पुनर्जन्म : एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यात राहणाऱ्या जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्या कर्माची फळे भोगण्यासाठी योग्य अशा योनीत म्हणजे देव, पितर, मनुष्य, पशू, पक्षी, वनस्पती अशा प्रकारच्या योनींत दुसरा देह प्राप्त होणे हा त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होय. यास कर्मविपाक म्हणजे कर्माचे फळ म्हणतात. पूर्वदेह सोडताना त्याच्याभोवती एका सूक्ष्म लिंगदेहाचा कोश असतो, त्या लिंगदेहावर पूर्वकर्मांचे संस्कार असतात आणि नवा देह धारण करताना जीवात्मा या लिंगदेहासह त्यात प्रवेश करतो, अशी पुनर्जन्माविषयीची कल्पना आहे.
जीवात्मा शरीराहून भिन्न असतो, तो शरीरापेक्षा अधिक काळ टिकणारा असतो, मानवाप्रमाणेच देव, पशुपक्षी, वनस्पती, जड वस्तू इत्यादींनाही जीवात्मे असतात हे सर्व जीवात्मे एका प्रकारच्या योनीतून दुसऱ्या प्रकारच्या योनीत जाऊ शकतात केलेल्या कर्मांची फळे केव्हा ना केव्हा भोगावीच लागतात इ. गोष्टी या सिद्धांतात गृहीत धरलेल्या असतात. हा सिद्धांत निरीक्षण, प्रयोग, स्वानुभव इ. द्वारा सिद्ध झालेला नाही. तो श्रद्धेने मानावा लागतो. हा सिद्धांत म्हणजे एक ‘मिथ’ आहे, असेही म्हणता येते.
वैदिकांनी पुनर्जन्माची कल्पना एतद्देशीय अनार्यांकडून घेतली किंवा आर्यांपैकी काही जणांत ती प्राचीन काळापासूनच असावी किंवा ती ऑस्ट्रेलॉइड या प्राचीन भारतीय वंशाची देणगी आहे इ. मते या सिद्धांताच्या भारतातील उत्पत्तीविषयी मांडली जातात. ऋग्वेदात पुनर्जन्माची कल्पना स्पष्टपणे आलेली नाही बृहदारण्यकादी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता, महाभारत, स्मृती, पुराणे इ. ग्रंथांतून मात्र पुनर्जन्माचे विस्तृत विवेचन आहे. या विषयावर अनेक पुराणकथाही आढळतात परंतु त्याच्यावर स्वतंत्र असे ग्रंथ मात्र फारसे नाहीत. चार्वाक, अजित केशकंबली इ. मोजक्या लोकांचा व संप्रदायांचा अपवाद वगळता भारतातील बहुतेक सर्वांना पुनर्जन्माची कल्पना मान्य होती व अजूनही आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानलेले नाही परंतु पुनर्जन्म मात्र मानलेला आहे. मृत्यूच्या वेळी रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार हे मानवी शरीराचे पाच स्कंध नष्ट होतात आणि पूर्वकर्मानुसार नवे पाच स्कंध उत्पन्न होऊन व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, असे बौद्ध मानतात. तत्त्वज्ञानावर आधारलेला पुनर्जन्माचा सिद्धांत हे प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध, शीख इ. भारतीय धर्मांचेच वैशिष्ट्य असून भारतीय तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादींमधील तो एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. भारतीय संस्कृतीच्या साहित्य, कला, इतिहास इ. अंगांवर आणि सर्व थरांतील भारतीयांच्या एकंदरीत मनोवृत्तीवरच त्याचा फार मोठा प्रभाव आहे. पुनर्जन्माची सदैव जाणीव ठेवूनच बहुतांश भारतीय लोक वर्तमान जन्मातील सर्व कर्मे करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
पुण्यवंताला चांगला जन्म मिळतो आणि पाप्याला पशुपक्षी, वृक्ष इ. क्षुद्र योनींतून जन्मावे लागते, असे स्मृतिपुराणे सांगतात. कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो, याविषयी त्यांनी अनेक वर्णने केली आहेत. कर्मविपाकाची तपशीलवार सुसंगत व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न श्रुतिस्मृतिपुराणांत व विशेषतः गरुडपुराणात केलेला आढळतो. याज्ञवल्क्यस्मृतीत व तिच्या मिताक्षराटीकेत कोणत्या पापामुळे कोणती योनी प्राप्त होते याचे थोडक्यात दिग्दर्शन करणारे वर्णन केले आहे, ते असे : महापातकामुळे घोर नरकाची प्राप्ती होते. नरकातील भोग भोगून महापातक्यांना या जगात जन्म मिळतो तो असा ब्रह्यहत्या करणारा हरण, कुत्रा, डुक्कर, उंट या योनींत सुरापान करणारा गाढव, अंत्यज इ. योनींत सुवर्ण चोरणारा कृमी, कीट, पतंग या योनींत आणि गुरुपत्नीशी संभोग करणारा गवत, झुडुप, वेल या योनींत जन्मतो. त्याचप्रमाणे सुवर्ण हरण करणारा वाईट नखाचा, गुरुपत्नीगामी वाईट कातडीचा, अन्नाचे अपहरण करणारा अजीर्ण रोगी, पुस्तके चोरणारा मुका, धान्य चोरणारा
वाजवीपेक्षा अधिक अवयवांचा, चहाडखोर, घाणेरड्या नाकाचा, तेल चोरणारा तेलातला किडा, गुप्तपणे बातम्या पुरविणारा दुर्गंधी तोंडाचा, ब्रह्यस्वाचा (ब्राह्यण धनाचा) वा परस्त्रीचा अपहार करणारा ब्रह्मराक्षस, परस्वाचा अपहर्ता सोनारपक्षी, पालेभाजी चोरणारा मोर, सुगंधी द्रव्ये चोरणारा चिचुंदरी, धान्यचोर उंदीर, यान चोरणारा उंट, फळे चोरणारा वा एकटाच गोड खाणारा वानर, पाणी चोरणारा पाणकोंबडा, दूध चोरणारा बगळा किंवा कावळा, घरातील उपकरणे चोरणारा चिमणी, मध चोरणारा गांधिलमाशी, मांस चोरणारा गिधाड, मातेचा वा गाईचा वध करणारा जन्मांध, ठेव गडप करणारा काण्या डोळ्याचा , खोटे बोलणारा चाचरा आणि कौमार्यावस्थेतील परस्त्रीशी संभोग करणारा षंढ बनतो. निरनिराळी पातके केल्याने कोणकोणते रोग होतात आणि ते रोग झालेल्यांनी कोणकोणती प्रायश्चित्ते आचरावी, याचेही स्पष्टीकरण अनेक धर्मशास्त्रग्रंथांत केले आहे. परंतु पूर्वमीमांसेप्रमाणे अशा प्रकारची बहुतेक वर्णने सत्कर्माची प्रशंसा व पापकर्माची निंदा यांची दर्शक म्हणजे अर्थवादात्मक असतात. थिऑसॉफीचे अनुयायी व काही आधुनिक विद्वान यांच्या मते एकदा मनुष्यजन्म प्राप्त झाला, की पुन्हा कधीही क्षुद्र योनींतून जावे लागत नाही. राधाकृष्णन् म्हणतात, की पशूच्या रूपाने पुनर्जन्म म्हणजे पशूच्या गुणांनी युक्त अशा माणसाचा जन्म होय, असे मानावे. या जन्मातील पतीच पुढच्या सात जन्मांतही मिळावा, असे हिंदू स्त्रिया इच्छितात परंतु रूडॉल्फ स्टायनर यांच्या मते एका जन्मातील जोडीदार हा दुसऱ्या जन्मात वडील, आई, भाऊ, बहीण इ. बनण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्या मते पूर्वजन्मातील एखादा गणितज्ञ गणितात मंद व संगीत वगैरेत पारंगत होण्याची शक्यता असते. मनुष्य पूर्वजन्मात ज्या विषयाचा जाणकार असतो, त्या विषयात पुढच्या जन्मात अधिक पारंगत होतो, ही सर्वसामान्य समजूत त्यांना मान्य नाही.
वंशसातत्य म्हणजेच आत्म्याचे अमरत्व होय माणसाचा पुनर्जन्म होतो तो पुत्रपौत्रादी रूपांनी होतो, अशी एक कल्पना वेदांत व उपनिषदांत आढळते. काही वेळा पुनर्जन्म हा प्रतीकात्मक असतो. मुंजीसारख्या वा यज्ञासारख्या संस्कांरांनी माणसाचा पुनर्जन्म झाल्याचे मानले जाते. परदेशी गेल्यामुळे अशुद्ध बनलेल्या व्यक्तींना शुद्ध करण्यासाठी योनीची सुवर्णप्रतिमा बनवून तिच्यातून त्यांना पुनर्जन्म घ्यावयास लावल्याची उदाहरणे भारतात घडली आहेत.
भारताखेरीज जगातील इतर अनेक देशांतही पुनर्जन्मावरचा विश्वास कमीजास्त प्रमाणात आढळतो. पश्चिम आफ्रिकेतील मंदिंगो, यू, एडो आणि इबो या जमातींमध्ये असा विश्वास दिसून येतो. मृताचा जीवात्मा पशुपक्षी, वनस्पती इ. रूपांनी तसेच आपल्या घराण्यात जन्माला येणाऱ्या बालकांच्या रूपाने पुनर्जन्म घेतो, ही कल्पना अनेक ठिकाणी आढळते. नवजात बालकांना मृत पूर्वजांची नावे देण्यामागे हीच कल्पना असते. आफ्रिका व अमेरिका येथील काही आदिवासी लोक पुनर्जन्मावरील विश्वासामुळे मृत मुलांना रस्त्याच्या कडेला, आईजवळ वा वळचणीखाली पुरतात. मध्य ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या ठिकाणी मृतांना त्यांच्या जन्मस्थानी पुरण्यामागेही हाच विश्वास असतो. द. आफ्रिका, ओशिॲनिया इ. ठिकाणी देवककल्पनेचा उगम पुनर्जन्माच्या सिद्धांताशी जोडला जातो. ईजिप्ती लोक पुनर्जन्म मानत होते, की नाही, याविषयी मतभेद आहेत. हीरॉडोटस या ग्रीक लेखकाच्या मते ग्रीकांनी पुनर्जन्माची कल्पना ईजिप्ती लोकांकडून घेतली. पायथॅगोरसचा पुनर्जन्मावर विश्वास होता मात्र त्याने हे मत भारतीयांकडून घेतले की नाही, याविषयी मतभेद आहेत. ऑर्फिअसचे अनुयायी पुनर्जन्म मानत असत. प्लेटोनेही या विषयाची चर्चा केली आहे. एपिक्यूरियन आणि स्टोइक लोक मात्र पुनर्जन्म मानत नसत. प्राचीन यूरोपियन लोक पुनर्जन्म मानत असण्याची शक्यता आहे. गॉल, थ्रेशिअन आणि सिथियन लोक
पुनर्जन्म मानत. रोमन लोकांनी प्रारंभी हे तत्त्व मानले नव्हते परंतु पायथॅगोरस वगैरेंच्या प्रभावाने हॉरिस, व्हर्जिल, ऑव्हिड इत्यादींनी हे तत्त्व मांडले आहे. ट्यूटॉनिक लोक पुनर्जन्म मानत असल्याची उदाहरणे आढळतात. यहुदी लोकांनी या तत्त्वाला महत्त्व दिले नाही. झोहर या ग्रंथाने पुनर्जन्माची कल्पना यहुदी धर्मात गुंफण्याचा प्रयत्न केला, परंतु ‘कबाला’ खेरीज इतरांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. जो पुनर्जन्म मानतो तो खरा पारशी नव्हेच आणि पारशी लोकांवर हिंदूंच्या पुनर्जन्म कल्पनेचा प्रभाव होता, अशी परस्परविरुद्ध मते पारशी लोकांत आढळतात. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात ख्रिस्ती लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता. पुनर्जन्म हा आधुनिक काळातील थिऑसॉफीचा एक महत्त्वाचा सिद्धांत होय.
मानवाला पूर्वजन्म असता, तर त्याला त्याचे स्मरण झाले असते आनुवंशिकतेचे तत्त्व पुनर्जन्माच्या सिद्धांताशी विरुद्ध आहे पूर्वीचेच जीव पुनर्जन्म घेत असते, तर मानवी लोकसंख्या इतकी वाढली नसती वर्तमानजन्म पूर्वकर्मांवर अवलंबून असल्यास माणसाला या जन्मात कर्मस्वातंत्र्य उरत नाही आणि त्यामुळे या जन्मातील भल्याबुऱ्या कर्मांची जबाबदारी त्याच्यावर येत नाही दुःखीकष्टी व्यक्ती या पूर्वजन्मातील पापी आहेत अशी समजूत झाल्यामुळे इतर माणसे त्यांच्याशी निष्ठुरतेने वागतील इ. आक्षेप या सिद्धांतावर घेतले जातात. या आक्षेपांना पुढीलप्रमाणे विविध उत्तरे देण्यात आली आहेत. अज्ञानामुळे पूर्वजन्माचे स्मरण होत नाही सर्वांना नाही, तर काही जणांना पूर्वजन्माचे स्मरण असते योगसामर्थ्याने असे स्मरण प्राप्त होते सर्वांना पूर्वजन्म आठवत असता तर घोटाळे झाले असते, म्हणून विस्मृती ही कृपाच आहे वर्तमान जन्मातील घटनांची स्मृतीदेखील वार्धक्यादी कारणांनी नष्ट होते इ. प्रकारे स्मृतीविषयीच्या आक्षेपाला उत्तरे दिली जातात. जीवात्मा आपल्या पूर्वकर्मांचे नियम पाळून त्यांची फळे भोगण्यास योग्य असे शरीर ज्या आईवडिलांकडून मिळेल त्यांच्या पोटी जन्माला येतो परंतु ते शरीर मात्र आनुवंशिकतेचे नियम पाळते. शिवाय, सगळीच मुले आईवडिलांसारखी नसतात, जी असतात तीही पूर्णपणे तशी नसतात, सगळी भावंडेही समान नसतात इ. गोष्टींतून दिसणारा भेद आनुवंशिकतेपेक्षा वेगळ्या अशा पुनर्जन्माच्या तत्त्वामुळेच निर्माण होतो, असे मानले पाहिजे. सृष्टीतील काही जीवयोनी नष्ट वा क्षीण होत असून त्यांतील जीवात्मे मानव बनत असल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. पूर्वकर्मांमुळे या जन्मातील भोग ठरत असतात. इच्छास्वातंत्र्य मनुष्यास जन्माबरोबर लाभते. ते पूर्वकर्माचेच फळ आहे. या जन्मातील कर्मांविषयी व्यक्तीला इच्छास्वातंत्र्य असते. पुनर्जन्माची कल्पना श्राद्धकल्पनेशी विसंगत आहे परंतु हिंदूंच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे श्राद्धाची प्राचीन कल्पना न सोडताच उत्तरकालात पुनर्जन्माची कल्पना स्वीकारण्यात आली असावी, असे पा. वा. काणे मानतात.
स्वतःच्याच पूर्वकर्मानुसार मनुष्यजन्म मिळत असल्यामुळे आणि ईश्वरही स्वतःच्या मर्जीनुसार त्यात बदल करू शकत नसल्यामुळे, माणूस तत्त्वतः स्वतःच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकतो. म्हणूनच प्रयत्नवाद, कर्तव्यनिष्ठा, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, भविष्याविषयीच्या योजना इ. गोष्टींना या सिद्धांतामुळे प्रेरणा मिळावयास हवी परंतु प्रत्यक्षात मात्र या सिद्धांताचे हे सत्य स्वरूप ध्यानात न आल्याने भारतीय माणसे या सिद्धांताच्या प्रभावाने निराशावादी व दैववादीच बनली. दुःखे व संकटे यांवर उपाय शोधून त्यांना दूर करण्याऐवजी ती आपल्या पूर्वकर्माची फळे आहेत, असे मानून त्यांना शरण जाण्याची प्रवृत्ती बोकाळली. नव्या संशोधनापेक्षा परंपराप्रियता वाढली. एकीकडून आपला वर्तमानजन्य पूर्वकर्मांना ठरला असल्यामुळे या जन्मी काही कर्तृत्व करणे आपल्या हाती नाही, या समजुतीने वर्तमान जीवनाची उपेक्षा झाली आणि दुसरीकडून भविष्यकाळातील कल्पित जन्माकडेच सगळे लक्ष केंद्रित झाल्यामुळे इहलोकातील वास्तव अशा वर्तमान जीवनाचीच उपेक्षा झाली. सामाजिक विषमतेचे पूर्वकर्मांच्या आधारे समर्थन करणे आणि त्याद्वारे सामाजिक अन्याय व शोषण यांना धर्म व नीती यांचे अधिष्ठान मिळवून देणे, हा तर या सिद्धांताचा भारतीय जीवनावरील फार मोठा दुष्परिणाम होय. परंतु सदाचरणाची प्रवृत्ती, दुष्कृत्यांचा तिटकारा, त्याग, सहानुभूती, सामाजिक व वैयक्तिक जबाबदारीची जाणीव इ. गोष्टींना या सिद्धांताने प्रोत्साहन मिळाले, हेही तितकेच खरे आहे. या जन्मातील दुःख हे आपल्याच पूर्वकर्मांचे फळ आहे, या जणिवेमुळे सहनशीलता,संयम व अत्यंत दुःखद अशा वस्तुस्थितीला शांत चित्ताने सामोरे जाण्याचे सामर्थ्यही या सिद्धांतानेच भारतीयांना दिले आहे. लोक एका कुत्र्याला मारत असताना पायथॅगोरसने ‘त्या कुत्र्यात माझ्या मित्राचा पुनर्जात आत्मा आहे’, असे म्हणून मारणाऱ्या लोकांना परावृत्त केले, अशी एक ग्रीक कथा आहे. अशा समजुतींमुळे अहिंसा, भूतदया, सर्व प्राणिमात्रांचा आत्मा समान मानण्याची वृत्ती इ. सद्गुणांना प्रोत्साहन मिळाल्याची उदाहरणे भारतातही आढळतात.
अल्कीयॉनचे जन्म (१९२४) या नावाचे एक पुस्तक ॲनी बेझंट आणि लेडबीटर यांनी दोन विभागांत लिहिले असून त्यात इ. स. पू. ७०,००० पासून इ. स. ६२४ पर्यंतचे एका व्यक्तीचे ४८ जन्म शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विशिष्ट जन्मात ती व्यक्ती कशी दिसली असेल, याविषयीची काही काल्पनिक चित्रेही या पुस्तकात दिलेली आहेत. सध्याच्या काळातही पूर्वजन्मीच्या स्मृती सांगणारी काही माणसे आढळतात. त्यांचे कथन सत्यावर आधारलेले असते, की त्यांना विशिष्ट प्रकारचे भ्रम झालेले असतात, की त्यामागे आणखी काही गूढ तत्त्व असते, याचे संशोधन भारतात व इतरत्रही चालू आहे. अमेरिकेच्या ड्यूक विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जे.बी. राइन हे पुनर्जन्माविषयी शास्त्रीय संशोधन करीत आहेत.
“