पुरवठा : एखाद्या वस्तूची किंवा सेवेची बाजारातील किंमत ठरविणाऱ्या दोन घटकांपैकी एक घटक. दुसरा घटक मागणी हा असतो. निरनिराळ्या किंमतींना बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाच्या परिमाणास ‘पुरवठा’ असे म्हणतात. गुदामात ठेवलेल्या साठ्याचा जो भाग बाजारात विक्रीसाठी येतो, तो पुरवठा होय. बाजारातील किंमत मनासारखी नसेल, तर एखादा विक्रेता गुदामातील

आ.१. पुरवठावक्र

माल बाहेर काढणारच नाही. अर्थात नाशवंत वस्तूच्या बाबतीत विक्रेता असहाय असतो. किंमत कितीही असो, संपूर्ण साठ्याचे त्याला पुरवठ्यात रूपांतर करावे लागते. सर्वसाधारणपणे बाजारात किंमत जितकी जास्त तितका एखाद्या वस्तूचा जास्त पुरवठा विक्रीसाठी येईल. हे विधान आ. १ मधील अक्ष रेषेवर वस्तूंचे एकक आणि अय रेषेवर किंमती दाखवून पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल :

अधिक किंमत देऊ केल्यास पुरवठा अधिक होणे साहजिक असल्याने पप हा पुरवठावक्र साधारणपणे डावीकडून उजवीकडे वर चढत जातो. कराण जास्त पुरवठा करण्यासाठी जास्त उत्पादन करावे लागते व उत्पादनव्यय वाढत असल्यास उत्पादक जास्त किंमत आल्याशिवाय जास्त पुरवठा बाजारात आणणार नाहीत. क्वचित प्रसंगी आ २. प्रमाणे हा वक्र वर चढत गेल्यानंतर मागेही वळतो. उदा., गव्हाची किंमत वाढत गेल्यास काही काळपर्यंत शेतकरी गव्हाचा पुरवठा बाजारात अधिक प्रमाणात करतील, परंतु त्यामुळे त्यांचे एकूण उत्पन्न वाढले म्हणजे त्यांचे ज्वारी किंवा बाजरी खाण्याचे प्रमाण कमी

                                                                        आ. २. परागामी पुरवठावक्र


होऊन ते जर अधिक गहू खाऊ लागले, तर किंमती वाढूनसुद्धा गव्हाचा बाजारात येणारा पुरवठा कमी होणे शक्य आहे. अशा मागे वळणाऱ्या पुरवठावक्रास अर्थशास्त्रामध्ये ‘परागामी पुरवठावक्र’ असे नाव आहे. काही वस्तूंचा पुरवठा स्थिर असतो. कितीही किंमत देऊ

                                        आ. ३. अत्यल्पकालीन पुरवठावक्र

केली, तरी तो वाढवता येणे शक्य नसते. ह्या बाबतीत पुववठावक्र म्हणजे आ. ३ प्रमाणे अक्ष रेषेस काटकोन करणारी उभी रेघच असते. अत्यल्पकाळात बऱ्याचशा वस्तूंचा पुरवठा स्थिरच मानावा लागतो. कारण त्यांचा पुरवठा वाढविण्यास वेळच नसतो. म्हणून पुरवठावक्र प–प उभी रेघच बनते. वस्तूंच्या पुरवठ्याचा सिद्धांत पुरवठ्याच्या परिस्थितीच्या गृहीततत्त्वांवर आधारलेला आहे. पुरवठ्याच्या परिस्थितीत बदल झाला म्हणजे पुरवठ्याची वृद्धी किंवा ऱ्हास होतो. काही वस्तूंचा पुरवठा हवामान, पाऊस यांसारख्या नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. विशेषतः शेतीमालाचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार बदलत असतो. उत्पादनाचे तंत्र, उत्पादन साधनांच्या किंमती, शास्त्रीय शोध, तंत्रज्ञानाचा विकास, वाहतुकीच्या साधनांत सुधारणा हे पुरवठ्यावर परिणाम करणारे आणखी काही घटक होत. त्यांंमुळे वस्तूच्या उत्पादनाचा खर्च, तसेच वाहतूक खर्च कमी-अधिक होतो. उत्पादनाचा वा वाहतुकीचा खर्च कमी झाला, तर पुरवठ्यात वाढ होते आणि खर्च वाढला तर पुरवठ्यात घट होते. कोणत्याही वस्तूच्या बाजारात होणाऱ्या पुरवठ्यावर आणखी एका गोष्टीमुळे मर्यादा पडते. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जे उत्पादक घटक लागतात, ते अमर्यादित नसतात त्यांना इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी मागणी असते व एखाद्या वस्तूच्या उत्पादकाने तिचे उत्पादनपरिमाण वाढवावयाचे ठरविल्यास त्यासाठी लागणारे अधिक उत्पादक घटक मिळविण्यासाठी त्याला अधिक खर्च येईल. हा अधिक खर्च भरून निघण्याइतके अधिक उत्पन्न त्याला मिळणार असल्यास, तो त्या वस्तूचे उत्पादन वाढवून बाजारात तिचा अधिक पुरवठा करील. एखादी उत्पादनसंस्था उत्पादनाचे परिमाण ठरविताना सीमांत उत्पन्न आणि सीमांत उत्पादनव्यय यांच तुलना करीत असते. ज्या परिमाणासाठी सीमांत उत्पन्न व सीमांत उत्पादनव्यय यांची बरोबरी होते, ते उत्पादन काढून उत्पादनाचे संतुलन साधते. असे झाले म्हणजेच उत्पादकाचा नफा सर्वांत जास्त असू शकतो.

कोणत्याही वस्तूंची किंमत तिच्या मागणी व पुरवठा या दोन घटकांवरून बाजारात निश्चित होते. ज्या किंमतीला मागणी व पुरवठा यांच्यामध्ये संतुलन साधले जाते, त्या किंमतीस संतुलन किंमत म्हणतात. या संतुलनाच्या प्रक्रियेत पुरवठ्याचा विचार करताना तीन कालमानांचा विचार मार्शलसारखे अर्थशास्त्रज्ञ करतात.   

(१) अत्यल्पकाळ किंवा बाजारकाळ : हा एखाद्या दिवसाचा किंवा काही दिवसांचा असतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो इतका थोडा असतो, की त्या काळातील पुरवठा बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध असलेला पुरवठा होय. तो पुरवठा व तत्कालीन मालासाठी असलेली मागणी यांच्या अनुरोधाने बाजारात एक तात्कालिक संतुलन साध्य होते. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामधील परिपूर्ण स्पर्धेमुळे संतुलन किंमत निश्चित होईल. परंतु ही तात्कालिक स्वरूपाची असेल. पूर्वीच्या किंवा पुढील बाजारकिंमतीसारखीच ती असेल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. (२) अल्पकाळ : हा इतका मोठा असू शकेल, की त्यामध्ये वस्तूंचा पुरवठा कमी-जास्त करण्यास पुरेसा अवधी मिळेल. परंतु उद्योगधंद्यांत नवीन संस्थांचा प्रवेश होणे शक्य होणार नाही. या अल्पकाळात आपल्याजवळील साधनसामग्रीचा अधिक कसोशीने वापर करून उत्पादनसंस्थेस पुरवठा थोड्याफार प्रमाणात वाढविता येईल. अशा रीतीने बाजारात मागणी व पुरवठा यांचे संतुलन साधणारी किंमत प्रस्थापित होऊ शकेल. (३) दीर्घकाळ : ह्या काळात उद्योगसंस्थांना आपली स्थिर यंत्रसामग्री अशा रीतीने बदलता येणे शक्य होते, की ज्यायोगे उत्पादनाचे परिमाण मागणी परिस्थितीला अधिक पूर्णपणे अनुरूप करता येते. नवीन यंत्रे आणि नवे कारखाने प्रस्थापित करण्यास पुरेसा अवधी मिळतो किंवा जुने कारखाने बंदही करता येतात. अर्थातच अशा परिस्थितीत मागणी व पुरवठा यांच्यात एक दीर्घकालीन संतुलन साधने शक्य होते व या दीर्घकालीन संतुलित किंमतीभोवती बाजारकिंमत खालीवर होत जाते. 

धोंगडे, ए. रा. सुर्वे, गो. चिं.