पेंटलँडाइट : (निकोपायराइट). खनिज. स्फटिक घनीय, क्वचित आढळतात. (111) पृष्ठाला समांतर विभाजनतले असतात [→ स्फटिकविज्ञान]. ठिसूळ. भंजन शंखाभ. कठिनता ३.५ — ४. वि. गु. ४.६ — ५ (लोहाचे प्रमाण वाढले की. वि. गु. वाढते). चमक काचेसारखी वा धातूसारखी. रंग काशासारखा फिकट पिवळा. कस फिकट उदी. आपरदर्शक. रा. सं. (Fe, Ni)9S8. कधीकधी यात अल्पसे कोबाल्ट असते. हे अचुबंकी असते. मात्र तापविले असता यातून सल्फर डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडतो व हे चुंबकी होते. हे बहुधा शिलारस घन होऊन बनलेले असते. हे नोराइटासारख्या अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या) खडकात बहुधा नेहमी पायरोटाइटाच्या जोडीने आढळते. कधीकधी याच्याबरोबर मिलेराइट व निकोलाइट, तसेच कॅल्कोपायराइट, लोह व निकेलाची इतर खनिजे, असतात. कॅनडा (सडबरी), द. आफ्रिका (बुशव्हेल्ट), नॉर्वे (बोड) रशिया (पेत्सामॉ) व स्वीडन येथे हे आढळते. हे निकेलाचे प्रमुख धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे.
ठाकूर, अ. ना.