पुष्टिमार्ग: वल्लभाचार्यांनी (१४७९–१५३१) प्रवर्तित केलेला भक्तिमार्गी वैष्णव संप्रदाय. वृंदावनात निर्माण झालेल्या या संप्रदायाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात या प्रदेशांतील लोकांवर व विशेषतः तेथील व्यापाऱ्यांवर आहे. पुष्टी म्हणजे ईश्वराचा अनुग्रह वा कृपा असे भागवतात म्हटलेले आहे. श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, असे या संप्रदायात मानलेले असल्यामुळे याला वल्लभ संप्रदाय, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय इ. नावेही आहेत. शुद्धाद्वैत तत्त्वज्ञान हा या संप्रदायाचा सिद्धांतपक्ष असून पुष्टिमार्ग हा साधनापक्ष आहे.

निर्मिती व परंपरा : श्रीकृष्ण एकदा गोवर्धन पर्वतावर देवदमन वा श्रीनाथजी या रुपाने प्रकट झाला, त्याने ⇨वल्लभाचार्यांना दृष्टांत देऊन दर्शनासाठी बोलावून घेतले आणि कृष्णमंदिर बांधून नवा भक्तिसंप्रदाय सुरू करण्यास त्यांना सांगितले, असे या संप्रदायात मानले जाते. श्रावण शुद्ध एकादशीच्या रात्री स्वतः श्रीकृष्णाने मला समर्पणमंत्राचा उपदेश केला, असे स्वतः वल्लभाचार्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांनी पुष्टिमार्गाचे प्रवर्तन केले. अर्थात, ईश्वरी अनुग्रहाचे तत्त्व तसे बरेच प्राचीन असून, ईश्वरी कृपेनेच आत्मदर्शन होऊ शकते, हे विचार मुंडक कठ या उपनिषदांत येऊन गेले आहेत.

वल्लभाचार्यांनी स्वतःच्या चिंतनातून नव्या संप्रदायाचे प्रवर्तन केले हे खरे असले, तरी या नव्या संप्रदायाचे वेदान्त तत्त्वज्ञान मात्र त्यांनी विष्णुस्वामींच्या रुद्र संप्रदायातून घेतले. अग्नीपासून स्फुल्लिंग निघावेत, तसे ईश्वरापासून जीव निघतात,  जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून त्या दोघांत अद्वैत असते, ब्रह्म हे विकार न पावताच जगाच्या रूपाने परिणत होते, ब्रह्म हे शुद्ध असते, म्हणजेच त्याचा मायेशी संबंध नसतो, इ. या तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे होत.

वल्लभाचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा गोपीनाथ हा आठ वर्षे पुष्टिमार्गाचा आचार्य होता. त्याच्या मृत्यूनंतर वल्लभाचार्याचा धाकटा मुलगा ‘गोस्वामी’ विठ्ठलनाथ (सु.१५१५–सु.१५८५) हा प्रमुख झाला. त्यानेच या पंथाचा खरा विस्तार केला. दैनंदिन पूजेची पद्धत, व्रतोत्सवांची व्यवस्था इ. बाबतींतील नियम प्रामुख्याने त्यानेच घालून दिले. गिरिधर, गोविंदराय, बालकृष्ण, गोकुलनाथ, रघुनाथ, यदुनाथ, व घनश्याम असे त्याचे सात पुत्र होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गाद्या स्थापन करून संप्रदायाचा विस्तार केला. या संप्रदायाचे सध्याचे गुरू हे त्यांचेच वंशज असून त्यांना ‘महाराज’ असे म्हटले जाते.

भक्तीचे स्वरूप : श्रीकृष्ण हेच सर्वोच्च ब्रह्म असून त्याचे शरीर सच्चिदानंदमय असते. पुरुषोत्तम असा तो कर्ता आणि भोक्ताही असून स्वतःच्या इच्छेने जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षा उच्चस्थानी असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. या व्यापिवैकुंठात गोलोक असून त्यात वृंदावन, यमुना इत्यादींचे अस्तित्व आहे. या गोलोकात जाऊन तेथील कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय. लीलेच्या संकल्पनेला या संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

आत्मकल्याणासाठी प्रवाहमार्ग, मर्यादामार्ग व पुष्टिमार्ग असे तीन मार्ग मानवापुढे असतात. या मार्गांचे अनुसरण करणाऱ्या जीवांना अनुक्रमे प्रवाहजीव, मर्यादाजीव व पुष्टिजीव असे म्हणतात. संसारप्रवाहात अडकून सुखोपभोग घेणे हा प्रवाहमार्ग, वेदविहित ज्ञान व कर्म यांचा मार्ग हा मर्यादामार्ग व भक्तिमार्ग हा पुष्टिमार्ग होय. या सर्वांत पुष्टिमार्गच श्रेष्ठ होय.

भक्तीचेही मर्यादाभक्ती व पुष्टिभक्ती असे दोन प्रकार आहेत. भजन, पूजन इ. साधनांवर आधारलेली भक्ती ही मर्यादाभक्ती असते. परंतु केवळ ईश्वराच्या पुष्टीमुळे निर्माण होणारी साधननिरपेक्ष भक्ती ही पुष्टीभक्ती होय. हिलाच रागात्मिका वा प्रेमलक्षणा भक्ती असे म्हणतात. पुष्टिभक्ती ही फलनिरपेक्ष असते. ईश्वराच्या पुष्टीनंतर जीवामध्ये ईश्वराचा आनंद प्रस्थापित होतो. हीच जीवाची मुक्ती होय. जीवांना निरपेक्ष मुक्ती देण्यासाठीच ईश्वराचा अवतार असतो.

ईश्वराचा अनुग्रह मिळावा म्हणून त्याची सेवा करणे, हे जीवाचे कर्तव्य होय. सेवा ही तनुजा, वित्तजा व मानसी असून, मानसी सेवा ही सर्वश्रेष्ठ होय. अनुग्रहासाठी ईश्वराविषयी उत्कट प्रेम आवश्यक असून त्याच्या स्नेह, आसक्ती व व्यसन अशा तीन अवस्था असतात. साधननिरपेक्ष प्रपत्ती व शरणागती, हेही एक महत्त्वाचे तत्त्व होय.

वल्लभाचार्यांनी कृष्णाच्या बालरूपाला महत्त्व दिले होते. पुष्टिमार्गात प्रारंभी वात्सल्यभक्तीलाच महत्त्व होते. वल्लभाचार्यांच्या काळात राधेची पूजा होत नव्हती परंतु विठ्ठलनाथांच्या काळात ती सूरू झाली. यानंतरच्या काळात कृष्ण व गोपी यांचे प्रेम आणि प्रणयाधिष्ठित ⇨मधुराभक्ती यांना महत्त्व आले. या बाबतीत, ⇨चैतन्य संप्रदायाचा आणि ⇨राधावल्लभ पंथाचा पुष्टिमार्गावर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. नंद, यशोदा, गोप व गोपी हे पुष्टिमार्गाच्या मते आदर्श भक्त होत.


पूजापद्धती व दीक्षा : या संप्रदायात पूजेसाठी सार्वजनिक मंदिरे नसतात. प्रत्येक महाराजाच्या मालकीचे एक मंदिर असते. सकाळी उठल्यानंतर भक्ताने कृष्ण, वल्लभाचार्य, विठ्ठलनाथ, त्याचे पुत्र, स्वतःचा गुरू, गोवर्धन, यमुना, इत्यादींचे विशिष्ट क्रमाने स्मरण करून त्यांना प्रणाम करावयाचा असतो. स्नानानंतर कपाळाला उभा गंध लावणे, अंगावर कमळ वगैरेंची चिन्हे उठविणे, इ. प्रकार असतात. पूजेच्या बाबतीत दिवसभरात ज्या क्रिया केल्या जातात, त्यांपैकी कृष्णाला जागे करणे, स्नान घालणे, वस्त्रे चढविणे, पान देणे, गायी चारण्यासाठी बाहेर नेणे, परत आणणे, भोजन देणे, नृत्यसंगीताने त्याचे मनोरंजन करणे, त्याला झोपविणे अशा विविध क्रिया असतात. सेवा, शृंगार व कीर्तन हे पूजेचे तीन मुख्य घटक असतात. दैनंदिन पूजेबरोबरच नैमित्तिक उत्सव आणि समारंभही असतात. उत्सवांतील रासमंडलांतून कृष्ण व गोपींच्या प्रणयदृश्यांचा अभिनय केला जातो.

अंशरूप जीवाचा अंशी अशा ईश्वराशी संबंध जोडता यावा, म्हणून ‘ब्रह्मसंबंध’ या नावाचा एक दीक्षाविधी असतो. यावेळी ‘श्रीकृष्ण हा माझे शरणस्थान आहे’, या अर्थाचा संस्कृत मंत्र साधकाच्या कानात सांगितला जातो व त्याच्या गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ घातली जाते. त्यानंतर श्रीकृष्णाला आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी साधकाला आणखी एक मंत्र सांगितला जातो. आता साधक हा श्रीकृष्णाचा दास बनतो आणि तो मृत्यूनंतर गोलोकवासी होतो.

प्रमाणग्रंथ व पवित्र स्थाने : उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांच्याबरोबरच ‘व्यासांची समाधिभाषा’ म्हणून मान्यता पावलेल्या भागवतपुराणालाही प्रमाणग्रंथांत स्थान देऊन या संप्रदायाने प्रस्थान चतुष्टयी मानली आहे. वल्लभाचार्यांनी ब्रह्मसूत्रांवर अणुभाष्यभागवतावर सुबोधिनीटीका लिहिली आहे. विठ्ठलनाथांनी आणि अन्य सांप्रदायिकांनी लिहिलेले इतर अनेक ग्रंथ असून विद्वन्मंडन, भाष्यप्रकाश, सुबोधिनीप्रकाश, भागवतसूक्ष्मटीका हे त्यांपैकी विशेष उल्लेखनीय होत. सांप्रदायिक ग्रंथांच्या संदर्भात ⇨अष्टछाप कवींचे साहित्यही महत्त्वाचे आहे. ⇨सूरदास, परमानंददास, कुंभनदास व कृष्णदास, हे चार वल्लभाचार्यांचे आणि छीतस्वामी, ⇨नंददास, गोविंदस्वामी व चतुर्भुजदास हे विठ्ठलनाथांचे चार शिष्य ‘अष्टछाप’ कवी म्हणून विख्यात आहेत. त्यांनी आपल्या काव्यांतून प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गांनी संप्रदायाची तत्त्वे मांडली आहेत.

संप्रदायात नाथद्वारा येथील कृष्णमंदिर प्रमुख मानले जाते. विठ्ठलनाथांच्या पुत्रांनी कोटा, कांक्रोली, गोकुळ, कामवन, सुरत इ. ठिकाणी कृष्णमूर्ती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे ती स्थानेही संप्रदायात महत्त्वाची आहेत. त्यांखेरीज वल्लभाचार्य व विठ्ठलनाथ यांनी जेथे जेथे भागवतसप्ताह केले, ती ती स्थाने ‘बैठक’ म्हणून प्रसिद्ध झाली. वल्लभाचार्यांच्या ८४ व विठ्ठलनाथांच्या २८ बैठका प्रसिद्ध आहेत.

संप्रदायाचे वैशिष्ट्य व प्रभाव : या संप्रदायाने संन्यास घेऊन व्यावहारिक जीवनाचा त्याग करण्यापेक्षा मानसिक निवृत्तीलाच अधिक महत्त्व दिले. परमानंदरूप कृष्ण हे उपास्य असल्यामुळे, मानवी जीवनातील सुखांचा त्याग करण्यापेक्षा त्यांचा आस्वाद घेण्याची वृत्ती वाढली. स्वतः वल्लभाचार्य व विठ्ठलनाथ विवाहित होते आणि त्यांचे वंशजही विवाहितच असतात, या घटनेवरून हे स्पष्ट होते.

हा मार्ग सुबोध व सहजसाध्य होता. कर्मकांडाची उपेक्षा करून स्त्रीशूद्रादी सर्वसामान्यांनाही मोक्षाचा मार्ग खुला करणे, हे त्याचे वैशिष्ट्य होय. म्हणूनच, काही मुसलमानही त्याचे अनुयायी झाले. या संप्रदायाच्या ‘अष्टछाप’ कवींनी व्रजभाषेचे साहित्यिक सामर्थ्य व हिंदी साहित्याचे सौंदर्य वृद्धिंगत केले. हा मार्ग विविध कलांच्या विकासालाही कारणीभूत झाला. कृष्णपूजेत भोजनही अंतर्भूत असल्यामुळे पाककलेला प्रोत्साहन मिळाले. कृष्णाचा शृंगार करायचा असल्यामुळे प्रसाधन, अलंकरण व वस्त्रविन्यासाच्या कला विकसित झाल्या. वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या आरतीसाठी वेगवेगळ्या रागांचा प्रयोग करण्याच्या पद्धतीतून संगीताचा आणि वेगेवेगळी पदे म्हणण्याच्या पद्धतीतून काव्याचा विकास झाला. विजयानगरच्या कृष्णदेवरायाने वल्लभाचार्यांना कनकाभिषेक केला. अकबर व सिकंदर लोदी यांनी या संप्रदायाला खास सवलती दिल्या, यावरूनही संप्रदायाचा प्रभाव स्पष्ट होतो. परंतु कामोत्तेजक शृंगारवाङ्‌मय, महाराजांचा स्वैराचार, त्यांच्यावर भरले गेलेले खटले इत्यादींमुळे हा संप्रदाय बदनाम झाल्याचेही आढळते.

संदर्भ : 1. Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism anMinor Religious Systems,

                 Varanasi, 1965.

            २. उपाध्याय, बलदेव, भागवत संप्रदाय, काशी, १९५३.

साळुंखे, आ. ह.