पृष्ठ : ग्रीक भूमितिविज्ञ यूक्लिड यांनी पृष्ठाची व्याख्या अशी दिली आहे की, ‘ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे ते पृष्ठ होय’. म्हणजेच पृष्ठाला जाडी नसते. आधुनिक गणिताच्या भाषेमध्ये पृष्ठांचे वर्णन असे करता येईल की, ‘त्रिमिती अवकाशातील सफाईदार द्विमिती बिंदू संच म्हणजे पृष्ठ’. पृष्ठाची परिचयातील उदाहरणे म्हणजे प्रतल, गोल, शंकू, चिती वगैरेंचा पृष्ठभाग इत्यादी. त्रिमिती अवकाशात फ(क्ष,य,झ)=० अशा समीकरणाने पृष्ठ मिळते. पृष्ठांचा अभ्यास निरनिराळ्या दृष्टिकोनातून केला जातो. जसे संस्थितिविज्ञानात्मक, मानीय, अनुरूपी, बैजिक गुणधर्मानुसारी इत्यादी. [⟶ संस्थितिविज्ञान भूमिती].