गन कॉटन : एक स्फोटक पदार्थ व नायट्रोसेल्युलोजाचा एक प्रकार. पेलौझी यांनी १८३८ मध्ये कापूस व नायट्रिक अम्‍ल यांची विक्रिया करून एक ज्वलनशील पदार्थ तयार केला. शन्बाइन यांनी १८४५ मध्ये सल्फ्यूरिक व नायट्रिक अम्‍ल मिश्रण आणि कापूस यांची विक्रिया करून गन कॉटन हा नवीन स्फोटक पदार्थ तयार केला. गन कॉटनचे उत्पादन सुलभ होण्यासाठी या पद्धतीत १८४९–५२ या काळात फोन लेंक यांनी बऱ्याच सुधारणा केल्या आणि गन कॉटन उत्पादनाचा एक कारखाना व्हिएन्ना येथे काढला.

सल्फ्यूरिक व नायट्रिक या अम्‍लांच्या मिश्रणाची व सेल्युलोजाची विक्रिया केल्यावर मिळणाऱ्या नायट्रोसेल्युलोजाचा एक प्रकार म्हणजे गन कॉटन होय. गन कॉटन या प्रकारात नायट्रोजनाचे प्रमाण १२·९% किंवा त्याहून अधिक असते. हे प्रमाण कमी झाल्यास गन कॉटन तयार होत नाही. मोठ्या प्रमाणावर गन कॉटन तयार करण्यासाठी विस्थापन (एका रेणू, अणू वा अणुगटाऐवजी दुसरा रेणू, अणू वा अणुगट बसविण्याची रासायनिक विक्रिया) पद्धत व यांत्रिक रीतीने लोखंडी वा मातीच्या भांड्यात बुडविण्याची पद्धत वापरतात [→ सेल्युलोज].

गन कॉटन हा एक गंधहीन, चवहीन व उदासीन (अम्‍लीय किंवा क्षारीय, म्हणजे अम्‍लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म नसणारा) पदार्थ आहे. सुट्या स्थितीत तो कापसासारखा दिसतो. थंड किंवा गरम पाण्यात तसेच अल्कोहॉल, ईथर, ॲसिटिक अम्‍ल आणि नायट्रोग्‍लिसरीन यांत अविद्राव्य (न विरघळणारा) तर ॲसिटोन, एथिल ॲसिटेट, ॲमिल ॲसिटेट व नायट्रोबेंझीन यांमध्ये जलद विद्राव्य. शुष्क स्थितीत शीघ्र ज्वालाग्राही असून सु. १५० से. तापमानाला पेटल्यावर त्याचा स्फोट होतो. त्याच्या भौतिकीय स्वरूपावर त्याचा प्रज्वलनबिंदू (पेटण्याचे तापमान) अवलंबून असतो. योग्य प्रमाणात ओला केल्यास त्याची ज्वालाग्राहिता कमी होते. साठवण व वाहतूक करताना त्यामध्ये १३% पाणी व अल्प प्रमाणात अल्कोहॉल घालून तो ओला करतात. गन कॉटनचे काळानुसार अपघटन (घटक अलग होणे) होते व हवेत नायट्रोजन डाय-ऑक्साइड तयार होतो आणि त्याची पुढील अपघटनाच्या क्रियेस मदत होते.

ओलसर स्थितीत गन कॉटनचा प्रस्फोटक (शीघ्र स्फोटक) म्हणून उपयोग करण्यात आलेला आहे परंतु तो हाताळण्यास धोक्याचा असल्याने तितकासा समाधानकारक नाही. शुष्क गन कॉटनचा घर्षण, आघात, उष्णता इ. कारणांनी जलद स्फोट होत असल्यामुळे तो हाताळणे अधिकच अवघड असते. गन कॉटन अधिस्फोटनाला (स्फोट घडवून आणण्यास ) मदत करतो व त्याची उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता साधारणपणे टीएनटी (ट्रायनायट्रोटोल्यूइन) एवढी असते. निव्वळ गन कॉटनचा लष्करी परिचालक (वस्तूला गती देण्यासाठी उपयोगी पडणारा ज्वलनशील द्रव्ये असणारा पदार्थ) म्हणून उपयोग करण्याचे प्रयत्‍न झाले पण ते निष्फळ ठरले.

ओलसर स्थितीत त्याचा उपयोग लष्करी अभियंते बांधकाम वगैरे उद्‍ध्वस्त करण्यासाठी वापरतात. तोफा, बंदुका व रॉकेटे यांच्या परिचालक द्रव्यांत, तसेच टॉर्पेडोच्या स्फोटक द्रव्यात व पाणसुरुंगातही त्याचा उपयोग करतात. धूम्रविरहित चूर्ण (बंदुकीच्या दारूऐवजी वापरण्यात येणारे व धूर न होणारे चूर्ण) बनविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. 

पहा : स्फोटक द्रव्ये.                                                   

काजरेकर, स. ग.