गदायुद्ध : दहाव्या शतकात होऊन गेलेल्या रन्न नावाच्या कन्नड कवीने लिहिलेले हे महाकाव्य कन्नड साहित्यातील ‘कृतिरत्न’ म्हणून गणले जाते.
रन्न या कवीचा जन्म मुदुवोळलू (सध्याचे मुधोळ, जि.विजापूर) या गावातील एका जैन कासाराच्या कुटुंबात झाला. स्वत:च्या प्रतिभेने व बुद्धिसामर्थ्याने गदायुद्ध हे महाकाव्य लिहून त्याने आपले नाव अमर करून ठेवले आहे. श्रवणबेळगोळ येथील मराठी शिलालेखाचा कर्ता चावुंडराय याच्याकडे काही काळ राहून त्याने विद्या संपादन केली. या शिलालेखात त्याचेही नाव कोरलेले आढळते. पुढे चालुक्य वंशातील सत्याश्रय राजाच्या आश्रयाला राहून त्याने काव्यरचना केली. ‘कवि चक्रवर्ती’ अशी त्याला पदवी होती. सत्याश्रय राजालाच भीमाच्या ठायी लेखून, अपरोक्षपणे त्याने त्याला आपल्या गदायुद्ध काव्याचा नायक बनविले आहे. त्या काळी क्षात्रधर्मास असलेल्या प्रतिष्ठेस अनुसरून त्याने या काव्याची रचना केली [→ रन्न].
या कवीचे उपलब्ध ग्रंथ दोन. यांपैकी अजितपुराण मध्ये त्याने दुसरा तीर्थंकर अजितस्वामी याचे चरित्र वर्णिले आहे. दुसऱ्या ग्रंथाचे नाव गदायुद्ध. यालाच साहसभीमविजय असेही दुसरे नाव आहे. या ग्रंथाच्या लेखनकालाविषयी संशोधकांत मतभेद आहेत. निश्वित वर्ष जरी सांगता आले नाही, तरी हा ग्रंथ ९८२ ते १००८ या काळाच्या दरम्यान लिहिला गेला असावा, असे मानण्यास बरीच जागा आहे.
व्यासभारताच्या सौप्तिक पर्वातील कथानकाने इथे संपूर्ण आणि स्वतंत्र कन्नड रूप धारण केले आहे. ⇨पंप या कवीच्या कन्नड भारतातील अखेरची युद्धदृश्ये तसेच भासाचे ऊरुभंग, भट्टनारायणाचे बेणिसंहार या कृतीही कवीला प्रेरणा देण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. यांतील काही प्रसंग, थोड्याफार फरकाने गदायुध्दात वापरले गेले असेल, तरी कवीने आपल्या अलौकिक प्रतिभेने, ओजस्वी शैलीने व व्यक्तिचित्रणातील कौशल्याने या कृतीला महाकाव्याचे स्थान मिळवून दिले.
या काव्यात दहा आश्वास आणि ५७६ कडवी आहेत. रचना चंपू पद्धतीची म्हणजे काही भाग छंदोबद्ध पद्यात, तर काही भाग लयबद्ध अशा रसाळ गद्यात आहे. या काव्याची थोरवी त्यातील तेजस्वी कथानकात, सामर्थ्यवान संवादांत, समर्पक व ध्वनिपूर्ण भाषेत आणि वीर-रौद्र रसांनी ओथंबलेल्या नाट्यपूर्ण रचनेत आहे. एकंदरीत हे एक ‘दृश्यकाव्य’ असून त्याला धीरोदात्त शोकांतिकेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
यातील प्रमुख व्यक्तिरेखा भीम, दुर्योधन व द्रौपदी. यात भीम हा नायक ठरत असला व शेवटी द्रौपदीसह त्याचा राज्याभिषेक दाखविला असला, तरी दुर्योधन खलनायक नाही. त्याला फारतर प्रतिनायक म्हणता येईल. कवीने दुर्योधन अत्यंत स्वाभिमानी, शूर आणि तेजस्वी रंगविला असून, स्वत:च्या अतिरेकी वागणुकीने स्वत:चाच नाश ओढवून घेण्यास तो कारणीभूत झाला, असे दाखविले आहे. यातील दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेस कवीची सहानुभूती लाभत असल्यामुळे,त्याच्या अध:पतनाला कारुण्याची किनार असल्याचे जाणवते.
विस्ताराने छोटे असले, तरी अंगभूत नाट्यगुणांमुळे, अलंकाराने नटलेल्या रसरशीत भाषेमुळे व आशयघन अभिव्यक्तीमुळे कन्नड साहित्यात गदायुध्दाचे स्थान ग्रीक शोकात्मिकेच्या तोडीचे गणले जाते.
वर्टी, आनंद