गंजीफा : पत्त्यांचा एक भारतीय खेळ. हा खेळ प्राचीन काळी लोकप्रिय होता. महाराष्ट्रात हा खेळ ‘दशावतारी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

गंजीफात मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी असे दहा अवतारांचे पत्ते असतात. हे चांगले कलात्मक आणि गोल आकाराचे असतात. प्रत्येक अवताराची राजा किंवा मीर (अमीर), वजीर आणि एक्का ते दश्शा अशी बारा बारा पाने असतात. एकूण १२० पत्त्यांचा संच असतो.

मत्स्याच्या पोटातून निघालेला विष्णू तो मत्स्य राजा, कासवाच्या पोटातून जन्म घेतलेला विष्णू तो कच्छ राजा, वराहाच्या पोटातून जन्म घेणारा विष्णू तो वराह राजा, खांबातून बाहेर पडून हिरण्यकश्यपूचा वध करणारा विष्णू तो नरसिंह राजा, बटू वामन असलेला वामन राजा अशी पहिल्या पाच राजांची चित्रे असतात. परशुराम ते कलंकी यांची चित्रे उरलेल्या राजांच्या पत्त्यावर असतात. प्रत्येक अवताराच्या चित्राबरोबरच घोडेस्वार काढलेला असतो तो वजीर. त्या त्या अवताराचे लहान चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते या खेळात असतात.

प्रत्येक अवतारातील राजाचा पत्ता श्रेष्ठ असून त्याच्या खालोखाल वजीराचा दर्जा असतो. मत्स्य ते वामन या पहिल्या पाच अवतारांत वजीरानंतर एक्का ते दश्शा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कलंकी या पाच अवतारांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांसारखाच असला, तरी त्यानंतर दश्शा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्व्या, आठ्‌ठ्या अशा क्रमाने एक्क्याला सर्वांत खालचे स्थान असते.

हा खेळ तीन खेळाडू खेळत असल्याने प्रत्येकाला ४० पाने वाटतात. दिवसा राम राजा आणि रात्री कृष्ण राजा ज्याच्या हातात येईल, त्याला डाव सुरू करण्याचा अधिकार असतो. डाव सुरू करणाराला सुर्क्या असे म्हणतात. सुर्क्या राम राजा (किंवा रात्री कृष्ण राजा) आणि एक त्याच अवताराचे हलके पान खेळतो. त्यानंतर बाकीचे दोघे खेळाडू कोणतेही दोन दोन पत्ते टाकतात. ही सहा पाने सुर्क्याला मिळतात. या आणि इतर अनेक प्रकारांनी पाने मिळविता येतात. या खेळाला आधुनिक पत्त्यांच्या खेळांपेक्षा पुष्कळच जास्त वेळ लागतो. ज्याच्याकडे आधिक पाने जमतील, त्याला इतरांची पाने ओढता येतात. देणे-घेणे चालते. उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांची पाने ध्यानात ठेवून आखरी मारता येते. हा उच्च प्रकारचा जय समजतात.

गंजीफाच्या खेळात रंगरी, आखरी मारणे, उतारी करून घेणे, तिगस्त, आल्हाद, हर्दू आणि उत्तर सर असे अनेक प्रकार आहेत.

काबुने इस्लाम, आईन-इ-अकबरी, बाबरनामा, गिरिधरकृत गंजीफालेखन, श्री तत्त्वनिधी इ. अनेक ग्रंथांत गंजीफाविषयी वेगवेगळी माहिती सापडते. काही डावांत ९६ पाने असून चंग, किमास, बरात, समशेर इ. नावांनी ज्ञात असलेल्या डावांत बारा बारा पानांचे आठ गट असतात. चंग कांचनी नावाचा आठ रंगाचा गंजीफाचा एक प्रकार आहे. नऊ ग्रहांच्या, नऊ राशींच्या नवग्रहछद नावाचाही गंजीफा असतो. श्री तत्त्वनिधीत गंजीफाचे तेरा प्रकार दिलेले आहेत. आता हा खेळ जवळजवळ लुप्त होत आला आहे.

गोखले, श्री. पु.