पुस्तपत्र : इंग्रजीतील ‘पॅम्फलेट’ किंवा ‘लिफलेट’ या ग्रंथप्रकाराला मराठीत पुस्तपत्र हा प्रतिशब्द योजिता येण्यासारखा असला, तरी त्याची सूत्रबद्ध अशी व्याख्या करणे कठीण आहे. साधारण चारपासून ऐंशीपर्यंत एकत्रित छापील पृष्ठे असलेल्या, क्वचित कागदी वेष्टणात टाचलेल्या, लहानशा पुस्तिकेला पुस्तपत्र अशी संज्ञा देता येईल. यूनेस्को या जागतिक संस्थेने पुस्तपत्राची पृष्ठसंख्या ४९ इतकी असावी, असा दंडक सुचविलेला आहे. पुस्तपत्राचा आकार मात्र लहानमोठा असू शकतो, असे दिसते. कारण वृत्तपत्राच्या चतकोर कागदाच्या आकाराची जशी पुस्तपत्रे आढळतात, तशीच ती इतरही अनेकविध आकार-प्रकारांत दिसून येतात.

पुस्तपत्रांचे विषय अनेक संभवतात किंबहुना पुस्तपत्रासाठी कोणताही विषय चालू शकतो. एखाद्या संस्थेच्या माहितीपासून तो एखाद्या प्रासंगिक तसेच वादग्रस्त प्रश्नापर्यंत सर्व विषयांवरील पुस्तपत्रे प्रसिद्ध झालेली आढळतात. ही पुस्तपत्रे विशिष्ट वाचकवर्ग डोळ्यापुढे ठेवून प्रसिद्ध केली जातात व त्यांचा मुख्य उद्देश प्रचार वा जाहिरात करणे हा असतो. पुस्तपत्र हे मुख्यतः प्रचारसाहित्य असते. धार्मिक, सामाजिक व राजकीय ध्येयवादाचा संप्रदाय पक्का आणि विस्तृत करण्याकरिता आणि त्यांच्या आधारे आंदोलन निर्माण करण्याकरिता व वाढविण्याकरिता पुस्तपत्र-साहित्य तयार होत असते. कोणतीही ठराविक सांप्रदायिक विचारसरणी युक्तिवादाच्या आधारे वाचकांपुढे मांडण्यासाठी बहुतेक पुस्तपत्रे लिहिली जातात. स्वमतसमर्थन आणि परमतखंडन हा त्यांचा गाभा असतो. स्वसंप्रदायाची नवी नवी माहिती त्या त्या वेळी प्रसारित करणे हाही त्यांचा एक उद्देश असतो. इंग्लंडमधील समाजवादी संप्रदायाच्या ⇨फेबियन मतप्रणालीच्या आणि साम्यवादी क्रांतीच्या विचारांचा प्रसार करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून पुस्तपत्रांचा वापर करण्यात आला. उद्योगधंदे, व्यापार, एखाद्या यंत्राच्या विविध प्रक्रिया, संस्था-संमेलनांतील चर्चा, अध्यक्षीय भाषणे, शासनाच्या वतीने घेण्यात आलेले विविध कार्यक्रम यांचाही परामर्श पुस्तपत्रातून घेतला जातो. भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या निमित्ताने – विशेषतः १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात – निघालेली माहितीपत्रे, दडपशाहीच्या काळात भूमिगत कार्यकर्त्यांनी काढलेली भित्तिपत्रके, निवेदने त्याचप्रमाणे संशोधन संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, साहित्य संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांची माहितीपत्रे ही सारी पुस्तपत्रेच होत.

पाश्चात्त्य देशांत पुस्तपत्रांचा ऐतिहासिक मागोवा इ.स. पंधराव्या शतकापासून घेता येतो. त्यावेळी त्यांचा उपयोग प्रामुख्याने धार्मिक चर्चेसाठी केला जाई. इंग्लिश कवी जॉन मिल्टन हा सतराव्या शतकातील एक प्रमुख पुस्तपत्रकार होता. पुढे अठराव्या शतकात पुस्तपत्राला राजकीय प्रचाराचे साधन म्हणून मान्यता मिळाली. एडमंड बर्क याचे रिफ्लेक्शन्स ऑन द रेव्होल्युशन इन फ्रान्स हे १७९० सालचे पुस्तपत्र फार परिणामकारक ठरले. कार्ल मार्क्स व फ्रीड्रीख एंगेल्स यांचे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे अनन्यसाधारण पुस्तपत्र होय.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नियतकालिकांनी काही प्रमाणात पुस्तपत्रांची जागा घेतली असली, तरी त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. प्रासंगिक स्वरूपाची पुस्तपत्रे त्यातील माहिती ग्रंथात समाविष्ट झाल्याची खात्री करून घेतल्यानंतर ग्रंथालयातून काढून टाकली जातात हे खरे असले तरी शासकीय, वाङ्‌मयीन, तसेच संशोधनदृष्ट्या महत्त्वाची पुस्तपत्रे ही सूचिलेखन, वर्गीकरण इ. ग्रंथालयीन संस्कार करून कायम जतन करून ठेवली जातात.

मराठीत पुस्तपत्रांची व्यवस्थित माहिती एकतर आढळत नाही व दुसरे म्हणजे प्रकाशकांच्या याद्या, ग्रंथसूची, राष्ट्रीय ग्रंथसूची यांसारख्या अधिकृत सूचींत पुस्तपत्राचा समावेश केला जात नाही. त्यामुळे अशी पुस्तपत्रे मराठीत केव्हापासून छापली जातात, प्रतिवर्षी किती निघतात, यांविषयी संगतवार माहिती मिळणे कठीण आहे. तथापि काही महत्त्वाच्या पुस्तपत्रांचा उल्लेख करता येण्यासारखा आहे : ना. आ. दीक्षित लिखित स्त्रीपुनर्विवाहाच्या अशास्त्रतेबद्दलचा झालेला भाषण वृत्तांत (१८०७ पृ. १४), पुणे येथील जातिधर्मासंबंधी व्यवहाराचें निर्णयपत्र : श्रीजगद्‌गुरू शंकराचार्य स्वामीमठ करवीर व संकेश्वर यांच्या आज्ञेने कोल्हापूर येथे ज्ञानसागर छापखान्यांत छापीले (१८९४ पृ.१२), काशीनाथशास्त्री वामन लेले यांचे वाई पुण्यांतील आश्वलायन व हिरण्यकेशीय यांच्यामधील दुही व तिची कारणे (१९१२ पृ. २३), शंकर नारायण जोशीकृत मुळशी पेट्यासंबंधी ऐतिहासिक माहिती (१९२२ पृ. २४), महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा प्रकाशित गांधीवधोत्तर जाळपोळीच्या चौकशीचा वृत्तांत (१९४८), दत्तो वामन पोतदार यांचे संयुक्त महाराष्ट्र (१९४८ पृ. २६), अ. का. प्रियोळकर लिखित शंभर वर्षांपूर्वीचा भाषिक त्रिकोण (१९४८ पृ. ६), इरावती कर्वेकृत नवीन हिंदु कायद्याचे स्वरूप (१९५० पृ.१२) आणि श्री. ना. बनहट्टी लिखित ज्ञानदेवीचे पाठसंशोधन (१९६५ पृ. १४). महादेवशास्त्री दिवेकर यांची अस्पृश्योद्धार विचार, धर्मभ्रष्टांचे शुद्धीकरण, क्षत्रिय वैश्यांचे शास्त्रसिद्ध अस्तित्व आणि प्रायश्चित्तहिंदु विधवांचा धर्म ही चार पुस्तपत्रे एकत्रित स्वरूपात वाईच्या प्राज्ञ पाठशाळामंडळ पुस्तकमालेतून पहिली चार पुस्तके या नावाने प्रकाशित झाली (१९२६).

पेठे, म. प.