फूर्ये, बाराँ झां बातीस्त झोझेफ : (२१ मार्च १७६८ – १६ मे १८३०). फ्रेंच गणितज्ञ व भौतिकविज्ञ. उष्णतेच्या संवहनासंबंधीचा सिद्धांत [→ उष्णता संवहन] व त्याच्या संदर्भात विकसित केलेल्या गणितीय पद्धतीकरिता विशेष प्रसिद्ध.

त्यांचा जन्म ओसेर येथे झाला. आईवडिल लहानपणीच वारल्यानंतर त्यांनी ओसेर येथील स्थानिक सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व तेथेच त्यांची गणितातील बुद्धिमत्ता दिसून आली. सैन्यात प्रवेश मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरल्याने ते त्याच शाळेत १७८९ मध्ये शिक्षक झाले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात त्यांनी स्थानिक घडामोडीत ठळकपणे भाग घेतला व काही काळ तुरुंगवासही भोगला. १७९४ मध्ये त्यांनी पॅरिस येथील एकोल नॉर्मेल या संस्थेत शिक्षण घेतले व तेथेच अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढील वर्षी एकोल पॉलिटेक्‍निक ही संस्था स्थापन झाल्यावर तेथे त्यांची प्रथमतः साहाय्यक अध्यापक व नंतर गणितीय विश्लेषणाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १७९८ मध्ये नेपोलियन यांच्याबरोबर ईजिप्तला वैज्ञानिक सल्लागार म्हणून जाण्यासाठी गास्पार माँझ यांनी फूर्ये यांची निवड केली. ईजिप्तमधील पुरातत्त्वीय संशोधनाकरिता नेपोलियन यांनी स्थापन केलेल्या इन्स्टिट्यूट द ईजिप्त या संस्थेचे ते सचिव झाले. तेथे त्यांना राजदूत म्हणून महत्त्वपूर्ण कार्य करण्याबरोबरच बैजिक समीकरणांचा व्यापक निर्वाह (उत्तर), सिंचाई प्रकल्प यांसारख्या विविध प्रश्नांवर संशोधन केले. १८०१ मध्ये फ्रान्सला परतल्यावर नेपोलियन यांनी त्यांची ग्रनॉबल हे मुख्य ठिकाण असलेल्या ईझर प्रांताचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. येथे त्यांनी १८१४ पर्यंत काम केले व याच काळात उष्णता संवहनासंबंधीचे आपले सुप्रसिद्ध संशोधन केले. १८१५ साली नेपोलियन यांच्या पुनरागमनानंतर फूर्ये यांची ऱ्होन प्रांताचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली पण त्यांनी या पदाचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ संशोधन करण्याच्या उद्देशाने ते पॅरिसला आले. त्याच वर्षी ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

उष्णतेच्या संवहनासंबंधीच्या आपल्या संशोधनावर आधारलेला एक दीर्घ निबंध १८०७ मध्ये त्यांनी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसला सादर केला परंतु तो प्रसिद्ध करण्यात आला नाही. याचाच अधिक विस्तार करून सुधारलेला निबंध त्यांनी ॲकॅडेमीला सादर केला व त्याला १८१२ मध्ये ॲकॅडेमीचे पारितोषिक मिळाले. या निबंधाचा पहिला भाग Theorie Analytique de la Chaleur या नावाने ग्रंथरूपाने १८२२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या अतिशय महत्त्वाच्या ग्रंथांपैकी हा एक मानला जातो. शुद्ध व अनुप्रयुक्त गणिताच्या इतिहासातही या ग्रंथाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. कारण या ग्रंथात फूर्ये यांनी त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या श्रेढींच्या [⟶ फूर्ये श्रेढी] सिद्धांताचा विकास केला व आंशिक अवकल समीकरणांशी संबंधित असलेले मर्यादा मूल्य प्रश्न [⟶ अवकल समीकरणे] सोडविण्याकरिता त्याचा उपयोग केला. यातूनच पुढे फूर्ये विश्लेषण [⟶ हरात्मक विश्लेषण] व फूर्ये समाकल या गणिताच्या महत्त्वाच्या शाखा विकसित झाल्या. पुष्कळशी सत्‌ चलांची फलने [⟶ फलन] त्रिकोणमितीय श्रेढींच्या (चलाच्या पूर्णांकी पटींच्या ज्या व कोज्या यांच्या रूपातील श्रेढींच्या) स्वरूपात मांडता येतात, असे फूर्ये यांनी दाखवून दिले. यामुळे दीर्घ काळ चाललेल्या एका वादाचा शेवट झाला. तथापि ही श्रेढी संबंधित फलनाच्या मूल्याप्रत प्रत्यक्षपणे अभिसारी असते याची व्यापक सिद्धता त्यांना देता आली नाही. ही अडचण सु. शंभर वर्षांनंतर एच्‌. एल्‌. लबेग यांच्या समाकलाच्या [⟶ माप व समाकलन] विकासामुळे समाधानकारकपणे सुटू शकली. फूर्ये श्रेढींच्या अभ्यासाद्वारे पी. जी. एल्‌. डीरिक्ले, जी. एफ्‌. बी. रीमान, जी. कँटर वगैरे नामवंत गणितज्ञांनी गणितीय विश्लेषणात उल्लेखनीय कार्य केले.

समीकरण सिद्धांतातही फूर्ये यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी बैजिक समीकरणांच्या संख्यात्मक निर्वाहासंबंधी लिहिलेला निबंध ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसला १७८९ मध्ये सादर केला होता. त्यांनी समीकरणाच्या धन व ऋण निर्वाहांची संख्या ठरविण्याच्या रने देकार्त यांच्या नियमाचा विस्तार केला व त्याचाच उपयोग करून पुढे जे. सी. एफ्‌. स्ट्यूर्म यांनी आपले प्रमेय मांडले [⟶ समीकरण सिद्धांत]. बैजिक समीकरणांच्या सिद्धांतासंबंधीचे फूर्ये यांचे संशोधन त्यांच्या मरणानंतर १८३१ मध्ये Analyse des equations determinees या ग्रंथरूपाने सी. एल्. एम्. एच्. नेव्हिअर यांनी संपादित करून प्रसिद्ध केले.

फूर्ये ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे १८१७ मध्ये सदस्य व १८९२ मध्ये कायम सचिव झाले. १८२६ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य होते. १८०८ मध्ये नेपोलियन यांनी त्यांना बाराँ (सरदार) हा किताब दिला. ईजिप्तमध्ये त्यांनी केलेले पुरातत्त्वीय कार्य Deseription de lEgypt (१८०८-२५) या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाले. फूर्ये यांचे बहुतेक सर्व संशोधनात्मक कार्य २ खंडांत १८८८-९० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज. मिठारी, भू. चिं.