खैरपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उत्तरेकडील एक जुने संस्थान. लोकसंख्या ३,०५,७८७ (१९४१). उत्तरेस सक्कर, दक्षिणेस हैदराबाद (सिंध) हे जिल्हे व पश्चिमेस सिंधू नदी आणि पूर्वेस जोधपूर व जैसलमीर ही संस्थाने (भारत) यांनी ते सीमित झाले होते. त्याचे क्षेत्रफळ १५,६७० किमी. असून त्यात १५३ खेडी व एकच शहर होते. सिंधवर सत्ता स्थापणाऱ्या बलुची टोळ्यांतील तालपूरच्या मीरांपैकी मीर सुहराबखानाने १७८३ मध्ये फूलपोत्रांकडून हा प्रदेश हस्तगत केला व हळूहळू राज्यविस्तार केला. थोड्याच अवधीत त्याने आपल्या कर्तृत्वाने उत्तरेकडील सबझालकोट, काश्मीर तसेच जैसलमीर वाळवंटाचा पूर्वभाग आपल्या अंमलाखाली आणला आणि संस्थानाच्या सुरक्षिततेसाठी अफगाणिस्तानला खंडणी देऊ केली. अफगाणिस्तानातील एकूण अस्थिरतेचा अंदाज घेऊन त्याने १८१३ मध्ये खंडणी थांबविली. तत्पूर्वी १८११ मध्ये मीर सुहराबने रुस्तुम या आपल्या मुलाकरिता राजत्याग केला. परंतु रुस्तुम आणि अली मुराद या भावांतील भांडणामुळे अंतःकलह सुरू झाला. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. १८३२ मधल्या तहानुसार सिंधू नदी आणि सिंधमधील रस्त्यांचा उपयोग करू देण्याच्या अटीवर इंग्रजांनी संस्थानाला मान्यता देण्याचे ठरविले. त्यामुळे सिंध प्रांत साहजिकच पुढे इंग्रजांनी जिंकला, तरी त्यांनी संस्थान खालसा केले नाही शिवाय १८६६  मध्ये संस्थानाला सनदही दिली. संस्थानाचा कारभार ब्रिटिशांनी नेमलेल्या वझिरामार्फत चाले, पण खंडणी द्यावी लागत नव्हती. खैरपूर, गंबट, मीरवह, फैजगंज, नारो ह्या तहसीली त्यात मोडत होत्या. १८९४ मध्ये अली मुराद मरण पावला व त्यामागून त्याचा मुलगा मीर फैज मुहम्मदखान गादीवर आला. त्याला १७ तोफांची सलामी होती. त्यावरील अधिकारी मुख्तियारकार, सक्करचा कलेक्टर हा या संस्थानाचा पोलिटिकल एजंट असे. मीरांनी मजूर वेठीला लावून सिंधमध्ये कालवे काढले, बरीचशी नापीक जमीन सुधारून सुपीक करण्याचे यत्न केले. येथील एक खनिज नॅट्रॉन उत्पन्नाचा एक मोठा भाग मानला जाई.

भारत पाकिस्तानच्या द्विराष्ट्र कल्पनेनुसार १९४७ मध्ये हे संस्थान पाकिस्तानात गेले. शिक्षण, आरोग्यादी व्यवस्थांबाबत हे संस्थान मागासलेले होते. येथील ८३%लोक मुसलमान असून बहुतेक शेती हाच धंदा करीत. काही जण लोकर व कापूस यांचे कपडे विणीत. गालिचे तयार करणे, हा एक येथील प्रमुख धंदा समजत. संस्थानातील मुसलमान विशेषतः सुन्नी पंथाचे होते तथापि संस्थानिक मात्र शियापंथी होते. संस्थानाची भाषा सिंधी होती.

कुलकर्णी, ना. ह.