कोबे : जपानच्या होन्शू बेटामधील दक्षिणेकडील ह्योगो विभागाची राजधानी आणि जपानचे महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या १२,८३,००० (१९७३). हे ओसाका उपसागरावर, ओसाका शहराच्या २९ किमी. पश्चिमेस आहे. १८६८ पूर्वी हे छोटे मच्छीमारी खेडे होते. याच्या पश्चिमेस मीनाटो नदी आणि त्यापलीकडे ह्योगो हे मोठे बंदर होते. १८८९ मध्ये ह्योगो कोबेमध्ये विलीन करण्यात आले.

कोबे बंदर

कालांतराने मीनाटो, सुमा, निशिओ, तारुमाई, अरिमा, मीकागे, दोजो व नागाओ ही परिसरातील शहरेही कोबेमध्ये विलीन करण्यात आली. सु. १,००० मी. पर्यंतच्या रोक्को, मय इ. टेकड्या आणि उपसागर यांमधील १·५ ते २·५ किमी. रुंदीच्या पट्ट्यावर कोबे शहराचा पसारा असून टेकड्यांवर आलीशान बंगले व हॉटेले आहेत. उत्कृष्ट बंदरामुळे ओसाकाखालोखाल कोबेची औद्योगिक वाढ झाली. बोटी बांधणे, लोखंड व पोलाद उद्योग, विमाने, विद्युत्‌यंत्रे, कापड, कपडे, साखर शुद्धीकरण, पुस्तके, रबरवस्तू इत्यादींचे उद्योग येथे असून आंतरराष्ट्रीय व्यापारी उलाढालींत हे जपानमध्ये अग्रेसर आहे.

शाह, र. रू.