पुरुषार्थ : भारतीयांनी मानलेली धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. या भारतीय मूलभूत संकल्पनेचा अर्थ असा : ‘पुरुष’ या संज्ञेचा मूळ अर्थ ‘शरीरात राहणारा आत्मा’ वा केवळ ‘आत्मा’असा असल्यामुळे त्या संज्ञेच्या अर्थात पुरुषाप्रमाणेच स्त्रीचाही समावेश विवक्षित आहे. ‘अर्थ’ म्हणजे इष्ट (इच्छिलेली गोष्ट) किंवा उद्दिष्ट होय. स्त्री-पुरुषांना इष्ट वाटणाऱ्या सर्व गोष्टी चार पुरुषार्थांत अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
या पुरुषार्थचतुष्ट्याला चतुर्वर्ग असे म्हटले जाते. प्रारंभी पारमार्थिक कल्याणाचा विचार धर्मांतर्गत असल्यामुळे मोक्ष हा स्वतंत्र पुरुषार्थ नव्हता आणि त्रिवर्गाचीच कल्पना रूढ होती. पुढे धर्माचे प्रवृत्तिपर व निवृत्तिपर असे दोन भाग होऊन निवृत्तिपर धर्म (म्हणजे विश्वाच्या बंधनापासून मुक्ती) म्हणजे मोक्ष असे म्हटले गेले आणि मग त्रिवर्ग व चतुर्वर्ग अशा दोन संकल्पना रूढ झाल्या.
सामान्यतः यज्ञादी शास्त्रविहित कर्मांचे आचरण आणि सत्य, अहिंसा इत्यादींनी युक्त असे शुद्ध नैतिक वर्तन म्हणजे धर्म होय. मानवाला ‘कामा’ चे जितके स्वाभाविक आकर्षण असते तितके धर्माचे नसते. म्हणून त्याने आपले मन प्रयत्नपूर्वक धर्माकडे वळविणे आवश्यक असते. कारण धर्माच्या अभावी जीवन स्वैर व उच्छृंखल बनून अधःपतित होते परंतु धर्म हा दुःखपर्यवसायी व लोकविद्विष्ट असेल तर त्याचा त्याग करावा, असेही मत होते. अर्थसाधना म्हणजे उपयुक्ततावादाच्या दृष्टिकोनातून भूमी, सोनेनाणे, पशू, धान्य इत्यादींची प्राप्ती, वृद्धी व रक्षण करणे होय. अर्थाच्या अभावी शरीरधारणाही अशक्य असल्यामुळे इतर पुरुषार्थांची प्राप्तीही अशक्य होते आणि व्यक्ती व समाजाचे स्वास्थ्य नष्ट होते. अर्थाचा अतिरेकी हव्यास मात्र अनिष्ट होय. इंद्रियांनी अनुकूल विषयांचा सुखोपभोग घेणे म्हणजे कामपूर्ती होय. धर्माशी अविरोधी ‘कामा’ ला गीतेत परमेश्वराची विभूती मानले आहे. कामतृप्ती ही अन्नाप्रमाणेच अत्यावश्यक असल्यामुळे, तिच्या अभावी व्यक्ती विकृत आणि दुःखी बनते, हा विचार वात्स्यायनापासून बर्ट्रंड रसेलपर्यंत अनेकांनी मांडला आहे. परंतु माणसाचा स्वाभाविक कल ‘कामा’ कडेच असल्यामुळे संतुलन साधण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला म्हणजे ⇨ मोक्ष प्राप्त होतो आणि त्यानंतर संसारचक्रातून सुटका होऊन परमानंद लाभतो, अशी सामान्यतः मोक्षकल्पना आहे. ज्याला या चतुर्वर्गापैकी एकही पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही, त्याचे आयुष्य निरर्थक मानले जाते. यांपैकी अर्थ व काम हे नास्तिकांना पूर्णपणे मान्य असतात परंतु रूढ धर्म वा मोक्ष मात्र मुळीच मान्य नसतो. अर्थात, अर्थ व कामावर नियंत्रण ठेवणारे कायद्याचे राज्य वा एखादी तत्सम व्यवस्था त्यांना मानावीच लागते. त्यामुळे नाव बदलेले तरी धर्माचे मूळ उद्दिष्ट उरतेच. अर्थात, रूढ धर्म वा मोक्ष न मानताही मानवाच्या ऐहिक जीवनाची व्यवस्था लावणे शक्य आहे.
सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ कोणता याविषयी अनेक मते आहेत. सर्व पुरुषार्थ व्यापक अर्थाने धर्मातच अंतर्भूत होतात, धर्मविरोधी अर्थ-काम त्याज्य होत, धर्मापासून अर्थ-काम प्राप्त होतात असे महाभारतात व्यासांनी म्हटले आहे. बहुतेकांच्या मते अर्थ हा मध्यम, परंतु कौटिल्याच्या मते तो प्रधान असून धर्म व काम हे अर्थमूलक होत. राजाच्या दृष्टीने अर्थ प्रमुख, असे वात्स्यायनाने म्हटले आहे. चार्वाकादींचा अपवाद वगळता बहुतेकांनी कामाला हीन लेखले आहे. चार्वांकाचे नास्तिक दर्शन सोडल्यास सर्व दर्शनांनी मोक्ष हा परमपुरूषार्थ मानलेला आहे. केवळ धर्म किंवा अर्थ व काम किंवा त्रिवर्गाचा समुच्चय श्रेयस्कर, अशीही मते महाभारतात सांगितली आहेत.
हे सर्व पुरुषार्थ परस्परसापेक्ष आहेत. अर्थ-काम धर्माधिष्ठित असले तरच सुख देतात. कामोपभोगाच्या वस्तू आणि यज्ञ, दान, तीर्थयात्रा इ. धर्म यांच्यासाठी अर्थाची गरज असल्यामुळे अर्थ हा काम व धर्म यांचे साधन होय. अर्थविरोधी काम त्याज्य, असे कौटिल्य म्हणतो. कामपूर्ती न झालेला मनुष्य धर्मार्थांच्या साधनेत रमू शकत नाही. त्रिवर्ग मोक्षसापेक्ष नसला, तरी मोक्षाभिमुख होऊ शकतो आणि सामान्यतः त्रिवर्गाच्या प्राप्तीनंतर मोक्षसाधन अभिप्रेत असेल, तर मोक्ष त्रिवर्गसापेक्षच ठऱतो. धर्म व अर्थ हे साधन, तर मोक्ष व काम हे साध्य, असेही म्हणता येते. सर्वांनी, विशेषतः राजे लोकांनी, त्रिवर्गाचे संतुलन साधावे, असा शास्त्रांचा उपदेश आहे. परंतु व्यवहारात स्वभावभिन्नतेमुळे वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पुरुषार्थांना प्राधान्य देतात. धर्म-मोक्षांचा अतिरेक करून अर्थ-कामांची अवहेलना केली, तर कोणताच पुरुषार्थ सिद्ध होत नाही.
पुरुषार्थ हे वर्णाश्रमपद्धतीचे एक महत्त्वाचे अधिष्ठान होते. ब्रह्मचाऱ्याने धर्मसाधना करावी, परंतु अर्थ-काम त्याज्य मानावेत गृहस्थ पतिपत्नींनी परस्पर सहकाऱ्याने त्रिवर्ग प्राप्त करावेत वानप्रस्थाश्रमात धर्म करीत असताना अर्थ-कामांना दूर ठेवून मोक्षाकडे वळावे आणि संन्यासाश्रमात मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करावा.
विवाहप्रसंगी धर्म, अर्थ व काम यांच्या बाबतींत पत्नीचे अतिक्रमण करणार नाही, अशी वराने प्रतिज्ञा घ्यावयाची असते यावरून स्त्रियांचा पुरुषार्थप्राप्तीचा हक्क स्पष्ट होतो. विवाह हा दोघांच्याही पुरुषार्थप्राप्तीसाठी असतो. पतीच्या धर्मकर्यात पत्नीचा सहभाग आवश्यक असतो. हिंदू स्त्रियांनी व्रतवैकल्यांच्या रूपाने धर्माची जोपासना केली. अर्थप्राप्तीसाठी मात्र त्या पुरुषावर अवलंबून राहिल्यामुळे आणि कामसाधनेतही स्वतःच पुरुषाच्या केवळ उपभोग्य वस्तू बनल्यामुळे दुय्यम ठरल्या. इतिहासात व शास्त्रात मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियाही अत्यल्पच आढळतात.
व्यक्ती आणि समाज या दोहोंच्या दृष्टीने पुरुषार्थ महत्त्वाचे आहेत. पुरुषार्थांच्या रुपाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा इष्ट दिशेने विकास साधणारे स्वातंत्र्य व हक्क मिळाले आहेत. त्याबरोबरच पुरुषार्थप्राप्तीच्या इच्छेतून समाजाचे स्थैर्य, समृद्धी आणि विकास या गोष्टी साध्य होतात. विविध मंदिरे व उपासनापद्धती उद्योगधंदे, व्यापार व शेती नानाविध कला व उपभोग्य वस्तू तसेच तत्त्वज्ञाने ही पुरुषार्थप्राप्तीसाठीच निर्माण होतात आणि क्रमाने एक समृद्ध संस्कृती तयार होते.
पुरुषार्थकल्पना ही भारतीय नीतिशास्त्रातील एक महत्त्वाची व परिपूर्ण व्यवस्था आहे. धर्माचा आधार न घेता अर्थ-कामांचा हव्यास हा ज्याप्रमाणे अनैतिक त्याप्रमाणेच अर्थ-कामांना धिक्कारणारे नीतिशास्त्रही अव्यवहार्य, अवास्तव व ढोंगी होय. धर्म-मोक्षांबरोबरच अर्थ-कामांनाही पुरुषार्थविचारात मान्यता दिल्यामुळे मानवाच्या ऐहिक जीवनाला एक नैतिक व धार्मिक मूल्य प्राप्त झाले स्वार्थ व परमार्थ, हक्क व कर्तव्य आणि व्यक्ती व समाज यांत मेळ घातला गेला माणसाचे शरीर, मन व आत्मा या सर्वांच्या गरजांची पूर्ती व स्वास्थ्य साधले गेले आणि विकृतीऐवजी संस्कृती निर्माण झाली.
पुरुषार्थकल्पनेचा स्पष्ट उल्लेख वेदांत नाही. सर्वांत प्राचीन उल्लेख आपस्तंबधर्मसूत्रात सापडतो. नंतरचे सूत्रग्रंथ, स्मृती, पुराणे, महाभारत, भाष्ये, धर्मनिबंध इ. ग्रंथांतून ह्या संकल्पनेची विपुल चर्चा आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र, व मोक्षशास्त्र, अशी प्रत्येक पुरुषार्थाशी संबंधित शास्त्रेही तयार झाली असून जैमिनीची धर्मसूत्रे, कौटिल्याचे अर्थशास्त्र, वात्स्यायनाची कामसूत्रे व बादरायणाची ब्रह्मसूत्रे हे त्यांवरील प्रमुख ग्रंथ होत.
पुरुषार्थ ही भारतीयांची संकल्पना असली तरी नैतिक आचरण, आर्थिक समृद्धी, सुखोपभोग आणि पारमार्थिक कल्याणाची अभिलाषा ही शाश्वत ध्येये सर्व उच्च संस्कृतीमध्ये असतात आणि त्यांची व्यवस्था प्रत्येक सुसंस्कृत समाजात कोणत्या ना कोणत्या रूपात आढळतेच.
संदर्भ : 1. Kane, P.V. History of Dharmashastra, 5 Vols.,
2. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.
साळुंके. आ. ह.