्-उल् मुग्-सुम्नेग्गा ‘गाय गवत खाते (आहे) का?’
गुइ-गा-उरि-आबुजि-रुल बो-आत्सुम्नेग्गा ‘तो आपल्या वडिलांना भेटला का?’
वरील थोड्याशाच उदाहरणांवरून कोरियन वाक्यांची रचना किती स्पष्ट आहे, ते दिसून येईल. प्रत्येक शब्दाचे वाक्यातील कार्य दर्शविणारा प्रत्यय स्पष्ट असल्यामुळे त्याचा क्रम दुय्यम ठरतो. क्रम केवळ विशिष्ट शब्दाला महत्त्व देण्यापुरताच बदलणे शक्य असते.
कालेलकर, ना. गो.
साहित्य : कोरियाची बोलभाषा चिनी भाषेपेक्षा अगदीच वेगळी आहे. तथापि कोरियाच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात जवळजवळ सर्व लिखाण चिनी भाषेत आणि चिनी लिपीत होत गेले असल्याने, कोरियन साहित्य व चिनी साहित्य यांतील फरक ठरवणे बऱ्याच वेळी अशक्य होते. या प्रकारास कोरियन काव्य आणि लोकनाट्य हे मात्र अपवाद आहेत.
प्राचीन काळी कोरियन लोकगीते चिनी लिपीमध्ये लिहिणे केवळ अशक्य असल्यामुळे त्याची परंपरा पाठांतरानेच जिवंत ठेवली गेली. सातव्या शतकाच्या शेवटी सल छाँग या कवीने मात्र प्रथम चिनी लिपीवर आधारलेली एक कोरियन लिपी निर्माण करून तीत कोरियन काव्य लिहून ठेवले. नंतर १४४६ साली सेजोंग राजाने हानगुल ही कोरियन लिपी प्रचारात आणल्यावर खास कोरियन काव्यरचनेला चालना मिळाली.
कोरियन काव्याचा विकास प्रामुख्याने सिला या राजवंशाच्या राजवटीत झाला. त्यानंतर बौद्धधर्माचा प्रसार झाल्याने काव्यावर त्याची छाप पडली. तेराव्या शतकातील एक काव्यप्रकार ‘सेनेनतोरे’ यावर बौद्ध धर्माचा खास पगडा दिसतो. ‘छांग-गा’ (दीर्घ कविता) या काव्यप्रकारात मानवी सुखदु:खे व प्रेम यांचा आविष्कार आढळून येतो. खंडकाव्य हा प्रकार या राजवंशात (पंधरावे शतक) रूढ झाला. त्याचप्रमाणे या शतकात इतर अनेक प्रकारची काव्ये रचली गेली. त्यावेळी कोरियन लिपी उपलब्ध झाल्यामुळे ती लिहून ठेवणेही सोपे गेले. ‘शिनो’ हा एक काव्यप्रकार अत्यंत लोकप्रिय ठरून त्यानंतर कित्येक शतके या प्रकारात काव्यरचना झाल्याचे दिसते. ह्वांग छीन-यी, युन सन-दो हे या प्रकारातील सर्वांत प्रसिद्ध कवी आहेत. ‘कासा’ हा काव्यप्रकार लोकगीतासारखा आहे.
पंधराव्या शतकात काव्याप्रमाणे इतर साहित्यप्रकारांचाही वेगाने विकास झाला. लोकनाट्येही त्याच वेळी लिहून ठेवली गेली आणि ती लोकप्रियही झाली.
बाकी सर्व प्रकारचे लिखाण मात्र चिनी भाषेतून व चिनी लिपीतून करण्यात आले. कोरियाचा पहिला इतिहास सिला काळात लिहिण्यात आला. त्यानंतरचे कोर्यो काळातील किम फू शिक याचासामगुक सागी (तीन राज्यांचा इतिहास) आणि पंधराव्या शतकातीलकोर्यो-सा (कोरियाचा इतिहास) हे दोन ग्रंथ आधारग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहेत. हे ग्रंथ कन्फ्यूशस तत्त्वाला अनुसरून लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे कन्फ्यूशस तत्त्वज्ञानावर पंधराव्या शतकापासून इतर अनेक ग्रंथ, कोशरचना व भाष्येही निर्माण होऊ लागली. सतराव्या व अठराव्या शतकांत कादंबरी हा साहित्यप्रकारही पुढे आला. तथापि प्रतिष्ठित वर्गात त्याला महत्त्व नसल्याने, कादंबऱ्या निनावी किंवा टोपणनावाखाली प्रसिद्ध होत.
कोरियात सहाव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतर धार्मिक सूत्रे, सूत्रभाष्ये व काव्य यांची प्रचंड प्रमाणावर निर्मिती होऊ लागली. तथापि ही सर्व रचना चिनी भाषेतच आहे. त्रिपिटक हा ग्रंथ छापण्याचे पंधराव्या शतकात तयार केलेले८१,१३७ ठसे अजूनही उपलब्ध आहेत.
जपानने १८९५ साली कोरिया जिंकल्यानंतर कोरियन भाषेवर बंदी घालण्यात आली. ती १९४५ सालापर्यंत जारी राहिली. या काळात चोरून देशभक्तिपर कविता आणि गोष्टी रचिल्या गेल्या.१९४५ नंतर मात्र हानगुल ही कोरियन लिपी सर्वत्र रूढ झाली. अलीकडील सर्व लिखाण त्याच लिपीतून केले जाते. या लिखाणावरील पाश्चात्त्य साहित्याचा ठसा फारच जाणवतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात छॉ नाम सन आणि यी क्वांग-सू हे दोन कादंबरीकार आणि किम सो वल, किम की रिम आणि चाँग ची-युंग हे कवी विशेष महत्त्वाचे ठरले.
देशिंगकर, गि. द.
संदर्भ : 1. Meillet, Antoine Cohen, Marcel, Les langues du Monde, Paris, 1954.
2. Park-Oral, K.D.Korean for Beginners, Hanolulu, 1945.
“